गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

महामानवाचे महापरिनिर्वाण

Image result for dr. ambedkar mahaparinirvan image



Image result for dr. ambedkar mahaparinirvan image
       दिल्ली राजधानीचा अलिपूर रोड... मध्यरात्र उलटून गेलेली... या भीषण शांततेत दिल्ली, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि भारतभर फोन खणखणले...  राजभवन स्तब्ध झालं होतं... संसद स्तब्ध होती... राष्ट्रपतिभवन स्तब्ध झालं होतं... इकडे मुंबईचा प्रत्येक रस्ता लोकांनी तुडुंब भरून वाहू लागला होता... सकाळ-संध्याकाळ प्रचंड आवाजात धुरांनी जळणाऱ्या गिरणी मिलच्या चिमण्या आज शांत होत्या... मजदूर कामावर गेला नव्हता... सर्व कोर्ट-कचेऱ्या सुन्या झाल्या होत्या.  शेतं, घरं सताड उघडी पडली होती... वयस्कर लोक लहान मुलांसारखे रडत होते... स्त्रिया आक्रोश करीत होत्या... दिल्ली, चेन्नई, नागपूर, नाशिक, कानपुर, पुणे, औरंगाबाद, आणि पुऱ्या भारतातून येणाऱ्या रेल्वेगाड्या, एसट्या आणि काही मिळेल ते वाहन पकडून लोक मुंबई गाठू लागले आणि बघता-बघता अरबी समुद्राची मुंबई जनसागराची होऊन गेली... काहीतरी मोठा हादसा घडला होता... कुणाच्यातरी जाण्याने करोडो लोक पोरके झाले होते... गरीबांच्या डोक्यावरील छत हिरावून गेल्याने रस्त्यारस्त्यावर साश्रुनयनांनी आक्रोश चालला होता... साऱ्यांचाच बांध फुटला होता. 'आमचा बाप गेला, आमचा वाली गेला...  अंतिम दर्शनासाठी सारा समाज आपला उर बडवून घेत होता... सर्व काही संपलं होतं...  शेवटी तो क्षण आलाच... चंदनाच्या चितेवर जेव्हा त्याला ठेवलं गेलं तेव्हा लाखोंचा आक्रोश मुंबईत घुमला... लाखोंची हृदयं सद्गदून आली... अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर चिता जाळली आणि लाखोंचे डोळे अश्रुनी डबडबून गेले... कोणी कोणाला सावरायचं... कोणी कोणाचं सांत्वन करायचं... जाळणारी चिता पाहून लाखोंची हृदयं जळत होती..? तुटत होती..? सर्वत्र अंध:कार पसरला होता? ज्याच्यामुळे प्रत्येकाच्या धमन्यांमधून ऊर्जेचा प्रवाह धावत होता, ज्याने एक नवीन इतिहास घडविला, ज्याने लाखोंना नव्या स्वप्नाची दृष्टी दिली, नसानसात स्वाभिमान प्रवाहित केला होता... पूर्वापार गुलामगिरीची शृंखला तोडून दिले होते प्रज्ञेचे शस्त्र, मनुवाद्यांच्या जोखडातून स्त्रियांना सहीसलामत सोडवून समानतेचा हक्क मिळवून दिला त्या तीन लाख स्त्रियाही दादरच्या अरबी समुद्रावर भावविवश झाल्या होत्या. जो  मुंबईच्या या चौपाटीवर पोहोचू शकला नव्हता तो तहान भूक विसरून.गावात एक टक बाबाची प्रतिमा पाहत  तीळ तीळ तुटत होता...  अशी कोणती आग लावून गेला होता, काय ती विद्रोहाची आग होती? की संघर्षाची? भुक्या-नंग्यांची आग  होती ती? विषमतेचे तुकडे-तुकडे करून समानता प्रस्थापित करण्याची ती आग होती? ज्यांनी हाती लेखणी घेतली, शिक्षणाचं महत्व पटवून दिलं जगण्याचं उद्दिष्ट दिलं, देशाभिमानाची ओतप्रोत भावना जागृत केली तो युगंधर, तो प्रज्ञासुर्य, साऱ्यांच्या दृष्टीआड झाला होता. जी लेकरं आज पोरकी झाली होती तो त्यांचा पिता-मायबाप सर्वकाही होता. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते. नेहमीप्रमाणेच ते आजही रात्री उशिरापर्यंत ग्रंथांचं वाचन करून त्यांचा मदतनीस 'रत्तू'च्या साहाय्याने पलंगावर पहुडले... त्याला जाताना 'बुद्धं शरणं गच्छामि'ची रेकॉर्ड लावायला सांगून ते झोपी गेले... ते कायमचे... दिल्लीच्या अलिपूर रोड येथील निवासस्थानी ६ डिसेंबर १९५६ रोजीच्या मध्यरात्री निद्रावस्थेत बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.

