रविवार, २६ एप्रिल, २०२०

तुझ्या स्मृतींचा खजिना उलगडता उलगडता...

तू लाख हिफाजत कर ले
तू लाख करे रखवाली
उड़ जाएगा एक दिन पंछी
रहेगा पिंजरा खाली...

तू कसा विसरशील ही अजरामर कव्वाली... ती तर तुझ्या नेहमीच  मुखात असे. किती सहज गायचास... पण आम्हाला मात्र इतक्या सहज आणि अवेळी हा तुझा संसार रुपी पिंजरा रिकामा टाकून पक्षासारखा भुर्रकन निघुन जाशील याची जराही कल्पना नाही आली रे. तू अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे साऱ्यांना जीव लावणाऱ्या जिवलग्याचा जीव इतक्या सहज आणि लवकर जावा ही वेदनाच आम्हाला असह्य आहे. जणू पांडुरंगाच्या मनोऱ्याचा पाचवा खांब निखळून पडलाय... स्नेहभावाने, बंधुत्वाच्या नात्याने गुंफून ठेवलंस तू प्रत्येकाला आणि हीच जोडलेली माणसं तुझ्या जाण्याने हळहळतायत... चटका लावलास तू साऱ्यांच्या काळजाला...

तुझं चंद्रमणी हे नाव फार थोड्याच लोकांना माहीत असावं. सारा गाव आणि या पंचक्रोशीचा तू 'बंधू' म्हणजे भाऊ म्हणजे सखा सोबती.

आयुष्यभर तू कधी पैशाच्यापाठी धावला नाहीस. तू धावलास... तू धडपडलास... तू भोवलास... तो केवळ ऋणानुबंधाचा, स्नेहाचा, बंधुत्वाच्या नात्याचा सडा शिंपडीत... जितकं आहे त्यात समाधानी असण्याच्या गुणामुळे तू कसल्याही लोभाला कधीही जवळ केले नाहीस. खराखुरा जगलास तुझ्या 'बंधू' या नावाला. हीच तुझी खरी कमाई आहे.

भावांमध्ये तू पाचवा आणि शेवटच्या क्रमांकाचा त्यामुळे आधीच सर्वांचा लाडका. माझ्या आईबापाचा तर जणू मुलगा होतास तू! आमच्यासोबत लहान होऊन बागडलास... खेळलास... तू आमच्यात इतका समरस झालाच की पुढे आम्हाला तू चुलता कमी भावासारखा-मित्रासारखा जिव्हाळा दिलास. आमचा दादा म्हणजे राजेंद्र आणि तू तर सख्खे मित्रच असे माझे आई-वडील अनेकदा कौतुकाने म्हणत. मी अर्धवट ठेवलेले जेवणाचे ताट अर्धवट राहिलेला खाऊ मोठ्या मायेने तू ग्रहण केलास. मी स्वतःला खूप धन्य समजतो कारण मला तुझा खूप सहवास मिळाला. तुझ्याकडून शिकण्यासारख्या तशा अनेक गोष्टी होत्या. तथागतांचा आणि बाबासाहेबांचा अभिमान तुझ्या रक्तात भिनलेला. त्यांच्या घडलेल्या प्रसंगांचे तपशीलवारपणे कथाकथन करण्याची तुझी हातोटी, ऐकणाऱ्यांची उत्कंठा आणि संपूर्ण लक्ष वेधून घेण्याची कला तुझी वाखाणण्याजोगी होती. तुझे बोल कानात प्राण आणून ऐकतच राहावं असं वाटायचं... बरं एखादी नवीन गोष्ट आमच्या सारख्या लहानांकडूनही जाणून घेण्याची तुझी जिज्ञासू वृत्ती ही तितकीच विलोभनीय.

मुंबईसारख्या मेट्रोसिटीतील लायसन असणारा तूच पहिला ड्रायव्हर असावास आपल्या परिसरात. मी तुझ्याकडूनच ड्रायव्हिंगचे पहिले धडे घेतले. तूच शिकवलीस मला त्या घाणेसड्यावर सायकलवरच्या कसरती... तू पुढे आणि मी दोन्ही हात मोकळे सोडून मागे क्यारियरवर उभा... तर कधी तू मागे असायचास... कसरतींचा सराव करताना कितींदा तुझ्या-माझ्या ढोपरांनी-कोपरानी तिथला रेवा खाल्लाय हे आठवतंय ना तुला..?


तारुण्यातल्या तुझ्या कपड्यांचा पेहराव, तुझ्या त्या घनदाट केसांची स्टाइल व बोलण्याची लकब विलोभनीय असायची...
माझ्या आयुष्याला एक वेगळा सर्वात महत्त्वाचा आयाम घालून दिलास आणि त्या आयामातून पुढे मी ज्या कलेशी समरस झालो ती कला म्हणजे तुझं गाणं... अगदी सहज बोलता बोलता तुझ्या अंतरंगातील उचंबळून आलेल्या भावना शब्दबद्ध करून गीतं रचणारा तू इतका महान कवी-गीतकार आणि सुमधुर आवाजाचा गायक तू माझ्यासोबत होतास... तासंतास तू आणि मी गाणी गात राहायचो. हाताला लागेल ते घेऊन तुझ्या गाण्याला ठेका धरायचं भाग्य मला लाभलं. प्रत्येक गीतातल्या भावनाप्रधान शब्दांचा वर्षाव, आवाजातील सुरांचा लहेजा आणि ताल व लय या साऱ्यांची गुंफण माझ्या अंतरंगात त्या बालवयातच विणली गेलीय. माझ्यात संगीताची बीजं रोवणारा तू माझा पहिलावहिला गुरु आहेस बंधू! तुझा आवाज, तुझी गीतातील शब्दफेक आणि ती नजाकत हुबेहूब महाराष्ट्र लोकसंगीताचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचीच भासत असे. त्यामुळे तुझं गाणं डोळे मिटून ऐकलं तर समोर आनंद शिंदेच गात असल्याचा भास व्हायचा. आनंद शिंदेंचा तू खूप मोठा फ्यान होतास. त्यांनी गायलेली सर्व गीतं तुझी तोंडपाठ होती आणि ती तू शिंदेशाहीच्या ठसक्यात गाताना रसिकांना भुरळ घातलीस आणि आपले एक विश्व निर्माण केलेस. तू ह्या पंचक्रोशीचा आनंद शिंदे आहेस!

