सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

चैत्यभूमीवरील महापूर आणि ट्रेन

     घटनातज्ञ, राजनितीज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, कायदेपंडित, तत्वज्ञ, वकील, इतिहासकार, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, धर्मशास्त्रज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, सत्याग्रही, प्रभावी वक्ता, विद्याव्यासंगी, धम्मप्रवर्तक, धम्मविचारवंत, राष्ट्रहितैषी नेता, नॉलेज ऑफ सिम्बॉल - डॉ. भिमराव रामजी आंबेडकरांचा हा ६२ वा महापरिनिर्वाण दिन. दादर चौपाटीच्या अरबी समुद्रावर ६ डिसेंबर १९५६ रोजी पहिल्यांदा डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांचा महासागर  शोकाकुल, जड अंत:करणाने जमला आणि आता त्याच्या आकारमानात वर्षानुवर्षे वाढच होत जात आहे. आपल्या बापाचाही बाप असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय होता हे अगदी आईच्या उदरात असल्यापासून त्या बाळाला उमगलेलं असतं आणि म्हणूनच आयुष्यभर त्याच्या रंध्रारंध्रात आंबेडकरांप्रति अभिमान तितकाच ठासून भरलेला असतो. म्हणूनच बाबासाहेबांप्रति देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक अनुयायाच्या मनात असलेली कृतज्ञताच त्यांना त्यांची तहान भूक, दु:ख, आजार, वार्धाक्य सर्व काही विसरून चैत्यभूमीवर घेऊन येते. सलाम या जनसमुदायाच्या लिडरला-डॉ. आंबेडकरांना! कारण भारतात कुठल्याच नेत्याच्या जयंती किंवा निर्वाणाला अशी गर्दी लोटत नसेल. जाणाऱ्या प्रत्येक अनुयायाच्या डोक्यावर निळे बँड, निळे झेंडे, शुभ्र वस्त्रे आणि गगनभेदी घोषणांनी डॉ. आंबेडकरांबद्दल अभिमान त्यांच्यामध्ये दिसून येतो. चैत्यभूमीवर आदल्या दिवसापासून दर्शनासाठी प्रभादेवीपासून ते माहिमपर्यंत रांग पाहून बाबांप्रति असलेली आत्मीयता लक्षात येते. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आपल्या बांधवांसाठी मुंबईतील बौद्ध समाजाची स्थानिक कार्यकारी मंडळे शक्य तितक्या सेवा पुरविण्यासाठी अग्रभागी असतात. या मंडळांतील जेष्ठांसह तरूणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच! 

    एकदा पंढरीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा आग्रह करणारी बाबासाहेबांची पत्नी माता रमाबाई आणि तो प्रसंग साऱ्यांनाच माहित्येय. पंढरीला जावून त्या दगडी विठ्ठलाचे दर्शन घेण्याची काहीही गरज नसल्याचे सांगून आपल्या पत्नीला दिलेला शब्द बाबासाहेबानी अक्षरशः खरा करून दाखविला. आज खरोखर लोटच्या लोट या चैत्यभूमीकडे वाहताना पाहून माता रमाईच्या या प्रसंगाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. 

     भारतातून विशेषत: महाराष्ट्रातून लाखोनी येणाऱ्या आंबेडकरी जनतेची व्यवस्था करण्यासाठी येथील महानगरपालिका त्यांच्यापरीने लोकांकरीता राहण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था, सौचालये आदि मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था राखणारी आपली पोलीस यंत्रणाही नेहमीप्रमाणे सतर्क असते. तसेच भारतीय रेल्वे प्रशासनाद्वारे या तीन दिवसांमध्ये काही विशेष गाडया सोडल्या जातात. नागपूर ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, सीएसटी/दादर ते सेवाग्राम, अजनी, नागपूर, सोलापूर, भुसावळ, कोल्हापूर आदि जंक्शनवरून या विशेष जादा गाडया सोडण्यात येतात. जेवढी शक्य आहे तेवढी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा, पोलिस खात्याचा आणि इंडियन रेलचा मी एक आंबेडकरी अनुयायी म्हणून व्यक्तिश: आभारी आहे. 