Image result for dr. ambedkar mahaparinirvan image

Image result for dr. ambedkar mahaparinirvan image
Image result for dr. ambedkar mahaparinirvan image


     बाबासाहेबांचे पाथिर्व दिल्लीहून विमानातून रात्री सव्वातीन वाजता मुंबईत आणण्यात आले. त्यापूर्वीच सांताक्रूझ विमानतळावर सुमारे पंचवीस हजारांचा जमाव जमला होता. त्यानंतर अॅम्ब्युलन्समध्ये त्यांचे पाथिर्व ठेवण्यात आले. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून अॅम्ब्युलन्समधे खास प्रकाशयोजना करण्यात आली होती. विमानतळावरून निघालेली अॅम्ब्युलन्स पाच वाजून पाच मिनिटांनी राजगृहापाशी आली. धीरगंभीर वातावरणात 'बुद्धं शरणं गच्छामि'चा स्पिरिच्युअल ध्वनी राजगृहाभार निनादात होता. तेथे रात्रभर लाखो संख्येने वाट पाहत असलेल्या प्रचंड गर्दीवर काबू मिळवणे पोलिसांना आणि समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना अशक्य झाले होते. सव्वापाच वाजता बाबासाहेबांचे पाथिर्व  अॅम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले तेव्हा जनसमुदायाच्या अश्रुंचा बांध फुटला. साऱ्यांच्या आक्रोशाने दादरची हिन्दुकॉलोनी पिळवटून गेली. अर्ध्या तासानंतर लोकांना बाबासाहेबांच्या अंतीम दर्शनास सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीच्या सात डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजगृहापासून अंत्ययात्रा निघाली. या  अंत्ययात्रेला सुमारे बारा लाख लोक सामील झाले. सायंकाळी सात वाजता दादर चौपाटीवर बाबासाहेबांवर भदन्त आनंद कौसल्यायन यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. आयुष्यभर धगधगता ज्वालामुखी शांत झाला. जाताना साऱ्या देशाला, समाजाला नवचेतना देऊन निघून गेला.


Image result for dr. ambedkar mahaparinirvan image



Image result for chaityabhumi image


     डॉ. भीमराव आंबेडकर यांचं जसजसं आयुष्य उलगडलं जातं त्यावेळी एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचे त्यांच्या समाजाबद्दल जितकं प्रेम होतं तितकंच प्रेम भारत देशाबद्दल होतं. ते  म्हणतात, 'मी प्रथम भारतीय आणि अंतही भारतीय आहे.' जन्मापासून तारुण्यापर्यंत पदोपदी लाथाडणाऱ्या जातीविषमतेच्या या देशात आयुष्याच्या उत्तरार्धात बाबासाहेबानी भारत देशासाठी वाहून घेतले होते. बालपणापासून कनिष्ठ जातीतील असूनही अभ्यासात गुणवान, राजर्षीच्या शिष्यवृत्या मिळवून परदेशी शिक्षण, ग्रंथांचा भोक्ता, पदव्यांचा महापूर पदरात पाडून घेण्याची भूक, ज्ञानाच्या भक्कम पायावर उतुंग उभे राहिलेले तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व, याच व्यक्तिमत्वाने हजारो वर्षे मनुवादी गुलामगिरीच्या जोखडातून समाजाची केवळ एकट्याने सुटका करणे, सनातन्यांशी दोन हात करणे, ज्ञानाच्या जोरावर प्रकांड पंडितांना मूर्च्छित करणे, बॅरिस्टर असलेल्या गांधींनाही शेवटी उपोषणासारखे शस्त्र उपसावे लागणे, भारतीय घटनेचा शिल्पकार होण्याचा बहुमान मिळणे, त्यासाठी इतर देश्याच्या घटनांचा सखोल अभ्यास करणे, १७६० जातींनी विखुरलेल्या भारतात नष्ट झालेला वैज्ञानिक दृष्टीचा बुद्ध आणि त्यांचा धम्म परत आणून समाजाचे प्रवर्तन करणे या आणि अशा कितीतरी अश्यक्यप्राय क्रांत्या एका जन्मात घडवून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांची झोप उडविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या कार्यास माझे कोटी कोटी प्रणाम!  

