रविवार, २७ मार्च, २०२२

प्रगल्भ विचारांचा साठा-पांडुरंग मामा (P.B.Kamble)


 पांडुरंग बेंडू कांबळे हे नाव गावापासून मुंबईपर्यंत सर्वांना परिचयाचे असले तरी आम्हा भावंडांसाठी तुम्ही फक्त 'पांडुरंग मामाच..!' एरवी आपल्या मराठी संस्कृतीत आईचा भाऊ म्हणजे भाचरांचा मामा हा खरंतर मित्र असतो. त्यामुळे त्याला त्याची भाचरे 'ए मामा, रे मामा' अशी हाक मारतात. पण आम्हा भावंडांच्या तोंडून कधीच आमच्या सर्व मामांना अशी एकेरी हाक आली नाही. अर्थात ही रीत आमच्या अजाण वयातच सुरू झाली असल्याकारणाने स्वाभाविकच 'अहो मामा' अशी आदरार्थी साद घालण्यामागे माझ्या आईवडिलांची देण आहे. तिचे भाऊ आणि वडिलांचे मेहुणे यांच्याप्रति असलेला सच्चा आदर-प्रेम प्रकट होते. त्यातून आमच्या तीन मामांपैकी तुम्ही तुलनेने उच्चशिक्षित. त्याकाळी जुनी अकरावी म्हणजे मॅट्रिक. पण मॅट्रिकची सर, तो शिक्षणाचा दर्जा हा आजकालच्या पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यालाही झेपेल असं वाटत नाही. त्यामुळे मामा तुमच्याकडे आजवर मी पहात आलोय ते एक उच्चविभूषित असं व्यक्तिमत्त्व याच आदराने. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्ही आम्हाला भेटलात तेव्हा तेव्हा मामा तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक शब्दाचा, त्यातील भावार्थाचा, तुमच्या सौम्य भाषेचा, तुमच्या मृदु स्वभावाचा, तुमच्या टापटीप राहणीमानाचा, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्विसच्या त्या क्रेन ऑपरेटर या कुशल तांत्रिक पदाचा, तुमच्या भाषेवरील प्रभुत्वाचा, तुमच्या सुवाच्च अक्षराचा आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आमच्या गोड मामाचा दिवसेंदिवस आदर हा वाढतच गेला... तुमच्या-माझ्यामधील वयामध्ये सुमारे तीस एक वर्षांचा फरक असावा. लहानपणीच एवढं आठवत नाही... पण जसजसा पुढे वाढत गेलो मला पुस्तकांचा लळा पाहून तुम्ही माझ्याकडे जास्तीत जास्त संवाद साधून विचारांची देवाण-घेवाण करण्याचा तुमच्या विलक्षण कलेमुळे विशिष्ट दृष्टीने माझ्यातल्या 'मी'ला शोधू लागलो. एक वेगळा आयाम घडू पाहत होता... कॉटनग्रीनला तुम्ही वाचलेले नवाकाळ, लोकसत्ता, मुंबई चौफेर माझ्या हाती असलेले पाहून तुम्ही मला नवाकाळच्या खाडिलकरांना 'अग्रलेखांचा बादशहा' का म्हणतात याची अनेक लेखांचा उल्लेख करून उकल केलीत. वर्तमानपत्रातील सर्व शब्दकोड्यांचा सराईतपणे फडशा पाडणारे तुम्ही जेव्हा गावी आल्यावर आमच्याकडे येणाऱ्या दैनिक रत्नागिरी टाइम्स मधल्या प्रसन्न कांबळींची मला किचकट वाटणारी ती शब्दकोडीही तुम्ही चुटकीसरशी सोडवलेली पाहून माझे डोळे त्या काळी अक्षरशः दिपून गेले होते; याला कारण तुमचं भाषेवरील प्रभुत्व! या तुमच्या भाषेवरील प्रभुत्वाची आणखी एक झलक तुम्ही आम्हाला पाठवलेल्या पत्रातून दिसते. हो...हो... पोस्टाने पाठवलेलं पत्र... कारणही तसंच होतं. 1998 साली कोकण रेल्वेचा पहिल्याच दिवसाचा पहिला प्रवास करण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं... तुम्ही सुखरूप मुंबईला पोहोचल्यावर आम्हाला त्या कोकण रेल्वे आणि कोकणच्या निसर्गरम्य अशा डोंगर-दऱ्या, नद्या-खाड्या आणि एकापाठोपाठ येणारे बोगदे आणि तो गोंगाट यांचं इतकच छान असं आलंकारिक वर्णन तुम्ही त्या पत्रात लिहून पाठवलंत... आणि काय योगायोग पहा, त्याच वर्षी हायस्कूलमध्ये आम्हाला 'कोकण रेल्वेचा अविस्मरणीय प्रवास' या विषयावर निबंध लिहिण्यासाठी प्रश्नपत्रिका माझ्या समोर आली. पण मी तर तेव्हा कोकण रेल्वेचा प्रवास केलेलाच नव्हता... माझ्या डोळ्यासमोर सरकन तुम्ही लिहिलेले पत्र उभे राहिले आणि मग काय विचारता, तुम्ही केलेले ते कोकण रेल्वेच्या प्रवासाच्या प्रतिभाशाली वर्णनाचा आधार घेत मी हा निबंध सहज संपवला... हा किस्सा मी जेव्हा तुम्हाला ऐकवला नं तेव्हा तुम्हीही मनोमन सुखावला होतात... थँक्यू मामा..! थँक्यू सो मच..!!

