डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्दा ॲन्ड हिज धम्मा’ या महान ग्रंथाची निर्मिती करीत असताना त्यांना चार प्रश्न पडले. त्यांनी ते आपल्या प्रस्तावनेमध्ये मांडून वाचकांत चेतना निर्माण व्हावी आणि त्यांची उकल करण्यास हातभार लावण्यास प्रवृत्त व्हावे असे त्यांनी आवाहन केले आहे; त्यातील एक प्रश्न म्हणजे-भगवान बुध्दाने परिव्रजा का ग्रहण केली?
या महान ग्रंथातील प्रथम खंड : सिध्दार्थ गौतम–बोधिसत्व बुध्द कसे झाले? -भाग पहिला : जन्मापासून परिव्रज्येपर्यंत - त्यामधील चौदाव्या अध्यायाच्या अनुषंगाने…
बुध्दाला वयाची २० वर्षे झाल्यावर शाक्यसंघाच्या नियमानुसार संघामध्ये सभासद करून घेतले गेले. शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर सिध्दार्थाला आठ वर्षे लोटली. त्यानंतर एक अशी घटना घडली की, जी शुध्दोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिध्दार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली ती दुर्घटना म्हणजे-
शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहीणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरीता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणीती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युध्दानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युध्द पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलाविले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, “आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांच्याविरूध्द युध्द पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरूध्द संघाने युध्द पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे.” त्यावर सिध्दार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, “या ठरावाला माझा विरोध आहे. युध्दाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युध्द करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युध्दाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो.” सिध्दार्थ गौतम पुढे म्हणाला, “संघाने कोलियांच्या विरूध्द युध्दाची घोषणा करण्याची घाई करू नये, असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपणसुध्दा निर्दोष नाहीत हे सिध्द होते.” त्यावर सेनापतीने उत्तर दिले, “होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की, प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती.” सिध्दार्थ गौतम म्हणाला, “यावरून स्पष्ट होते की, आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही म्हणून मी असे सुचवितो की, आपण आपल्यातून दोन माणसं निवडावी व कोलिंयाना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे.” सिध्दार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले. परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, “माझी खात्री आहे की, कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही.” यामुळे मुळ ठराव व त्याला सुचविलेली दुरूस्ती मतास टाकावी लागली. सिध्दार्थ गौतमाने सुचिलेली दुरूस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वत:चा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिध्दार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणला, “हा प्रस्ताव मान्य करू नये, अशी मी संघाला विनंती करतो. शक्य आणि कोलिय यांचा निकटाचा संबंध आहे. त्यांनी परस्पराचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही.” सिध्दार्थ गौतमाचे हे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की, “क्षत्रिय लोक युध्दात आपला आणि परका असा भेद करून शकत नाहीत. आपल्या राज्याकरीता त्यांनी आपल्या सख्ख्या भावाशी देखील लढले पाहिजे. यज्ञयाग करणे हा ब्राम्हणांचा धर्म आहे, युध्द करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे, व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा क्षुद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे.” त्यावर सिध्दार्थाने उत्तर दिले, “धर्म याचा अर्थ मी असा समजतो की, वैराने वैर शमत नाही. वैरावर प्रेमानेच मात करता येते.” मग अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, “या तत्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की, सिध्दार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊ या.” त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.