      आज ६२ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सर्व भारतीयांनी एक सिद्धीस जाणारा संकल्प करूया. एका प्रज्ञासुर्याने संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्वाच्या प्रज्ञावान किरणांनी साऱ्या देशाला, समाजाला प्रकाशित केले; तो हा देश, हा समाज आणि आम्ही सर्व जिथे कधीही सूर्य मावळणार नाही  तिथे दृढ विश्वासाने, सौहार्द बंधूभावाने एकमेकांचे हातात हात घालून मानवतेच्या मार्गावरून पुढे अखंड चालत राहू.       
  

Image result for dr. ambedkar mahaparinirvan image

कविवर्य नामदेव ढसाळ यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वाहिलेली काव्यांजली-

हे महाप्रतिभावंता...

अहं ब्रह्माास्मि।
अस्मिन सस्ति इदं भवति।
सतत चालले आहे महायुद्ध
आत्मवादी-अनात्मवादी यांत।
-म्हणे बीजातून फुटतो अंकूर
म्हणे बीज होते म्हणून अंकूर फुटला

अविनाशी दव्याचे पाठीराखे कुणी
कुणी सर्व काही क्षणिकमचे पाठीराखे
महाप्रतिभावंता
मी शिकलो आहे तुझ्याकडून
दु:खाचे व्याकरण जाणून घ्यायला
सर्व दु:खाचे मूळ तृष्णा
कुठून जन्मास येते,
केव्हा तिचा क्षय होतो ते.
सरकतो आहे माझ्या डोळ्यांसमोरून
मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रागैतिहास. 
दृष्टांत देणारी उत्क्रांत माणसांची रांग
विहंगम-
आणि एक बुटका केसाळ माकडसदृश्य 
त्याच्यानंतर दुसरा
त्याच्यानंतर तिसरा-
शून्ययुगापासून आण्विकयुगापर्यंत
चालत बदलत आलेली माकडं की माणसं?
करून जातायत माझं मनोरंजन.
प्रतीत्य समुदायाच्या पक्षधरा,-
आता कळतो मला अष्टोदिकांचा अर्थ 
काय असतात दहा अव्याकृते
आणि बारा निदाने
काय असते निर्वाण-
निर्वाण तृष्णेचा क्षय : दु:खाचा क्षय
क्षणिकम आहे दु:ख; क्षणिकम आहे सुख
दोन्ही अनुभव अखेर विनाशीच.
बीज आधी की अंकूर
बीज होते म्हणून अंकूर निर्माण झाला
या गहनचर्चा माझ्या 
जिज्ञासेला डिवचतात
धावती ट्रेन माझ्या सामान्य आयुष्याची
मला प्रेषितासारखं बोलता येत नाही
फक्त दिसतं पुढचं
भविष्यातलं नाही, वास्तवातलं
स्वप्नातलं नाही, वर्तमानातलं
माणसाची प्रतिमा अधिक उजळ करणाऱ्या
महापरिनिर्वाणोत्तर तुझं अस्तित्व
जागृत ज्वालामुखी होऊन बरसते आहे
आमच्यावर झिमझिम पावसासारखे
उत्स्फूर्त लाव्हाचं उसळतं कारंजं
ठिणगी ठिणगी फूल झालेलं
काळाच्या महालाटेवर बसून
कलिंगचं युद्ध हरलेला येतो आहे
आमच्यापर्यंत.
त्याच्या अंगावरली काषायवस्त्रे
सूर्यकिरणांनी अधिक गडद केलेली.
काळ किती विरोधी होता आमुच्या
काळाचे किरमिजी जावळ पकडून
तू बांधून टाकलेस त्याला
आमच्या उन्नयनाला
अंतर्यामी कल्लोळाला साक्षी ठेवून 
तुझे उतराई होणे हीच आमची 
जगण्याची शक्ती