बंदू तुला नाही माहित तू माझ्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कलेबद्दलचे किती पैलू सजविलेस. प्रत्येक गीताला एक इतिहास असतो. आणि हाच इतिहास जाणून घेण्याची जी मला सवय झाली ती आजही तितकीच तीव्र आहे.

एकदा मी पाचवीसहावीत असताना माझ्यातली ही कला ओळखून गवळीवाड्याच्या एका जंगी सामन्यात तुझा प्रतिस्पर्धी म्हणून तू मला 'काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं' हे कोपरखळी असणारं गीत गाण्याची संधी दिलीस... मी ही ते खूप जोमाने गायलो. त्यानंतर तू माझ्या गाण्याला उत्तर देताना 'काय ह्या पोराच खेळं बाहुलीशी लोळं' हे गीत गाऊन तू उपस्थित रसिकांचे खुप मनोरंजन केलेस. आज त्या क्षणाची आठवण झाली की मला माझ्यासह तुझेही हसू आल्यावाचून राहत नाही. तू खऱ्या अर्थाने गाणं जगलास. चोवीस तास गाणं तुझ्या मनात गुंज घालीत असायचं. वडिलांच्या चिरेखाणीवर गाडी चालवतानाही तुझं गुणगुणनं कामगारांपासून सर्व लोकांना मोहीत करायचं. या कलेबद्दलची तुझी महत्त्वाकांक्षा ही तेवढीच प्रबळ आणि तिच्या जोरावर तू आनंद शिंदे यांच्या मैफिलीत जाऊन बसलास. आनंद शिंदे रोज तुला घ्यायला व सोडायला स्वतः जातीने यायचे हे आम्हाला जेव्हा आमची सुजाता आक्का सांगायची ना तेव्हा आजोबांपासून आम्हा सर्व बालगोपाळांची छाती अभिमानाने फुगायची. आनंद शिंदेंसोबतची तुझी काढलेली छायाचित्रे खूप बोलकी वाटतात. कवालीच्या दौऱ्यांमुळे त्यांच्यासोबत तू महाराष्ट्रभर फिरलास. मुंबईतील मोठ-मोठे रेकॉर्डिंग स्टुडिओ पाहायचं भाग्य तुला लाभलं. आनंद शिंदेंचा सहगायक म्हणून जागा मिळवून तू पवार परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलास. जणू त्यांच्या गळ्यातला ताईत झालेला तू मात्र गावच्या ओढीने फार काळ रमला नाहीस तिकडे आणि मुंबईतून परतलेला तू गावात आणि इतरत्र जिथे संधी मिळेल तिथे आपल्या कलेचा आविष्कार दाखवून देत होतास. भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेबांच्या जयंती असो, लग्न बारसे हळदी समारंभ असो; तू तिथल्यातिथे गीत रचून सादर करण्याची हातोटी तुझी विलक्षण होती. सलाम आहे बंधू तुला!

यापूर्वी तीन वेळा मरणाच्या दारातून परत आलेला तू अवलिया आहेस. तुझ्या अल्सरच्या ऑपरेशनला आणखी दहा मिनिटे उशीर झाला असता तर तुझं काही खरं नव्हतं असं माझ्या वडिलांकडे डॉक्टरांनी कबूल करून ऑपरेशन यशस्वी केलं. त्यानंतर तुझा पावस ठिकाणी भल्या मोठ्या उतारात झालेला वाहनाचा अपघात आणि त्या अपघातातून बालंबाल  वाचलेला तू आणि त्यानंतर रत्नागिरीतल्या एका विहिरीत रात्रीच्या गडद अंधारात खोल पाण्यात पडूनही तू पंपाच्या पाईपच्या सहाय्याने पकडत पकडत विहिरीच्या काठापर्यंत आलास खरा; पण तुझा हा वनवास इथेच संपला नव्हता. एका हाताच्या अंतरावर विहिरीचा काठ आलेला असताना तुझा हात सुटून परत खाली कोसळलास... तरीही जिवाची बाजी लावून मरणाला परत पाठवणारा सिकंदर बादशहा तू जगलास तो तुझ्यातल्या प्रचंड स्ट्रॉंग असलेल्या विलपॉवरमुळेच. या विलपॉवरच्या बळावरच तू आज पर्यंत मृत्यूला अनेकदा हुलकावण्या दिल्यास आणि स्वच्छंदीपणे जगण्याचा आनंद तू  उपभोगलास. पण याच स्वच्छंदी जगण्याच्या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे तू व्यसनाच्या आहारी गेलास. बस, फक्त हीच गोष्ट आम्हाला तुझी रुचत नव्हती. कित्येकांनी तुला काळजीपोटी ती सोडण्याची विनवणी केली पण ती तू कधीच गांभीर्याने घेतली नाहीस आणि जेव्हा खरंच वेळ निघून गेली त्यावेळी तुला याचा पश्चाताप झाला होता. रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलात तू ही गोष्ट कबूल करताना तुझे डोळे डबडबून आले होते. पण आता खरं तर कोणाच्याच काही हातात राहिलं नव्हतं. आम्ही सर्वजण तुझी अवस्था पाहून तीळतीळ तुटत होतो कारण तुझी प्रकृती दिवसेंदिवस हाताबाहेर जात होती.

निरभ्र आकाशाप्रमाणे स्वच्छ स्वभाव या तुझ्या स्वभावाचा काहींनी गैरफायदा घेतल्याची खंत तुझ्या मनात सल करून होती.