दुसरे दिवशी, युध्दासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधी सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलाविली. त्यामध्ये कोलियांशी युध्द करण्यासाठी २० ते २५ वर्षे वयाच्या प्रत्येक शाक्य पुरूषाने सैन्यात दाखल व्हावे, अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी, असा सेनापतीने ठराव मांडला. वरील ठरावाला होकार आणि नकार देणारे सर्व लोक या सभेत उपस्थित होते. ज्या अल्पसंख्यांकानी त्या निर्णयाविरूध्द मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न होता-बहुसंख्यांकांच्यापुढे नमावे की नमू नये? अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की, बहुमतवाल्यांच्या पुढे नमावयाचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुदैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांना विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामाची जाणीव असावी. जेव्हा सिध्दार्थाने पाहिले की, आपणास पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत तेव्हा तो उभा राहिला व संघाला उद्देशून म्हणला, “मित्रहो! तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजुला बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावे लागत आहे की, सैन्यभरतीच्या तुमच्या निर्णयाचा मी विरोध करीन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि मी युध्दात भाग घेणार नाही.” सिध्दार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, “संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एका जरी शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल.” सिध्दार्थाने उत्तर दिले, “होय, मी माझ्या तनमनधनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबध्द आहे. पण हे युध्द शाक्यांच्या सुहिताचे आहे असे मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा?” कोलियांबरोबर सतत तंटा करीत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कोशलाधिपतींच्या हातचे कसे खेळणे बनले आहे याची आठवण करून देऊन सिध्दार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, “हे समजणे कठीण नाही की कोशल राजाला हे युध्द शाक्यांचे स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल.” सेनापतीला राग आला आणि सिध्दार्थाला उद्देशून तो म्हणाला, “तुझे हे भाषणकौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजे. कदाचित तुला असे वाटत असेल की, कोशल राजाच्या अनुज्ञेवाचून संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहान्ताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर ह्यापैकी कोणतीही एक शिक्षा तुला संघाने जरी फर्मावली तरी कोशल राजा त्यास आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करू शकेल. याकरीता कोशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही.” कोलियांशी युध्द करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिध्दार्थाला जाणीव झाली. त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले. एक सैन्यात दाखल होऊन युध्दात सामिल होणे; दुसरा, देहान्तशासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे; आणि तिसरा, आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे. त्यातील पहिला पर्याय न स्विकारण्याबद्दल त्याचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिध्दार्थ संघाला उद्देशून म्हणाला, “मला देहान्ताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या, ती मी खुषीने स्विकारीन. सेनापती म्हणाला, “तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण, जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कोशलाधिपतीस समजणारच; आणि तो असाच निष्कर्ष काढील की, ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारील.” सिध्दार्थ गौतम म्हणाला, “हिच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय.” संघाने व सेनापतीने त्यास संमती दर्शविली आणि सिध्दार्थ गौतमाने आपल्या कुटुंबियांच्या भेटीनंतर परिव्रजा घेतली.

वरील वास्तववादी घटना ही खुद्द डॉ. बाबासाहेबांनी अभ्यासलेली आहे. या घटनेशी काहीसं साधर्म्य असलेली दिनांक २५ मार्च २०१८ रोजीची चाफेरी बुध्दविहार येथे दोन शाखांची झालेली संयुक्त मिटींग होय. मनात कुठलाही दुराग्रह न ठेवता आमचे विचार पारदर्शक बुध्दीने, संयमाने, संयुक्तिकपणे आणि भविष्याचा दूरदृष्टीने विचार करून सौजन्य राखून मांडले. विहाराचा विषय अगदी सलोख्याने सुटणारा होता. तथागत बुद्धांनी शाक्य आणि कोलियांच्या प्रश्नाबाबतही उत्तम असा मार्ग शोधून काढला होता तो म्हणजे, शाक्यांमधून दोन माणसं निवडावी व कोलियांमधून दोन माणसं निवडून त्या चौघांनी मिळून पाचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पाच जणांनी हे भांडण मिटवावे.” हाच तो बुद्धांचा मध्यम मार्ग आम्हीही अवलंबला त्या मिटींगमध्ये. दोन्ही शाखांमधून असे तीन किंवा चार सदस्य निवडून एक मध्यवर्ती कमिटी स्थापन करून त्यांच्या हाती विहाराची आणि तद्नुषंगिक बाबींची धुरा सोपवावी. यामध्ये दोन्ही शाखांचे प्रतिनिधी असल्याने स्वाभाविकच सर्व काही निर्णय हे सलोख्याने आणि मैत्रीपूर्ण होऊन चाफेरीचा एक नवा इतिहास आपल्याला पहायला मिळाला असता आणि भविष्याच्याही दृष्टीने खरंतर तेच असायलाच हवं. आमच्या जेष्ठ व्यक्तींनी जिथे चांगलं घडतंय तिथे आम्हा तरूणांना हा बुद्धांचा मध्यम मार्ग दाखवून आम्हास प्रेरित केले. या वास्तूस प्रत्येकाची नाळ जोडली गेली आहे याचे कारण विहाराच्या उभारणीस प्रत्येक माणसाचे श्रम आहेत, योगदान आहे, त्यांची भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेबांप्रति अपार श्रध्दा आहे, अभिमान आहे. त्यामुळे या महामानवांच्या समता आणि बंधुत्व या तत्वांन्वये प्रलंबित असलेली ही समस्या या संयुक्त मिटिंगद्वारे सुटेल असा आशावाद त्यांनी प्रकट केला होता. पण दुदैवाने तसा सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. मुद्दा बाजुलाच राहून चर्चा भरकटली. विहाराच्या जीर्णोध्दाराचं नियोजन करायला बसलेली मिटींग त्या विहाराची विक्री(?) आणि त्याच्या अनुषंगाने मोबदल्याच्या वाटण्या, निधी, वर्गणी, बक्षिसपत्र आणि त्या विहाराच्या गावकागदी नावावरून उहापोहही झाला.