      मला एका महत्वाच्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधावेसे वाटते ते म्हणजे, आपल्या बहुतांश भाबड्या लोकांचा असा समज असतो की, या तीन दिवसांत प्रवासाकरिता मोफत ट्रेन असतात. मग हा अशिक्षित बांधव (सर्वच नव्हेत) रेल्वेचा प्रवास मोफतच असल्याचं गृहीत धरून तो हा प्रवास करीत असतो, जाणूनबुजून नव्हे हे मी समजू शकतो. बऱ्याच जणांना हे माहित नसतं की, रेल्वेने आपल्या सोईसाठी गाडया जास्त उपलब्ध करून दिल्या आहेत पण त्या नेहमीप्रमाणे तिकीट आकारूनच. या तीन दिवसांत होतं काय की, डॉ. आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत तेही आणि नाहीत तेही या दिवसांत ट्रेनने फुकट प्रवास करतात. एरवी कधीच 'जयभीम'चा उच्चार न करणारा समजेतर इसम या दिवशी मात्र बेधडकपणे 'जयभीम'चा नारा देत आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांनाही ट्रेनने फुकटचा प्रवास घडवून आपले इप्सित साध्य करतो. ज्यांचा या दिनाशी काहीही संबंध नसतो किंवा ज्यांना डॉ. आंबेडकरांप्रति आत्मियता नसते ते नातेवाईकांच्या भेटीगाठीसाठी, खरेदी आणि अन्य खाजगी कामे उरकण्यासाठी या दिवसांत फुकटचा प्रवास करतात आणि त्याचे खापर मात्र आपल्या समाजावर फोडले जाते. 

     मुळात रेल्वे प्रशासन या तीन दिवसांकरीता प्रवाशांसाठी जादा गाडया उपलब्ध करून देते - मोफत नव्हे! या दिवसांत गर्दीचा इतका मोठा पूर आलेला असतो की रेल्वे खात्याच्या टीसीनेही तिकीटासाठी कोणाकोणाला तपासावे? आणि कोणाकोणाला ताब्यात घ्यावे? थोडंसं त्या खात्याच्या जागी येऊन त्यांच्याही काही मर्यादांबद्दल आणि एकंदरीत सहकार्याबद्दल आपण विचार करायला हवा. बाबासाहेब हे केवळ त्यांच्या अनुयायांपुरतेच मर्यादित नसून ते सर्व भारतीयांचे आदर्श आहेत हे जरी मान्य असलं तरी ‘जयभिम बोलो - किधर भी चलो’ या आणि अशा घोषणा देऊन डॉ. बाबासाहेबांना आणि त्यांच्या विचारांना गालबोट लावू देवू नका. अशी कोणतीही संस्था नाही जी इतकं मोफत देऊ शकेल आणि का करावी ही मोफत व्यवस्था? मी तर म्हणतो ज्याला-ज्याला डॉ. बाबासाहेबांचा अभिमान आहे त्याने तर रितसरच आणि शिस्तप्रिय असा प्रवास करावा. ज्यांना-ज्यांना चैत्यभूमीचे दर्शन घ्यावयास जायचे आहे त्याने योग्य ते तिकिट खरेदी करूनच प्रवास करावा. बाबांच्या महापरिनिर्वाणदिनी आपला प्रत्येक बांधव हा केवळ पवित्र भावनेने त्यांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी जात असतो. इतक्या कृतज्ञतेने जर आपण त्या पवित्र ठिकाणी जात असू तर तो प्रवासही पवित्रच होऊ द्या. तिकिटाशिवाय प्रवास करून कोणाचेही गालबोट लावून घेवू नका आणि या गोष्टीची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासूनच करावी जेणेकरून त्यात दुसरा कोणी गैरफायदा घेणार नाही. 

     दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे या तीन दिवसांत मुंबईतील शिवाजी पार्क, दादर, परळ, माहिम, माटुंगा हा परिसरही लोकांना अपुरा पडतो. अरबी समुद्राने व्यापून टाकलेल्या मुंबईच्या चैत्यभूमीचे-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या अनुयायांच्या प्रचंड महासागरामुळे या दिवशी खरं तर मनासारखं दर्शन होत नाही. प्रत्येकाला घाई असते इथे दर्शनाची - बाबांना डोळ्यात साठवण्यासाठी! त्यात काहींना दर्शन होत नाही म्हणून ते समुद्र किनाऱ्यावरील वाळूवरूनच दर्शन घेऊन माघारी परततात; इतकी प्रचंड गर्दी बाबासाहेबांच्या दर्शनाला झालेली आपण अनेक वर्षे पाहत आलोय. या गर्दीकडे पाहून कधीकधी काळीज चू~र होतं. गेल्या वर्षीच्या २९ सप्टेंबर २०१७ रोजी अशीच काहीशा गर्दीत पावसाळ्यात एल्फिन्स्टन्ट ब्रीजवरील नुसत्या अफवेने दुर्दैवी ठरलेली घटना दृष्टीआड करून चालणार नाही. तसेच १९९२ सालचे अयोध्यामधील बाबरी मशीद प्रकरण तर कोणी विसरूच शकत नाही.    

सर्वांचे मंगल होवो!!!  

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...