अरे तू कॉटवर असतानाही तुझ्यातला विनोदी कलाकार स्वस्थ बसत नव्हता. कॉमेडीचा ह्युमर तुझ्या नसानसात होता. त्यामुळे तू जीवनाच्या अखेरपर्यंत दुसऱ्यांना हसवलंस. स्वतः हसता-हसता तुझा आजारही तू हसण्यावरच घेतलास आणि हसत-हसत असाच अखेर तू आम्हा सर्वांना रडवून गेलास. तुझा अंत तुला दिसून आला त्यावेळी ज्यांनी तुला आपल्या मुलाप्रमाणं जोपासलं तो तुझा दादा माझे वडील यांना तू एकांतवासात तुझ्या मनातील अधुऱ्या राहिलेल्या गोष्टी, दुःख आणि शेवटच्या इच्छा बोलून दाखविल्यास आणि या तुझ्या इच्छा वडीलकीच्या नात्याने माझ्या बापाने ऐकून घेऊन तुझ्या पाठीशी खंबीर राहिल्यामुळे तू आज निर्धास्तपणे शांत मनाने या जगाचा निरोप घेतलास. जसं लहान मूल आपल्या आई-वडिलांकडे आपली व्यथा मांडतं ना तसंच तू तुझ्या दादाकडे व्यक्त होऊन तू मोकळ्या मनाने मृत्यूला सामोरा गेलास. तूच म्हणायचास ना... तुझ्या या दादाची करुणेची किमया... आणि या किमयेमुळेच अनेक लोक आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात तुझ्या दादासारख्या सच्चा माणसाच्या सानिध्यात येतात म्हणुन... आणि तू... तू तर त्याचा सख्खा रक्ताचा हाडामांसाचा भाऊ... तो तुलाही कसा टाकेल... आणि ते ही तुझ्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात..?  भाऊ नव्हे तर बापासारखी माया दिली तुला त्यांनी आणि तुही अखेरपर्यंत तुझ्या दादाला सारखी सारखी साद घालीत होतास.

मी नोकरीनिमित्त मुंबईत असताना तू एकदा गाडी घेऊन तिकडे आल्याचा लैंडलाइन वर फोन आला. मी लागलीच परळच्या हायवेला त्या सोनबा येलवेसारखी तुझी ३/४ तास वाट पाहत उभा होतो. त्यावेळी मोबाईल नव्हते. MH08 नंबर प्लेट असलेले ट्रक डोळे फाडून पहात होतो. मात्र तुझी माझी गाठ काही झालीच नाही. दुसऱ्या वेळी मात्र तुझ्या भेटीसाठी मी परळहुन पनवेल गाठले. तुझ्या भेटीसाठी आतुर झालेलं माझं मन सद्गदून आलं होतं. तेव्हा तू मारलेली मला मिठी आज मात्र मला पोरकी करून गेली.

त्यानंतर तू मला स्वतःच्या पासपोर्ट साईज फोटोसह एक चिठ्ठी लिहिलीस. त्या चिठ्ठीत तुझ्या कलेचं स्वप्न मुंबई सोडल्यामुळे अर्धवट राहिल्याचं सल तू मांडलेस. त्यात पुढे मला तुझा आवडता गायक आनंद शिंदे यास भेटून तुझा रेफरन्स देऊन माझा आवाज त्यास ऐकावयास सांगितलेस. बंदू खरं सांगतो, मी ही दोन वेळा त्यांना गोरेगावला भेटण्याचा प्रयत्न केला पण  दुर्दैवाने आनंद शिंदे यांची भेट काही होऊ शकली नाही. त्याबद्दल माफ कर मला.

तुझे हे कलागुण उतरलेत तुझा मुलगा अभिजितमध्ये. तो ही गीतरचना करतो अधून-मधून. तुझी छबी मला दिसते त्याच्यात... तुझा वसा असाच पुढे चालत राहो... तुझे नाव अखंड चालत राहो... अखंड चालत राहो... तुझ्या जाण्याने खचून गेलेल्या पत्नीसह तुझ्या मुलांना पुन्हा उभे राहण्याचे बळ येवो. तुझ्या पेक्षाही उंच उंच भरारी घेऊ दे त्यांना. त्यांच्या यशाने तू नक्कीच सुखावशील.

केवळ पाच दशकं लोकांच्या मनात बंधुभाव निर्माण करून अर्ध्यावरच आपला डाव संपून आम्हाला चकवा देऊन तू अनंतात विलीन झालास. फसवलस तू आम्हाला... सोडलीस तू आमची साथ अर्ध्यावरच... तरीच कोरोनाच्या लोकडाऊनमध्ये मी मुंबईत अडकलोय हे समजल्यावर तू मला फोन करून आणायला सांगितलेला आलेपाक हा तुझा केवळ बहाणा होता. तुला माझ्याशी बोलायचं होतं हे मला आता उमजून येतंय... तरीच आमच्या दोघांच्या मनात पाल चुकचुकली अन क्षणभर सर्वांमध्ये नीरव शांतता पसरली... तू बोललास पोटभर आमच्या लहानग्या कौशलकडे... तू मायेने हात फिरवलास आमच्या लहानग्या मोक्षदच्या चेहऱ्यावरून... काय तुला हेच साध्य करायचं होतं का..? तू फसवलंस आम्हाला... सोडलीस तु आमची साथ अर्ध्यावरच...

या माझ्या पहिल्यावहिल्या गुरुला-बंदूला गुरुदक्षिणा म्हणून माझी ही शब्दसुमनांजली...
बंदू खूप काही गोष्टी राहून गेल्या नाही मांडता येत त्या उपऱ्या शब्दातुन...
तुझ्या स्मृतींचा खजिना उलगडता उलगडता
अश्रूंचा पूर ही कोरडा होतो
आणि समोर उभा राहतो
निरागस सोज्वळ मायाळू दयाळू
सर्वांचा बंधू तू.
फक्त तूच बंदू... फक्त तूच बंदू...
तुला निर्वाण प्राप्त होवो..!
                         - तुझा जितू

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

तरीही मी शोधतो आहे...

सिंबोल ऑफ नॉलेज विश्वरत्न क्रांतीसुर्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

मी शोधतो आहे...

