राजगृहाची अविस्मरणीय सपत्नीक भेट

भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे 'राजगृह' हे मुंबईमधील दादरच्या हिंदू कॉलनीतील तीन मजली पवित्र, ऐतिहासिक,
आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थळ. ह्या वास्तूचे
दर्शन घेण्याचा आज १८ नोव्हेंबर २०१८ रोजी योग आला. हिंदू कॉलनीसारख्या उच्चभ्रू वस्तीत
हेरिटेज (वारसा वास्तू) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन मजल्यांच्या डौलदार इमारतीमध्ये
बाबासाहेब १५ ते २० वर्षे वास्तव्यास होते. तत्पूर्वी डॉ. आंबेडकर मुंबईतील पोयबावाडी
परिसरात राहत व त्यांचे ऑफिस परळच्या दामोदर हॉल जवळ होते.

खरंतर बाबासाहेबांचे
बालपणापासूनचे ते शिक्षण होईपर्यंतचे दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. बॅरिस्टर
झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली आणि अल्पावधीतच ते एक ख्यातनाम वकिल म्हणून नाव
झालं. घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता वाढला. त्यामुळे पोयबावाडीतील घर अपूरं पडू
लागलं होतं. आयुष्यभर पुस्तकांची असीम भूक असलेल्या बाबासाहेबांनी त्यांच्या संग्रही
असलेल्या खास ५०,००० हून अधिक ग्रंथांसाठी अपुऱ्या जागेअभावी १९३१ ते १९३३ मध्ये हे
राजगृह बांधले. तत्कालीन जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय म्हणून ओळखले जाते.
हाच तो त्यांच्या स्वप्नातला प्रत्यक्षात उतरलेला राजगृह! हा राजगृह उभा करताना ग्रंथालयासह
घराचा आराखडा त्यांनी स्वत:च तयार केला. परदेशातील उत्तमोत्तम ग्रंथालयांची रचना ते आजवर
पाहत आलेले होतेच. पण हा राजगृह असा तसा उभा नाही राहिलेला. पूर्वी बाबासाहेबांनी दादरच्या
हिंदू कॉलनीत दोन प्लॉट खरेदी केले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन दोन वर्षात
बांधकाम पूर्ण केले. पुढे मग कर्जाची फेड व ग्रंथ खरेदी करण्यासाठी दोन प्लॉट वरील बांधकामांपैकी तिसऱ्या गल्लीतील प्लॉट क्रमांक
९९ वरील 'चार मिनार' ही इमारत विकली आणि पाचव्या गल्लीतील प्लॉट क्रमांक
१२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर पुस्तकांच्या सुरक्षेसाठी बांधलेले ‘राजगृह’ कायमचे
सुरक्षित ठेवले.
अशा या पुस्तकप्रेमीने खास पुस्तकांसाठी उभारलेल्या
राजगृहाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच 'बुद्धमं शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि,
संघम शरणं गच्छामि' चे सुमधूर ध्वनी कानावर पडले आणि मन प्रफुल्लित आणि चैतन्यमयी होऊन
गेले. समोरच टेबल-खुर्ची, टेबलावरील राष्ट्रहितैषी दूरदृष्टी लाभलेल्या बाबांच्या चष्म्यावरून
आमची नजर हटत नव्हती. क्षणभर असंही वाटलं की, बाबा आताच डोळ्यावरचा चष्मा टेबलवर ठेवून
इथे कुठे बाजूला तर गेले नाहीत ना? टेबलावर आणखी बाजूलाच त्यांचा पाणी प्यायचा
तांब्या-पेला दिसला आणि त्यांनी बालपणी याच पाण्यामुळे भोगलेल्या यातनांचे प्रसंग चटकन
डोळ्यासमोर झर्र्कन येऊन गेलेच. बाबा चालताना वापरात असलेल्या ऊर्ध्वबाजूला अर्धगोल असलेल्या
५/६ काठ्याही नकळतपणे खूप काही सांगून जातात. टेबल-खुर्ची भोवती आणि खोलीभर मोठमोठाले
ग्रंथ फर्निचरी कपाटात व्यवसथितरित्या लावलेले पाहिले. त्यातील एका समोरील कपाटावर
दोन फुटी तथागत बुद्धांची अगदी खरंखुरं चीवर परिधान केलेल्या उभ्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन
आम्ही दुसऱ्या खोलीत गेलो. तिथे बाबासाहेबांची जेवणाची भांडी, बाथ-टब, माता रामाईचं
ओरिजिनल छायाचित्र पाहून बाबासाहेबांचा संसार डोळ्यासमोर उभा राहतो. तसेच रमाईंच्या
देहांतानंतरच्या वैफल्यग्रस्त मन:स्थितीतील छायाचित्राने रमाईवरील त्यांच्या
प्रेमाचं प्रत्यंतर आल्यावाचून राहत नाही. त्याच्या बाजूलाच बाबांची बैठक खोली आणि
भिंतींच्या चाहोबाजूनी व्यापून टाकलेली हिस्टोरिकल छायाचित्रे पाहून
बाबांची कारकीर्द आणि त्यांनी आयुष्यभर केलेला विषमतेविरुद्धचा संघर्ष बोलका होतो.