पोलीस स्टेशनला अर्ज करून जमीनमालकांची विहारास संमती नसल्याचे भासविले पण प्रत्यक्षात बैठकीच्या अगदी प्रारंभीच जमिन मालक दोन्ही बंधूंनी आपली संमती देऊनही काही विघ्नसंतोषांनी समान वर्गणीमुळे (म्हणजे दोन्ही शाखांना ५०-५० टक्के) ज्या शाखेतील सभासदांची संख्या तुलनेने कमी असेल स्वाभाविकच त्या शाखेवर आर्थिक बोजा पडणार हे सरळस्पष्ट असून देखील स्वत:च्या मुद्यावर अडून राहून तसेच ग्रांमपंचायत असेसमेंट उताऱ्यावर विहाराचे नाव हे केवळ एकाच शाखेचेच असावे तसेच दोन्ही शाखांतर्गत एक मध्यवर्ती कमिटी नेमण्यास नकार आदी विसंगत व अनाकलनीय अशा अटी मांडून विहाराचा निर्णय होवू दिला नाही. आमचे असे म्हणणे होते की, प्रत्येक सभासदावर समान वर्गणी (सभासदनिहाय) आकारली जावी आणि ज्यांना कोणाला आपल्या यथाशक्तीने आणि मनोभावे जास्त द्यावयाची असल्यास ती त्याने द्यावी. मात्र आपली सत्ता तरुणांच्या हाती द्यावयास तयार नसलेल्या प्रवृत्तीने या गोष्टीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले.
अधिकाऱ्यांसमोर अततायीपणे सिंहाचा वाटा कबुल केला खरा; पण या बैठकीत तो खारीचाही द्यायला तयार नसलेल्या मानसिकतेमुळे तारांबळ उडाल्याने शेवटी हे नाटक पेलवलं नाही आणि तो भावनेच्या भरात त्यांच्याच महिलांवर शिंतोडे उडवून त्या आमच्या शाखेला विहार आणि सर्व कार्यक्रमास विरोध असल्याचं भासवून घसरलाच आणि स्वत:चं त्याचबरोबर त्याच्या शाखेचं हसं करून घेतलं. समोरचा माणूस कोणत्या भावनेने, उद्देशाने बोलतोय यापेक्षा आपल्याला हवा तसा त्यातून सोयीस्कररित्या अर्थ काढून भर मिटींगमध्ये टाळ्या वाजवायच्या, हे म्हणजे राजकारण आणि हे कुटील डावांसह राजकारण जेव्हा समाजात शिरकाव करतं तेव्हा त्या समाजाची हानी झाल्यावाचून राहत नाही.