बा भीमा, तू सांगितले म्हणून शिकलो आम्ही
तेही अर्धवट-
शंभर शकलं आणि त्या-त्या पुढार्‍यांनी केले आम्हा असंघटित,
आणि संघर्षाचं म्हणाल तर लढतो आम्ही फक्त भावाभावात अन् गावागावात

इथल्याच मातीतला पण लुप्त झालेला बुद्ध त्याचा धम्म तूच दावलास आम्हा जरी
अरे तो बुद्ध दूरच इसवीसन पूर्वीचा पण आम्ही कुठे समजू शकलो तुला तरी

स्वातंत्र्य समता बंधुत्वाची आगळीवेगळी लोकशाही तुझी
खरच नांदतेय का इथे ?
पोलिसांपासून बरीचशी खाती भरतायत आपापले खिसे
चोराला सोडून संन्यासाचा बळी अन् वजनी हातानुरुप न्यायाची खेळी

तुला अभिप्रेत असलेला समाज मी शोधतो आहे माझ्याच बांधवांत
अरे तू दिलेल्या बावीस प्रतिज्ञा तुझ्याच अनुयायांनी गुंडाळाव्यात?

प्रकांड पंडितांचा रोष पत्करून तू केलेस देव-देवतांचे मूर्तिभंजन
पण आजही देव्हारे दिसतायेत तुझ्याच अनुयायांच्या घरात
कुठे गेले तू घातलेले अंधश्रद्धेचे अंजन?

मोठ्या दिमाखात साजरी करतो आम्ही बुद्धासह तुझी जयंती
मिरवणुका डीजे ढोलताशासंगे त्यात हिडीस कृत्य व मर्कटलीला त्या तळीरामांची

प्रत्येकजण समजू लागलाय स्वतःला आंबेडकर वाचून दोन चार पुस्तकं
पण खरच प्रगल्भ झालीत का हो यांची सुस्तावलेली मस्तकं?

मूलनिवास्यांचा खरा शत्रू हेरून तू नायनाट केलास त्या मनूच्या स्मृतीचा
पण आज गुप्तपणे पुन्हा उभी होऊ पाहतेय ती लक्ष आहे का तुझ्या अनुयायांचा?

तुझ्या शिकवणींचे आचरण आज करतायत कुणबी भंडारी या इतर जाती
आणि तुझे अनुयायी..? अरे तुझे अनुयायी तर आपापसात लढून खातात माती

झालेत नाममात्र कवी आज चळवळीतले एकेकाळचे वाघ कार्याचा विसर पडल्यावर कोण करणार नाही टिंगळ, टवाळ्या आणि विडंबन-
तरीही केंद्रात जाऊन बसलेल्याला कसा येत नाही राग?

शंभर वर्षांपूर्वी आरक्षणाविना तू झालास डॉक्टर
पण आम्ही सत्तर वर्षे होऊनही नाही होता येत साधे पदवीधर

तथागत बुद्धासह तुलाही मागे खेचायला इथे हितशत्रू आहेत का कमी?
पण खरं जास्त वेगाने मागे आणताहेत तुझेच महाभाग अनुयायी.

बा भिमा आयुष्यभर भोगल्यास तू अन्यायाच्या मरणयातना
पण याच अन्यायकर्त्यांसकट उद्धार केलास तू साऱ्यांचा त्या संविधानाने
तरी आजही तुला फक्त दलितांचा नेता म्हणून पाहतो सारा दलितेतर समाज
तुझा त्याग तुझे समतेचे कार्य बंधुत्वाची कणव आणि न्यायप्रधान विवेक आजही नाही कळला त्या विवेकांना

तरीही मी शोधतो आहे माझ्या धम्मबांधवांत तुझा तो क्रांतिकारी लढा झुंझार..!
तरीही मी शोधतो आहे माझ्या धम्मबांधवांत बुद्धधम्माचा संघाचा संचार.!!
           - जितेंद्रकांत
             (१४ एप्रिल २०२०)

गुरुवार, ५ मार्च, २०२०

डॉक्टरकीच्या पलीकडले डॉक्टर : डॉ. ए. डी. कांबळे


डॉक्टरकीच्या पलिकडे डॉक्टर : डॉ.ए.डी. कांबळे
ऑफिसचं शिफ्टिंग केल्याचा दुसरा दिवस... नुकतंच ऑफिस उघडून कामाला सुरुवात केलेली... इतक्यात वडीलांच्या मोबाईलवरुन डॉक्टरांचा आवाज ऐकून क्षणात परिस्थितीचा अंदाज आला. कारण यापूर्वी दोन तीन वेळा अशीच डॉक्टरांच्या फोनने आमची पळापळ झाली होती... 'हार्टबीट्स बिघडलेयत... इसीजी काढलाय... यु हॅव टू क्वीक ॲडमिट हिम टू रत्नागिरी... इमिजिएटली... तूला रत्नागिरीतून इकडे यायला एकदीड तास जाईल त्यापेक्षा मी सांगतो काय करायचे ते...' असं म्हणून फोन कट झाला. माझ्यासमोर बसलेल्या कस्टमरचं घेतलेलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होतो खरा मात्र मनाची चलबिचलता खायला येत होती... काहीच मिनिटांत परत वडीलांच्या फोनवरून बहिण बोलत होती, 'सर ओपीडी टाकून स्वत: निघालेयत आपली गाडी आणि सर्व साहित्य घेवून.' स्वत:ची गाडी आणि औषधं घेवून सर स्वत: निघाले म्हणजे नक्कीच तब्बेत डेंजरझोनमध्ये असणार हे मला कळून चुकलं होतं... मला धीर देत माझ्या पत्नीने ऑफिस आवरलं आणि आम्ही लागलीच हॉस्पिटल गाठलं... एकेक क्षण युगासारखा वाटू लागला होता... सरांनी गाडी अवघ्या पाऊण तासात हॉस्पिटलच्या स्टेप्सजवळ लावली... ऑन दी वे असतानाच सरांनी लोटलीकर डॉक्टरांशी बोलल्यामुळे ते तडक डॉक्टरांच्या केबिनमध्ये वडीलांना घेवून गेले. डायग्नोसिस झाल्यावर ताबडतोब आसीयुपर्यंत सर स्वत: हजर राहून सर्व ट्रीटमेंट करवून घेत होते... जाताना ओपीडी टाकून आल्याचं सरांना बोलताच, 'अरे आपला हा पेशंटही महत्वाचाच की रे. क्विक डिसीजन घेतला म्हणून बरं झालं,' असं म्हणून माझ्या पाठीवरून हात फिरवून सर तशाच भरधाव वेगाने परत आपल्या हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेले... जशी त्यांची पांढरी शुभ्र आलिशान गाडी पुन्हा वाऱ्याशी स्पर्धा करु लागली तशी माझ्या कृतज्ञतापूर्वक विचारांचीही... किती जिव्हाळा, किती माया, किती आपलेपणा ह्या एवढ्या मोठ्या माणसात..!


असं म्हणतात की, प्रत्येक माणूस एक नवं पुस्तक असतो. पुस्तकं वाचता वाचता माणसंही वाचायला शिकलं की त्या माणसाच्या आपण कधी जवळ जातो आणि परस्परांमध्ये कधी ऋणानुबंध निर्माण होतात ते स्वत:लाही कळत नाही. बरेचदा आपण एकदुसऱ्याबद्दल गरज नसताना आणि त्या व्यक्तीला पुरेपूर ओळखत नसतानाही सहजपणे त्याच्याबद्दलचे बरेवाईट मत व्यक्त करीत असतो. अशाने आणखीनच एखाद्याबद्दल समज-गैरसमज निर्माण होतात. कधी कधी हेतूपुरस्सरही या गोष्टी घडविल्या जातात. दूरून एखाद्याबद्दचे निश्चित असे मत योग्यपणे मांडले जावू शकत नाही. यात उणीवा-अतिरेकही घडू शकतो. त्यासाठी त्याच्या जवळ गेल्याशिवाय एखाद्याची खरी पारख करता येत नाही. मला आजवर भावलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे खंडाळ्याचे धन्वंतरी हॉस्पिटलचे डॉ. अनिलकुमार देवाप्पा कांबळे! (बी.एस.सी.एम.बी.बी.एस.)

आवाजात प्रखरता आणि चेहऱ्यावर वैद्यकीय विद्वत्ता लाभलेल्या डॉक्टरांची तितकीच सामाजिक संवेदनाही त्यांच्याशी बोलताना अधूनमधून डोकावतेच! त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे त्याच पहाडी आवाजात स्वागत करणाऱ्या डॉक्टरांची पहिल्यापहिल्या कुणालाही थोडी भिती वाटली नाही तरंच नवल. पण जसजसे विचारांचे पैलू एकामागोमाग उलगडत जातात तसतसे परस्परांची अंतरं नाहीसी होतात आणि ते कधी आपलंस करुन टाकतात ते उमगतंच नाही.

      अडीच दशकांपूर्वी सर वाटद खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले खरे पण फार काळ ते नोकरीमध्ये रमले नाहीत. आयुष्यात रिस्क घेण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी वेलसेटल्ड पगाराची नोकरी झुगारून देवून येथेच स्वत:चे क्लिनिक सुरु केले. 'नोकरी म्हणजे गुलामी' हे जणू त्यांचं ब्रीद! आणि विशिष्ट चौकटीत राहून स्वत:ला बंदिस्त ठेवणे कधीच पसंत नसलेले डॉक्टर गरीबातील गरीब रुग्णांची ते जीव लावून सेवा करु लागले. वैद्यकीय पदवीची शपथ ग्रहण केल्याची त्यांच्यामध्ये सतत जाणीव असल्यामुळे गोरगरीबांना अशक्य असणाऱ्या आजारातून बाहेर काढणे अविरतपणे सुरुच आहे; कोणाकडूनही पैशांची अपेक्षा न करता. आजही मी अनेकदा पाहिलंय गरजू रुग्णांना मोफत उपचार करताना, औषधकंपन्यांनी दिलेल्या Not for sale ची सॅम्पल्स गरजूंना देताना. आज पंचक्रोशीतच नव्हे तर दशक्रोशीतून डॉक्टरांना शोधत-शोधत येणारे रुग्ण जेव्हा बरे होऊन जातात त्यावेळी डॉक्टरांच्याप्रति रुग्णांच्या मनातील कृतार्थ भाव पाहणाऱ्याला सर्व काही सांगून जातो. आज या परिसरातील गरीबातील गरीबापासून ते श्रीमंत व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक, राजकीय पुढारी (डॉक्टर पुढाऱ्यांना गंमतीने 'कार्यकर्ते' म्हणतात), नोकरवर्ग, रिक्षाचालक, ड्रायव्हर, विद्यार्थी ते अगदी युपीबिहारी कामगारवर्ग या सर्व घटकांमध्ये डॉक्टरांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा दृढ विश्वासाने येतो आणि जाताना तरतरीत होवून जातो. पेशंटकडून जितकी फीस घेतात त्याच्या कितीतरी पटीने त्यांच्या हातून समाजसेवा घडते हे खरंतर फार थोड्याच लोकांना माहित आहे... त्यांना कौतुकाची-प्रसिध्दीची आस नाही. सामाजिक सेवा करण्याचे व्रत घेतले ते आजही अबाधित आहे. आणि त्यास त्यांची अर्धागिनी - आमची काकी तितक्याच खंबीरपणे पाठीशी उभी आहे... खरंच आदर्श पतीपत्नी असंच वाटतं त्या उभयतांकडे पाहून... सरांच्या मनात प्रत्येकाबद्दलचा जसा कृतार्थभाव असतो तशीच पत्नीविषयीची कृतज्ञता अनेकदा त्यांच्या बोलण्यातून जाणवते.



अनेक वर्षे सर येथील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयांना दरवर्षी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करुन त्यांना देणगीच्या व शैक्षणिक स्वरुपात सहाय्य करतात कुठल्याही प्रसिध्दीची अपेक्षा न ठेवता. आपली दोन्ही मुलं ज्या प्राथमिक शाळेत शिकली त्या शाळेत तर  प्रजासत्ताक व स्वातंत्री दिनी आवर्जुन उपस्थित राहतात. यातून सरांची शिक्षणाविषयीची आत्मियता व जिव्हाळा दिसून येतो.

      आज त्यांची मुलगी डॉक्टर वनश्री ही एम.डी. आणि मुलगा शुभम हा एमबीबीएस होतोय याचा आनंद त्या उभयतांच्या चेहऱ्यावर आहेच. कोकणातल्या ग्रामीण भागात राहून आपल्या दोन्ही मुलांना उच्चविद्याभूषित करणे ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात उतरवलीय. कारण प्रतिकुल परिस्थितीवर मात करत वडीलांनी पाहिलेलं स्वप्न साकार करून सर एम.बी.बी.एस. झाले खरे पण खरं तर त्यांना कोल्हापूर-सांगली सारख्या शहरात एम.डी. होवून रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न अधुरं राहिल्याचं सर अनेकदा बोलताना व्यक्त करतात. पण मुळातच महत्वाकांक्षी असणारे डॉक्टर त्यांच्या अंतर्मनातील स्वप्न ते आता आपल्या मुलांकडून पूर्ण करून घेतायत आणि त्यांची मुलंही तितक्याच ऊर्जेने हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतायत यापेक्षा समाधान ते काय आहे?
      आपल्या दोन्ही मुलांना अभ्यासाचे कोणतेही क्लास न लावता जणू स्वत:चाच अभ्यास असल्यागत सर त्यांची तयारी करून घेतात. मुलांसोबत रात्ररात्र जागणर करून परत दुसऱ्या दिवशीचं काम तितक्याच उत्साहाने व लिलया सांभाळतात. त्यासाठी त्यांना अनेक त्याग करावे लागलेयत... डॉक्टर म्हटलं की सतत पेशंटच्या सहवासात येणं हे ओघाने आलंच. नवनवीन येणाऱ्या रोगांचा विषय निघाल्यावर कधी कधी डॉक्टर नकळतपणे, 'मी का केलं माझ्या दोन्ही मुलांना डॉक्टर..?' असं बोलून जातात आणि काही क्षण निरव शांतता पसरते. प्रगतीच्या शिखरावर पोहोचत असलेल्या आपल्या मुलांची अजूनही काळजी आणि आभाळाएवढी माया शेवटी बापच करणार नाही तर कोण..? शेवटी डॉक्टर हे देखील माणूसच ना आणि आईबापाची माया, काळजी हे ओघाने आलंच.
      त्यांची कर्तुत्ववान मुलं आज उच्चविद्याभुषित डॉक्टर होत असली तरी त्यांची अभ्यासाची तयार ही सरांनी त्यांच्या बालपणापासूनच करून घेतलेली आहे. पण आपणाला मात्र एरवी लक्ष नसलेल्या वृक्षाला जेव्हा फळं-फुलं येतात तेव्हाच ते नजरेला येतं; तसंच त्यांचा मुलगा कोणतेही कोचिंग क्लास न लावता मॅट्रिक, बारावी आणि नीटच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करतो ना त्यावेळी परिसरातील इतर डॉक्टर व पालक आपल्या मुलांना घेऊन मार्गदर्शनासाठी सरांकडे येतात व सरही आपला व्याप सांभाळून त्यांचा अभ्यास करवून घेतात. यात त्यांना घवघवीत यश मिळवून देण्यास सरांचा सिंहाचा वाटा असतो. पण हे सर्व अगदी विनामुल्यच. तसेच रत्नागिरीतील प्रतिथयश डॉक्टरही खास आपल्या मुलांना घेवून खंडाळ्याची वाट धरतात आणि मग अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्यावर सरांचाही आनंद द्विगुणित होतो.
      सरांना पहिल्यापासूनच तंत्रज्ञान आणि त्याबद्दलच्या मेकॅनिझमचे कुतुहल. कॉम्प्युटर, टिव्ही ते अगदी मिक्सर पासून लाईट्सच्या स्विचपर्यंत प्रत्येक वस्तूची यंत्रणा तपासण्याचा जणू छंद ते फावल्या वेळेत करतात. एकदा त्यांच्या घरातल्या प्रिंटरवर त्यांनी केलेला प्रयोग गंमतीशीर आहे. प्रिंटरची महागडी कारट्रेजेस वारंवार बदलण्याच्या समस्येवर आपल्याच हॉस्पिटलमधल्या सिरींज व निडलच्या सहाय्याने उपाय शोधतात तेव्हा त्यांच्यातल्या सृजनशीलतेचं दर्शन होतं. जसं निपचित पडलेल्या पेशंटला आपल्या सलाईन व इंजेक्शनद्वारे तरतरीत करतात तीच थेरपी ते आपल्या प्रिंटरवरही लागू करून प्रिंटरला पुन्हा ताजातवाना करून त्या निर्जिव वस्तूतही प्राण आणल्याशिवाय डॉक्टरांना चैन कशी पडेल? वैद्यकीय क्षेत्राबरोबरच तांत्रिक अभियांत्रिकीत रस असल्यामुळे सर औत्सुक्यापोटी एखाद्या गोष्टीचा झपाटल्यागत शोध घेवून त्यावर उपाय शोधून तो अंमलात आणल्यावरच ते शांत होतात. चंद्रयान २ च्या अपयशानंतर सर जेव्हा भरभरून बोलू लागले तेव्हा तर त्यांना डॉक्टरी पेशापेक्षा सायंटिस्ट होण्यात फार रस असल्याचं जाणवलं. वैद्यकशास्त्रात निपुण तर होतेच पण त्यांची मॅथ्सवरची कमांड पाहून थक्क व्हायला होतं. एकदा कुडाळची भाची बारावीला असताना ती माझ्या सोबत हॉस्प्टिलला आली. सरांनी जाता जाता तिला फिजिक्समधल्या इक्वेशन्सचा बेसिक फंडा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला. त्यामुळे तिला याचा फायनल एक्झामला खूप फायदा झाल्याचं सांगून ती आजही सरांची आठवण काढते. पण म्हणून माणूस हा कायम विद्यार्थी असतो आणि तो असायलाच हवा असा त्यांचा आग्रह. त्यांच्यामते प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकण्यासारखे असते; मग तो लहान असा वा मोठा. कॉम्प्युटर, मोबाईलमधील फिचर्स सर लहानग्यांकडूनही तितक्याच तन्मयतेने समजावून घेतात.
      सरांच्या फर्निचरमध्ये खूप चांगली चांगली पुस्तके जतन करून ठेवलेली आहेत. पण आता व्यस्त जीवनशैलीमुळे वाचनाची आवड असूनही वेळ मिळत नाही. भूतकाळातील घटना कधी कधी सरांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्या खूप रोमांचकारी वाटतात. म्हणून सरांना बायोग्राफी लिहिण्याचे सुचवले खरे; पण त्यांच्या व्यस्त कामामुळे अजूनही त्या कदाचित शब्दबध्द झाल्या नसाव्यात असे वाटते.



सेवानिवृत्त वडील आज वार्धाक्यात अंथरुणाला खिळून असतानाही त्यांचा आपल्या या मुलाकडेच राहण्याचा आग्रह. सकाळ संध्याकाळ ओपीडी, रात्रीअपरात्री इमर्जन्सी यामुळे वेळेत आहार, पुरेशी झोप व विश्रांती नसलेल्या इतक्या बिझी शेड्युलमध्येही रिमाईंटर लावल्यागत सरांची पावले वडीलांकडे धावतात. त्यांची सर्व सेवा सर स्वत: करतात कुणावरही विसंबून न राहता. कधीकधी मदतीला त्यांचा मुलगा डॉ. शुभम आणि हॉस्पिटलातले सहकारी देखील असतात. आईवडीलांची मनापासून सेवा करण्याचे संस्कार ते अप्रत्यक्षपणे आपल्या मुलांवर देखील करतात.

      सरांचे आजचे यश पाहून कुणालाही हेवा वाटेल. पण हे सर्व उभारण्यापूर्वीचं त्यांचे स्ट्रगल लक्षात घेण्यासारखं आहे. बहिणीला वेळेवर पोहोचता यावं म्हणून वडील आणि स्वत: सायकलने पंधरा सोळा किलामिटर डबलसीट सायकलिंग करणे, तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून स्थीरस्थावर केले. हे करीत असताना दृढ होत जाणारी ऋणानुबंधांची गुंफण, सद्‌विवेकबुध्दीची कास आणि सहनशीलता या त्यांच्या अंगभुत पैलूंचा आयाम विस्तारत गेलाय आणि म्हणून आज इतक्या प्रगल्भ ज्ञानाने धीरगंभीरता लाभलेल्या व्यक्तीचा-डॉक्टरांचा लोकस्नेह हा दिवसागणीक वाढतच चालला आहे.
      सौहार्दपूर्ण मैत्रीचे संबंध जतन करणाऱ्या सरांच्या स्वभावामुळे रत्नागिरीपासून ते कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील निष्णात डॉक्टरांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. तिथपर्यंत जाणाऱ्या पेशंटचं काम नुसत्या फोनवरून तोबडतोब व अल्पदरात करुन देणारे डॉक्टर मला वाटतं या पंचक्रोशीतच काय दशक्रोशीतही नसावेत!
प्रत्येक रुग्णाची तपासणी करताना कामातील शिस्तप्रियता ते आपल्या सहकाऱ्यांनाही लावतात. मी अनेकदा पाहिलंय, पेशंट आत येतायेताच त्याचं निरीक्षण करुन त्याला काय व्याधी असावी याचे तर्कबुध्दीने परिक्षण करून मग त्याला तपासताना पेशंटच्या प्रत्येक देहबोलीची योग्यपणे सांगड घालतात. मला वाटतं कदाचित यातच त्यांच्या अचुक डायग्नॉसिसचं गमक असावं.


      धन्वंतरी हॉस्पिटलची डौलाने उभ्या असलेल्या इमारतीवर तथागतांच्या आशीर्वादरुपी हस्ताचे पेंटींग व आतमध्ये प्रवेश करतातच डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा नजरेस पडते. तथागत व बाबासाहेबांच्याप्रति असणारा अभिमान आणि त्या दोन्ही महामानवांच्या क्रांतीकारी कार्याचा सखोल अभ्यास सरांच्या बोलण्यातून दिसून येतो. तसेच काकीच्या माहेरचे सर्व उच्चशिक्षीत असून आंबेडकरी चळवळ आणि अंनिसच्या चळवळीशी निगडीत असल्याचे सर अभिमानाने सांगतात.

 माझ्याही प्रतिकुल परिस्थितीत मला सावरायचं काम केलंय ते सरांनीच! घरापासून जवळची बऱ्यापैकी पगाराची खाजगी कंपनीची नोकरी सोडली आणि स्वत:चा नवा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय सुरु केल्यावर काही दिवस खूप हालाकीत गेले. मी काहीसा खचून गेलो तेव्हा यातून मला सावरलं ते डॉक्टरांच्या दृढतापूर्वक सांगितलेल्या शब्दांनी. "नोकरी म्हणजे गुलामी-बॉदरेशन, तर स्वत:च्या व्यवसायात मिळतो तो आत्मसन्मान-सटिसफॅक्शन" हे सरांचे शब्द मला आजही स्फूर्तीदायक वाटतात.

      बरं, कुणालाही वाटेल की वैद्यकीय डिग्री आणि इतकी वर्षे अविरतपणे करीत असलेली प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिसमधून आलेले बरेवाईट अनुभव, कामाची शिस्तप्रियता त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गरजूंना सतत पुढे असणारा मदतीचा हात या आणि अशा अनेक गुणांमुळे धीरगंभीरता लाभलेले डॉक्टर 'अरसिक' असतील. पण हा अंदाज फोल ठरतो. सर जुन्या हिंदी-मराठी गाण्यांचे फार शौकीन आहेत. त्यांच्या गाडीमध्ये 'ओल्ड इज गोल्ड'चं मोठं कलेक्शन आहे. इतकंच काय, माझ्या युट्युबवरील अशाच एका जुन्या गाण्याचं सर आणि काकीही जेव्हा भरभरुन कौतुक करतात ना त्यावेळी त्यांच्यातला एक कलाकार दिसून येतो. अगदी कालपर्यंत मला माहित नसलेल्या आणखी एका कलेचा आविष्कार सरांकडे पहायला मिळाला. पेन्सिलने स्केचिंग करुन अमिताभ बच्चन, रेखा, सविता प्रभु (सरांची आवडती अभिनेत्री), भाग्यश्री पटवर्धन, लतादीदी तसेच आपल्या आजी-आजोबांचीही रेखाटलेली चित्रे अक्षरश: जिवंत व बोलकी वाटतात. ही चित्रं सरांनी कॉलेजात असताना काढलेली आहेत हे त्या चित्रांच्या खाली कोपऱ्यात लिहून ठेवलेल्या तारखांमुळे स्पष्ट होते. आजच्या टूƒƒ बिझी शेड्युलमधून सरांची ही कला आजही जिवंत रहावी यासाठी त्यांना त्यांच्याच एका खास व्यक्तीचं चित्र काढावयास सुचवलंय खरं... पहावूयात कधी पूर्ण होतंय ते.

लग्नसमारंभ, वाढदिवस वा अन्य कोणत्याही इन्व्हिटेशनचा आदर ठेवून सर वेळात वेळ काढून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. तर कधी हॉस्पिटलच्या वातावरणापासून दूर असताना पत्नीसह इतरांसोबत मिश्किलपणा साधून कामाचा ताण घालविण्याचा प्रयत्न करतात. पेशाने शिक्षिका असणाऱ्या माझ्या पत्नीच्या आजारपणाच्या वेदना तिला विसरविण्याचा प्रयत्न करताना डॉक्टर, 'शिक्षक हा एक नको तितका चिकित्सक प्राणी' असल्याचा मिश्किलपणा करुन त्यांचे वडीलही सेवानिवृत्त शिक्षक असल्याचे आवर्जून सांगतात आणि एकच हशा पिकतो. एकदा तर सर इतके व्यस्त असूनही आमच्या दोन छोट्यांसाठी हॉस्पिटलातल्या भिंतीवरील पालीचा गंमतीशीर सीसीटीव्ही फुटेज एडिट करून व्हॉट्सअपद्वारे पाठवतात तेव्हा सरांचं राहून राहून नवल वाटतं. त्यांच्यातल्या निर्मळ सरळसाध्या गुणांमुळे येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचा भरभरुन पाहुणचार करून कोकणच्या समुद्री माशांची मेजवानी होत असते. तऱ्हेतऱ्हेचे मासे स्थानिक लोक त्यांना सहज उपलब्ध करून देखील देतात. नानाप्रकारे लोकांचं प्रेम, सहकार्य आणि माणूकीचे संबंध पाहून कोणालाही हेवा वाटावा. सर कोल्हापूर, कराड, सांगली, लातुर असा घाटमाथ्यावरचा प्रवास करुनही न थकता त्वरित यंत्रयावत हॉस्पिटलमध्ये वाट बघत असलेल्या आपल्या रुग्णांना तपासण्यात मग्न होतात. ही सगळी तारेवरची कसरत करताना त्यांची दमछाक कशी होत नाही..? कुठून येते एवढी ऊर्जा त्यांच्यात..? राहून राहून नवल वाटतं या साऱ्याचं... या आणि अशा अनेक गुणांमुळे सरांबद्दलची परिसरातील सर्वांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली आहे.
      मला आठवतंय नववीत असताना डॉक्टरांना आमच्या शाळेत एका व्याख्यानाला बोलाविण्यात आले होते. तेच सरांचं पहिलं दर्शन. त्यांची देहबोली, बोलण्यातील आत्मविश्वास, प्रचंड ज्ञान ओसंडून वाहणारा तो तेजस्वी चेहरा पाहून मी त्याच क्षणी त्यांचा होवून गेलो होतो. मग आम्ही प्रत्येकाने आपापल्या मनातील शंका विचारल्या आणि तितक्याच आत्मियतेने त्यांनी त्याचे निरसन करून आम्हाला मोकळं केलं.

      सरांना कधी वेळ असेलच तर जबरदस्तीने घरी घेऊन जाऊन शुगर फ्री चहा घ्यायला लावतात मला दूध आवडत नसतानाही; आणि मलाही काकींसह त्यांना नाराज करणं जमत नाही. मग चहा पितापिता ओघाओघाने धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी विविध विषयांवर गप्पा मारतात. या सर्व गप्पांमधूनच त्यांच्यातील संवेदनशील माणूस जवळून अनुभवायला मिळाला. 

      नुकतंच त्यांच्या मातोश्रींचं देहावसान झालं. त्यावेळी मात्र एरवी कणखर वाटणारे डॉक्टर जेव्हा ढसाढसा रडले त्याने साऱ्यांचेच ह्रदय पिळवटून गेले. आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत सरांनी आपले सारे वैद्यकीय प्रयत्न पणाला लावले. अखरेच्या क्षणी आईला चालतं-बोलतं करुन डॉक्टरांनी साऱ्या नातेवाईकांना, नातवंडांना मनसोक्त भेटू दिलं आणि मग तृप्त मनाने आईची प्राणज्योत मावळली. 


प्रत्येक क्षण अन् क्षण सजग राहून माणसांच्या अंतर्मनातील घालमेलीचा अचुक अंदाज बांधून सहकार्याचा हात सतत पुढे असणाऱ्या व अनेक पेशंटचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांना आणि काकींना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य लाभो हिच मनोकामना..!
*****

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...