शेवटच्या रांगेत ब्लॅक अँड व्हाईट छबीतला बाबांच्या अंत्ययात्रेचा आणि या अंत्ययात्रेला
त्यांच्या अनुयायांचा चैत्यभूमीच्या अरबी समुद्रावर लोटलेला महासागर पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रति त्या राजगृहात
अश्रुंचे दोन थेंब अखेर ठिपकलेच.
त्याच्या पुढच्या खोलीत थायलंड देशाने खास राजगृहासाठी
भेट म्हणून अर्पण केलेली तथागत बुद्धांची पांढरीशुभ्र ध्यानमुद्रेतली सुमारे ८ फुटी
मूर्ती इतक्या जवळून डोळ्यात मावत नाही. डोक्यावर पांढरी शुभ्र त्या देशाची संस्कृती
ल्यालेली गोलाकार सुबक आकाराची छत्री लक्षवेधी ठरते. बुद्धाच्या चेहऱ्यावरील असीम करुणामयी मुद्रेकडे पाहता-पाहता
एव्हाना मंद आवाजातील 'बुद्धमं शरणं गच्छामि'चा ध्वनी मोठा होऊन तो हृदयात खोलवर जात
असल्याचा विलक्षण अनुभव आला. ज्याने शुद्धोधनासारख्या शूरवीर पराक्रमी राज्याचे विशाल साम्राज्य, विपुल धनसंपत्ती, यशोधरेसारखी रूपवान, शीलसंपन्न पत्नी व गोंडस राहुल या सर्वांचा त्याग करून तो अखंड मानवजातीच्या दुःखाचे, वैराचे, अत्याचारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विपश्यनेतून सम्यक संबोधी प्राप्त करून साऱ्या अंधःकारी जगाला प्रज्ञेचा नवा प्रकाश दाखविला ते विश्वदीप, करूणेचा महामेरू तथागत गौतम बुद्ध आणि ज्याने अतुल्य अशा शिक्षणाच्या उच्च शिखरावर जाऊन स्वतःचे वडील, पत्नी, मुलं आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष्य करून माझ्यासारख्या लाखो कुटुंबांसाठी
अहोरात्र चंदनापरी झिजला त्या थोर महामानवाचे-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुनःश्च दर्शन घेऊन
राजगृहाच्या बाहेरील दरवाजात असलेल्या नोंदवहीत राजगृह भेटीने धन्य पावल्याचा अभिप्राय
लिहून आम्ही दोघं पती-पत्नी तृप्त मनाने आणि नवचैतन्याने या आमच्या प्रेरणास्थळाचा-राजगृहाचा अखेर निरोप घेतला.
https://www.youtube.com/watch?v=kFUD_9amtBY&app=desktop
https://www.youtube.com/watch?v=kFUD_9amtBY&app=desktop
*******
सुरेख अनुभव
उत्तर द्याहटवा