यापूर्वी आमच्या शाखेने बौद्धमहासभा आणि बौद्धजन पंचायत समितीच्याही तालुका व जिल्ह्याच्या प्रतिनिधींना संपर्क साधला होता. वरिष्ठांच्या उपस्थितीत विषय सामोपचाराने मिटवा म्हणून त्यांना पाचारण केले होते. बौद्धमहासभेचे तालुक्याचे पदाधिकारी आलेही होते. पण बौ.पं.स.चे तालुकाच काय स्थानिकही उपस्थित राहिले नाहीत. यावरून या विषयाची उदासीनता लक्षात येते. याही मीटिंगला कोणी त्रयस्थ व्यक्ती हजर असती तर त्यांनाही आमचा सद्भावाचा हेतू, मोकळेपणा, प्रसंगी दोन पावलं मागे येण्याची लवचिकता त्यांच्याही लक्षात आली असती आणि काहींचा आडमुठेपणाही. पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीपुढे वाडीतील होतकरू, सुशिक्षित तरुणांच्या प्रयत्नांचा, त्यांच्या सुविचारी मतांचा काहीच उपयोग झाला नाही. आमचे शब्द, आमची मतं सरळ आणि स्पष्ट होती. पण 'कोणत्याही विधायक कामात उदासीनता / नैराश्यावृत्ती लोकशाहीस बाधक असते' हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा याठिकाणी तंतोतंत खरा ठरला.
आमची सर्वसाधारण अपेक्षा ही होती की, जर विषय तोडीस जातोय तर त्या शाखेतील तरूणांनी अशा खळ माजविणाऱ्यांना का नाही थोपवू शकले? आता तरी तरूणांच्या हाती सुत्रे द्या, जिथे चांगलं घडतंय त्याच्या आड तुम्ही येऊ नका, असे ठणकावून 'त्यांना' का नाही सांगू शकले? त्यांचा आवाज दाबला जातोय की काय? त्यातील एकाही तरूणाने त्या भर मिटींगमध्ये आपला आवाज उठवू नये? हे आणि असे बरेच प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाहीत. यापुढेही असाच वाद, हेवेदावे, तणाव, कलह असेच घडत राहिले तर अजून चाळीस ते पन्नास वर्षे या वाडीची प्रगती नाही.
यापूर्वी आमच्या शाखेने बौद्धमहासभा आणि बौद्धजन पंचायत समितीच्याही तालुका व जिल्ह्याच्या प्रतिनिधींना संपर्क साधला होता. वरिष्ठांच्या उपस्थितीत विषय सामोपचाराने मिटवा म्हणून त्यांना पाचारण केले होते. बौद्धमहासभेचे तालुक्याचे पदाधिकारी आलेही होते. पण बौ.पं.स.चे तालुकाच काय स्थानिकही उपस्थित राहिले नाहीत. यावरून या विषयाची उदासीनता लक्षात येते. याही मीटिंगला कोणी त्रयस्थ व्यक्ती हजर असती तर त्यांनाही आमचा सद्भावाचा हेतू, मोकळेपणा, प्रसंगी दोन पावलं मागे येण्याची लवचिकता त्यांच्याही लक्षात आली असती आणि काहींचा आडमुठेपणाही. पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीपुढे वाडीतील होतकरू, सुशिक्षित तरुणांच्या प्रयत्नांचा, त्यांच्या सुविचारी मतांचा काहीच उपयोग झाला नाही. आमचे शब्द, आमची मतं सरळ आणि स्पष्ट होती. पण 'कोणत्याही विधायक कामात उदासीनता / नैराश्यावृत्ती लोकशाहीस बाधक असते' हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा याठिकाणी तंतोतंत खरा ठरला.
आमची सर्वसाधारण अपेक्षा ही होती की, जर विषय तोडीस जातोय तर त्या शाखेतील तरूणांनी अशा खळ माजविणाऱ्यांना का नाही थोपवू शकले? आता तरी तरूणांच्या हाती सुत्रे द्या, जिथे चांगलं घडतंय त्याच्या आड तुम्ही येऊ नका, असे ठणकावून 'त्यांना' का नाही सांगू शकले? त्यांचा आवाज दाबला जातोय की काय? त्यातील एकाही तरूणाने त्या भर मिटींगमध्ये आपला आवाज उठवू नये? हे आणि असे बरेच प्रश्न उपस्थित झाल्यावाचून राहत नाहीत. यापुढेही असाच वाद, हेवेदावे, तणाव, कलह असेच घडत राहिले तर अजून चाळीस ते पन्नास वर्षे या वाडीची प्रगती नाही.