Image result for dr. ambedkar mahaparinirvan image***

फुलांचे ताटवे झुलताहेत नजरेसमोर
बहरून आलीयेत फुलाफळांची शेतं
या फुलांवरून त्या फुलांवर विहरत 
राहणारी फुलपाखरं
चतुर उडते -पारदशीर् पंखांचे- फुलाफांदीवर
लँडिंग करणारे-
काय त्यांची निर्भर ऐट- झुलत्या फुलांवर अलग थांबण्याची-
रंगांची पंचमी फुलपाखरांच्या पंखांवर चितारलेली
अमूर्ताची चिरंजीव शैली- डोळ्यांना रिझवणारी
किती किती प्रयोग चित्रविचित्र रंगमिश्रणाचे 
चतुर हवेला खजिल करत अधांतरी तरंगणारे
आम्ही -मी झालो आहे धनी - या गडगंज ऐश्वर्याचे
अहाहा -झिंग चढली आहे ऐहिकाला
नेमका हाच आनंद भोगता आला नाही-
माझ्या बापजाद्यांना
संस्कृतीच्या मिरासदारांनी केला त्यांच्यावर अत्याचार
-आणि केला अनन्वित छळ
छळाच्या इतिहासाची सहस्त्रावधी वर्षं
माझ्याही पिढीने यातले सोसले पुष्कळसे
आमचे नारकीय आयुष्य संपवून टाकणाऱ्या
आकाशातील स्वर्ग तू आणलास
आमच्यासाठी ओढून पृथ्वीवर
किती आरपार बदलून गेलं माझं माझ्या लोकांचं साक्षात जीवन.
आमच्या चंदमौळी घरातील मडकी गाडगी गेलीयत- माणिक मोत्यांनी भरून
रांजण- भरून गेलेयत पाण्याने
कणग्या भरून गेल्यायेत 
अन्नधान्यांनी ओतप्रोत.
दारिद्याचे आमचे शेतही गेले आहे 
कसदार पिकाने फुलून
गोठ्यातील जनावरेसुद्धा आता नाही उपाशी मरत
श्वान आमच्या दारातले इमानी
भाकरीसाठी नाही विव्हळत.
बळ आले तुझ्यामुळे आमच्या शिंक्यातील भाकरीला
आता भूकेचा दावानल नाही आम्हाला सतावीत.
चिमण्यांचा गोतावळा वेचीत राहतो
विश्वासाने दारात टाकलेले दाणे.
धीट चिमण्यांनी बांधले आहे आमच्या 
घराच्या आढ्याला घरटे
खाली घरकारभारीण शिजवते आहे
चुलीवर रोजचे अन्न.
जळत्या ओल्या सुक्या लाकडांना
घालते आहे फुंकर फुंकणीने
तिचे विस्कटलेले केस आणि डोळ्यातले सुखीप्रंपचाचे अश्रू
घरट्यात जन्म घेऊ लागलीत रोज नवी पिल्ले
मांसाचा चिंब चिंब आंधळा गोळा
पुकारतो आहे आपल्या आईला.
अगं, चिमणीबाई बघ गं आपल्या पोराला
घरातील म्हातारी पाहते आहे संसार चिमण्यांचा
घरट्याबाहेर तरंगत लटकलेली 
चिमणी नावाची आई
बाळाच्या चोचीत देते आहे चोच. 
किती अवर्णनीय आनंदाचे धनी आम्हाला केलेस हे महामानवा-
कुठल्या उपमेने तुला संबोधू-
प्रेषित म्हणू - महापुरुष कालपुरुष!
किती उंच ठिकाणी आणून ठेवलेस आम्हाला
आम्ही आता नाही उकरत इतिहासाची मढी
सनातन शत्रूला आता सारे विसरून आम्ही लावले आहे गळ्याला-
वैरात वैर संपत नाही हे सांगणाऱ्या आधुनिक बोधीसत्ता-
ज्याला आदी नाही, अंत नाही अशा अंतरिक्षाला
जाऊन भिडणारे तुझे कर्तृत्व
कोण मोजणार उंची तुझी?
मी -आम्ही जगतो आहोत या संक्रमण काळात
तुझा सिद्धांत उराशी बाळगून
प्रागैतिहासिक माणसांच्या अवस्था मनात ठेवून
हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा माणूस.
विध्वंस करायला निघालाय आपल्याच निमिर्तीचा-
हे आधुनिक बोधीसत्त्वा-
शक्ती दे मला या विध्वंसक्याला
वठणीवर आणायला.
कोणी काहीही समजो मला 
तुझ्याविषयीची माझ्या मनातली श्रद्धा आहे अपार-
कोणी घेऊ देत शंका
अखेर माणूस शंकासूरच ना?
मी गुडघे टेकून तुझ्या चैतासमोर
या छोट्याशा विहारात
कबुली देतो आहे माझ्या सर्व गुन्ह्यांची
किती प्रसन्न वाटतं म्हणून सांगू?
पश्चिमेचा विश्रब्ध समुद वाहतो आहे शांत
मावळत्या सूर्याची काषाय किरणं-
ललामभूत करून सोडताहेत चराचराला-
हे माझ्या चैतन्या-
बोल एखादा तरी शब्द माझ्याशी-
मी शरण तुला... 











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...