  सात बेटांच्या बनलेल्या देशातील नंबर एकच्या या मुंबई शहराबद्दल ब्रिटिश कालखंडापासूनच्या अनेक गोष्टी तुम्ही मला सांगितल्या. त्यातीलच 656 हेक्टर क्षेत्रफळ असलेली तुमची बॉम्बे पोर्ट ट्रस्ट अर्थात बीपीटी ही तुम्ही जातीने स्वतः मला फिरून दाखवली याच वेळी आणखी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट घडून आली ती म्हणजे भारताची प्रसिद्ध असलेली युद्धनौका 'विक्रांत' हिचे मला दर्शन घडवून आणलेत. तसेच पिंकीला सांगून बाबासाहेबांच्या सिद्धार्थ कॉलेजचे दर्शन झाले. मामा माझ्यासाठी ही खूप बहुमोल अशी गोष्ट आहे हे मी कृतज्ञतापूर्वक सांगू इच्छितो.

माझे वडील मुंबईला आल्यावर यत्किंचितही मागचा पुढचा विचार न करता कामावर सुट्टी टाकून आपल्या मेहुण्या सोबत फिरत होतात ही आठवण माझे वडील वारंवार करतात ना त्यावेळी तुमच्या दिलदार स्वभावाची जाणीव होते.

  तुम्ही तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या उच्च पदाचा कधीच गर्व केला नाहीत. सदा मृदू आणि शांत स्वभाव आणि या तुमच्या स्वभावामुळे तुम्ही सर्वांना आपलंसं केलंत... ऋणानुबंधाने साऱ्यांना गुंफून ठेवलंत... त्यामुळे आज तुमची सर्व जोडलेली माणसं आज तुमच्या नसण्याने, तुमच्या विरहाने शोकाकुळ आहेत.

माझ्या भावना, माझे दुःख अशी चार-चौघात व्यक्त करणे माझ्या बुद्धीला पटत नाही पण आज मला... तुमच्या जितुला… तुमच्या स्मृती मांडल्या वाचून राहावत नाही..! मामा तुम्ही मिळवलेलं ज्ञान, तुम्ही मिळवलेला अनुभव आम्ही सारे आत्मसात करायला, आमच्यात उतरवायला कमी पडलोय ही खंत मी आज या निमित्ताने आपल्याकडे व्यक्त करतो. तुमची उणीव आम्हाला सतत भासत राहील. आज तुम्ही आमच्यात नाहीत याचं दुःख जरूर आहे पण ते दुःखही आमचं तुमच्या गुणांप्रमाणे संयमाने, शांततेने आणि तुमच्या प्रगल्भ विचारधारेने आज ना उद्या कमी होईलही... पण मामा तुमचा तो गोड मृदू आवाज, तुम्ही आयुष्यभर मिळवलेल्या बऱ्या-वाईट अनुभवातून निर्माण झालेलं तुमचं एक विशिष्ट वलय, तुमचं सृजनशील असं व्यक्तिमत्व आमच्या साऱ्यांच्या मनावर कायम कोरलेलं आहे आणि ते अखेरपर्यंत अबाधित राहील..! मामा… तुम्हाला निर्वाण प्राप्त होवो…!!!                      नमोबुद्धाय! जय भिम!

४ टिप्पण्या:

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...