मी नेहमी जुन्या पिढीचा आदरच करत आलेलो आहे. जुन्या पिढीने दाखविलेल्या या दिवसांमुळे आज आपण आहोत. पुर्वी ज्यावेळी वाडीत विहार नव्हते त्यावेळी आपले वयोवृध्द लोक त्या सावताच्या दळ्यात एकत्र जमून तेथे भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करायचे. त्यावेळची ती सर्वांच्या मनात असलेली प्रेमाची जी भावना होती ती भावनाच त्यांना त्या शेताच्या दळ्यापर्यंत घेऊन यायची. किती आपलेपणा, किती उत्साह ओतप्रोत भरलेला असायचा त्यांच्या मनात! हे लोक अशिक्षित व अल्पशिक्षित होते पण तरीही या दोन महापुरूषांप्रति अभिमान तितकाच ठासून भरलेला. म्हणूनच या विहारासाठी वाडवडीलांची असलेली आपली जमीन सढळ हस्ते विनामुल्य द्यावयास दिवंगत लक्ष्मण दुलबा पवार सारखा माझा आजोबा यत्किंचितही मागे सरला नाही. मग याच पिढीचा वसा घेऊन आणि तितक्याच उमेदीने पुढे हे विहार उभं राहिलं. काही वर्षे गुण्यागोविंदाने निघून गेली आणि कालांतराने एकमेकांची मने दुभंगली गेली.
सामाजिक बदलाचं दुसरं नाव उत्क्रांती होय. याच सामाजिक स्तरावर संस्कारांची घडी ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे थोड्याफार फरकाने आपोआप निर्माण होत असते. त्यामुळे या दुभंगलेल्या मनाच्या पिढीचे संस्कार हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्यावर आणि आपल्यानंतरच्या पिढीवर होतायत, याकडे मला निर्देश करावयाचा आहे. दोन पिढ्यांच्या मधली जी काही उलथापालत सुरू असते त्याचे परिणाम हे तिसऱ्या पिढीवर होत असतात. समाजात जे लोक चांगलं काम करतायत मला त्यांची पर्वाच नाही; ते आयुष्यभर चांगलंच करीत राहणार लोकांचा रोष आणि कसल्याही परिणामांची तमा न बाळगता. पण नाण्याची दुसरी बाजूही लक्ष्यात घ्यावयास हवी. त्यापासून नव्या पिढीचा आणि भावी समाजाचा बचाव कसा करायचा हा समोर प्रश्न उभा आहे. येथील चालू घडामोडींची आणि त्याच्या परिणामांची छाप त्यांच्या मनावर नकळत पडतेय. त्यामुळे जे चांगलं आहे त्याची फळं ही भविष्यात चांगलीच चाखायला मिळाणार यात शंकाच नाही मात्र दुसऱ्या बाजूचं काय? तिलाही भविष्यात सामोरं जावं लागणार हे नाकारून चालणार नाही.
इतकी वर्षे आपली, आपल्या वाडीची पर्यायाने आपल्या समाजाची धार्मिक व सामाजिक प्रगती खुंटली गेली, हे कुठेतरी थांबलं पाहिजे; ते थांबवणं तुमच्या आमच्या हातात आहे आणि ती काळाचीही गरज आहे. याबाबत मी दोन तीन वर्षांपूर्वी काही तरूणांसोबत चर्चा केली. दोन शाखा आणि तत्सम समस्या बाजूला ठेवून प्रथम या परिस्थितीवर समविचारी तरूणांनी एकत्र येऊन चर्चेच्या माध्यमातून काहीतरी पर्याय काढण्याचं त्यांना आवाहनही केलं होतं. त्याचप्रमाणे पुन्हा या लेखाच्या माध्यमातून वाडीच्या भवितव्याची खरी तळमळ असलेल्या समस्त तरूणांना साद आहे की, थोडंसं अंतर्मुख होऊन या समस्येचं चिंतन करा. आपणच आपला मार्ग काढू शकतो इतकी प्रगल्भता दिलीय आपल्याला भगवान बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांनी. त्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यायला हवा. एक दिवस हाच बुध्दाचा मार्ग आपल्याला दिशा देईल आणि येथील समाजाचं आणि नव्यानं उदयास येणाऱ्या नव्या पिढीचं कल्याण होईल, असा मला विश्वास वाटतो.
सविनय जयभिम
भवतु सब्ब मंगलम्
सादु!
सादु!!
सादु!!!
- जितेंद्र पवार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा