विपश्यना : एक काळाची गरज !
सध्याच्या या कलियुगात वादविवाद, संघर्ष, अत्याचार, युद्ध यासारख्या हिंसक बाबी घडत असल्याने या सर्वांचा आपल्या भावी पिढीवर काय परिणाम होतो याचा आज विचार होणे आवश्यक आहे.
एका विदेशी तत्ववेत्त्याने म्हटलंय, तुमच्या देशातील मुलांच्या ओठांवरील गीतं मला सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचा भविष्यकाळ सांगेन. त्याच धर्तीवर बीज आज रुजलं तर त्याचं चीज २० वर्षांनी होतं; जर का मुलांना शालेय जीवनापासूनच त्या कोमल मनावर सुसंस्कारांची मशागत करून मूल्यांच्या शिक्षणाचे संस्कार घडले आणि तेच मूल उद्या यशाच्या उच्च शिखरावर जाऊनही त्याने जमीनही सोडली नाही तर केवढा मोठा बदल होईल.
एखाद्या क्षणी आपण अशांत व बेचैन का होतो? कधीकधी आपली मानसिक आणि शारीरिक वाताहात का होते? आणि त्यामुळे आपण स्वतःबरोबरच आजूबाजूच्या लोकांनाही आपण दुःखित का करतो? या आणि अश्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे, आपण सुखाच्या लोभापायी. हातचे क्षण या लोभापायी गमावून बसतो हे आपल्या गावातही नसतं. जेव्हा मन विकारामुळे विकॄत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते. आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे. पण जर आपल्या मनांत विकारदेखील आहेत आणि त्याचवेळी आपण सुख तसेच शांतीचा अनुभव घेऊ, असे जर वाटत असेल तर ते अशक्य आहे.
https://youtu.be/15XQ2NUABkw
ज्यामध्ये मन आणि शरीर यांच्यावर क्षणोक्षणी होणाऱ्या परिवर्तनशील घटनांवर तटस्थपणे निरिक्षण करता करताच होणाऱ्या चित्तविशोधनाच्या अभ्यासामुळे आपल्याला सुखशांतीचे जिवन जगण्यास मदत होते, आंतरिक शांती आणि सामंजस्याचा अनुभव येतो, मनाची अशुद्धी समाप्त होते परिणामी मन संतुलित होऊन प्रेम आणि करुणा यांनी परिपूर्ण होते ते म्हणजे विपस्सना (Meditation) होय. विपश्यना ही स्व-निरीक्षणातून स्व-परिवर्तन घडवणारी जीवन शैली आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होतो. विपश्यना ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: एक सुदृढ आणि निरोगी मनाचा व्यायामच आहे. स्वतः अंतर्मुख होऊन स्वतःच स्वतःचं तटस्थपणे निरीक्षण करणं. बस्स. मग आपलीच बोटे दुसऱ्याकडे न जात ती स्वतःकडे येतील आणि खऱ्या अर्थाने अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडतील. हीच ताकद आहे या मेडिटेशनमध्ये. म्हणून बालवयातच मुलांना विपश्यना (Meditation) शिकविली गेली तर मला वाटतं आपोआप आपल्या समाजात सौख्य, सामंजस्य, आनंद, कृतज्ञता, करुणा नांदेल आणि पर्यायाने हे वाढलेले व्यभिचार आणि अनैतिक कृत्ये, अन्याय अत्याचार थांबतील आणि आपसूकच नव्या पिढीचा एक नवा आदर्श पाहायला मिळेल. त्यामुळे नव्याने उदयास येणाऱ्या भावी पिढीच्या निर्मल मशागतीत या विपश्यनेची बीजं पेरूया. या बीजांकुरातून त्याचं मोठाल्या वृक्षात साहजिकच रूपांतर होईल आणि ह्या वृक्षाचं मग शीतल छाया देण्याचं निस्वार्थी कार्य अविरतपणे पुढे चालू राहील.
*****.
Khup chhan
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवा