शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

मन की बात

     करुणेचा महामेरू तथागत गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा जोतिबा फुले आणि या तीन महामानवांना ज्यांनी आपले गुरू मानले ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन!


Image result for bhartache samvidhan

कोणी एका शाहिराने म्हटलंय-
"येशू के बायबल पर ख्रिश्चन चलता है, 
वेदो और पुरणोंपर ब्राम्हण चलता है, 
अल्लाह के कुराण पर मुसलमान चलता है, 
लेकिन मेरे भीम के संविधान पर पुरा हिंदूस्थान चलता है"


      ‘संविधान’ हा शब्द आजपर्यंत केवळ पाठ्यपुस्तकात आणि आंबेडकरांनी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंना भारताची घटना बहाल करताना त्या घटनेच्या पुस्तकावरच पहायला मिळायचा. पण आज मा. प्रंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सहकार्याने २६ नोव्हेंबरला सर्व भारतात शासकीय कार्यालयातून साजरा करण्यात येतो ही एक कौतुकाची बाब म्हणायला हवी. कारण डॉ. आंबेडकरांनी केवळ दलितांनाच नव्हे तर भारतातील सर्वच्या सर्व जातींचे कल्याणच करून ठेवलंय. पण याकडे मात्र दलितेतर समाज सोयिस्कररित्या डोळेझाक करून आंबेडकर हे केवळ त्यांच्याच लोकांचं भलं केल्याची बोंब आजही उठवली जाते आणि त्यावर बहुतांश लोकांचा विश्वासही बसतो. याचं कारण काय बरं असू शकतं? कारण हे की, आपलं या संविधानाबद्दल-भारताच्या घटनेबद्दलचे अज्ञान होय. ब्रिटिशांना हाकलवून भारतात प्रजासत्ताक लोकशाही या संविधानाच्याद्वारे अवलंबिली. तिथपासून आजपर्यंत सुमारे ६७ वर्षे हे संविधान संविधान म्हणजे नक्की काय हे सामान्य लोकांना कसं कळणार? कारण आजपर्यंत कोणत्याही सरकारने जाहीरपणे असा संविधानाचा गौरव केलेला नाही आणि त्याचमुळे हे भारताचे संविधान कोणाला कधीही कळले नाही. येथील विघ्नसंतोषी लोक मात्र अंधारात तीर मारून संविधानास दोष लावून मोकळे होतात.  भारताची राज्यघटना म्हणजे विद्वानांची गोष्ट, सरकार चालविणाऱ्यांची मक्तेदारी अशी सामान्य माणसाची धारणा होती, केवळ निवडणूका किंवा सरकारचं आगमन-निर्गमन म्हणजे लोकशाही असंच आपण समजायला लागलो. आजवर आपल्याकडे संविधान कोणी कोणाला दाखवंत नसल्याने प्रत्यक्षात संविधान निरक्षरतेमुळे आपले प्रश्न वाढतात किंवा ते सुटत नाही, हे समजून घ्यायला वेळ लागतोय. माझं असं म्हणणं आहे की , जोपर्यंत हे संविधान तळागातील लोकांपर्यंत पोहचत नाही, त्यातील मार्गदर्शक तत्वे आणि कलामांचे आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशात लेखकांना खरी, अभिप्रेत असलेली लोकशाही नांदणार नाही. याच संविधानाचा अमेरिकेसारख्या प्रगतशील देशांनी गौरव केला पण म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही या उक्तीप्रमाणे त्याच मोल आपणास कळत नाही. भारताची राज्यघटना मंजूर झाली त्या दिवशी घटनापरिषदेत केलेल्या संस्मरणीय भाषणातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विभूतीपूजेच्या प्रवृत्तीपासून आणि सत्तेवरील नकारात्मक नैराश्य प्रवृत्तीपासून भारतीय लोकशाहीला धोका असल्याचा इशारा दिला होता. आणखी एक कारण मला अधोरेखित करावेसे वाटते ते म्हणजे जे या देशातील कायदेपंडित आहेत, जे संविधानाचे अभ्यासक आहेत त्यांनी शासनाच्या आदेशानुसार खरंतर अद्वितीय असलेले हे संविधान कसे लोकहितकारी आहे याची जागृती सर्व भारतीयांना व्हावी ही मोहीम हाती घेतली पाहिजे.    
          पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील लव्हेरी नावाच्या गावामध्येही अशाचप्रकारचा एक नाविन्य असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये स्वच्छता गाव, तंटामुक्ती गांव, साक्षर गाव, हरित गाव अशी शासनाची अभियानं सुरू झाली आणि काही प्रमाणात ती यशस्वी झाली, पण या गावामध्ये डॉ. रोहिदास जाधव यांनी ‘संविधान साक्षर’ या नावाचं अभियान राबवलं आणि तेथे यशस्वी ही झालंय. लव्हेरी गावच्या घराघरामध्ये भारतीय संविधान पोहाचले आहे. इतकेच नव्हे तर तेथील प्रत्येक व्यक्तीने संविधान नक्की काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. सक्तीच शिक्षण, महिला मुक्ती, शुध्द पाणी, आरोग्यसुविधा आपल्याला सरकार देतं; पण सरकारला हे करायला कोण भाग पाडतं? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानच! अशाप्रकारचे अध्ययन त्या गावामध्ये झाल्याने तेथील लोकांना संविधानाचे अनोखे रूप समोर आल्याने स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाने प्रेरित झाल्याने ती सर्वधर्मसमभाव असल्याचं समजून आलं; ही पण एक क्रांती म्हणावी नाही तर आणखी काय?

          त्याचप्रमाणे या २०१७ सालामध्ये माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी तालुक्यामध्ये अशी एक क्रांती घडली आणि ती म्हणजे मौजे सत्कोंडी या गावी मा. बैकरसर आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रयत्नाने या वर्षी डॉ. बाबासाहेबांची १२६ वी जयंती त्यांच्या गावामध्ये साजरी करून त्यामध्ये पंचक्रोशीतील बहुजन समाजाला एका निळ्या झेंडयाखाली आणले ही गोष्ट खरंच अतिशय कौतुकास्पदच आणि अभिनंदनीय आहे. महापुरुषांच्या केवळ जयंत्या साजऱ्या केल्या म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही. त्या महापुरुषांच्या विचार आपल्यात उतरायला हवेत. त्यांनी केलेल्या अमूल्य त्यागांचं ऋण, त्याची किंमत कळली की मग त्या महापुरुषाप्रति अभिमान वाटतो आणि मग स्वयंप्रेरणेने स्फुरून अशी क्रांती जन्म घेते हे एक ताज उदाहरण होय. बंधुनो इतर समाजाला आता कळायला लागलाय डॉ. आंबेडकर, पण तो ज्या समाजातून वर आलाय तो आपला समाज अजूनही त्याला अप्रत्यक्षपणे खाली खेचतोय. हां.. तुमच्या मनात प्रश्न उठणे स्वाभाविक आहे. डॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा दिलेला मूलमंत्र. पण आपण शिकलो तेही अर्धवट, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर जे विखुरले गेलो ते आजतागायत संघटित झालो नाही आणि संघर्ष तर आपण भावा-भावामध्ये, बाप-लेकामध्ये आपापसात जमिनीच्या वाटणीवरून, घराच्या जागेवरून, बापाने कामविलेल्या संपत्तीवरून करू लागलो. बाबासाहेबाना संघर्ष हवा होता तो आपल्या समाजवार केलेल्या आजवरच्या  अन्यायाबाबत, जातीविषमतेबाबत. लोक आपल्याला समाजाची शंभर शकले झाली म्हणून हिणवतातही पण आपल्याला त्याचं काहीच नाही. बरं त्यांनी दिलेल्या  २२ प्रतिज्ञांचेही आपण किती गांभीर्याने पालन करतो. म्हणून म्हणतो बाबासाहेबाना इतरांपेक्षा आपणच पूर्णतः समजू शकलो नाही हे दुर्दैवानं म्हणावसं वाटतं.     
          प्रसिध्द लेखक य. दि. फडके यांच्या 'आंबेडकरी चळवळ' या पुस्तकात बाबासाहेबांचा एक वाढदिवसाचा प्रसंग सांगितला आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकराची समाज परिवर्तनाची घौडदौड अशीच वेगाने सुरू झाली होती. १९२७ साली अवघे ३५ वर्षांचे असतानाच त्यांच्या वाढदिवस त्यांच्या निष्ठावंत अनुयायांनी सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरूवात केली. पण माणसाला देव मानणे किंवा अवतारी पुरूष म्हणून त्याची पूजा करणे हे बाबासाहेबांना मुळीच आवडत नसे. वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या जाहीर सार्वजनिक सभांना १५ वर्षांत एकदाही हजर न राहिलेले बाबासाहेब सन १९४२ च्या त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भरलेल्या सत्कार सभेत हजर राहिले आणि त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले, “तुम्ही माझा वाढदिवस गेली पंधरा वर्षे साजरा करीत आहात. माझा नेहमीच या प्रकाराला विरोध असल्याने मी आजवर या समारंभाला कधीच हजर राहिलो नाही. तुम्ही आता माझा सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. इतके पुरे झाले. यापुढे माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुचना दिल्या. नेत्याविषयी अपार भक्ती बाळगली की, जनतेचा आत्मविश्वास नाहिसा होतो, जेव्हा जेव्हा भारतात धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा आपण अवतार घेतो या श्रीकृष्णाच्या हवाल्यावर विसंबून राहिल्याने हिंदू समाज संकटाच्या वेळी कसा अगतिक बनतो याची त्यांनी लोकांना आठवण करून दिली. "एखाद्या कसोटीच्या प्रसंगी असा नेता नसेल किंवा कशाचाच विधीनिषेध न बाळगणाऱ्या पुढाऱ्यांच्या तावडीत जनता सापडली तर तीला निराधार असल्यासारखे वाटू लागते. मुक्तीसाठी तुम्ही कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून राहू नका. तुमची मुक्ती तुमच्या हाती आहे आणि ती तुम्हीच प्रयत्न करून मिळविली पाहिजे.” डॉ. बाबासाहेब पुढे असेही म्हणतात, “मी मूर्तिपूजक नाही उलट मूर्तिभंजनावर माझा विश्वास आहे,” असे रानडे, गांधी आणि जीना यांच्यासंबंधी १८ जानेवारी १९४३ रोजी दिलेल्या व्याख्यानाच्या पुस्तिकेच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी म्हटले होते.' 
     अस्सल नाणं वाजल्याशिवाय राहत नाही. ‘सत्यमेव जयते’ या उक्तिप्रमाणे आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे प्रथम गुरू तथागत गौतम बुध्द यांचे कार्य, त्याग, बहुजनांसाठीची असलेली तळमळ ही लपविण्यात आली होती; पण आज उशीरा का होईना या दोन महामानवांचं कार्य पुढे येवू लागलं आहे-त्यांचं महत्व साऱ्या जगाला आता पटू लागलंय.
          दोन दिवसांपूर्वीच्या वर्तमानपत्रात ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी येत्या शंभर वर्षात मानवाला पृथ्वी सोडून अन्य ग्रहावर जावे लागेल असं भाकित केलंय. विचार करा १०० वर्षांत किती भयानक परिस्थिती असू शकते आपली. आपल्या पुढच्या पिढीची जेमतेम यापुढे केवळ दोन पिढ्याच जगू शकतात या पृथ्वीवर, याला कारण आपणच आहोत. आपण आपल्या चैनीसाठी, उपभोगासाठी वाट्टेल तसं मनमुराद वागू लागलो. ज्या पृथ्वीवर राहतो तीची काळजी घेतली पाहिजे हा विचारच भूईसपाट झालाय. याबाबत एका वर्तमानपत्रात पनवेलच्या पत्रलेखिका अर्पिता पाठक यांनी आपल्या पत्रात या मुद्द्यावर ‘आध्यात्माची कास धरा’ असे आवाहन केले आहे. मनुष्याचे सर्वांगीण कल्याण करणाऱ्या आध्यात्माची कास पकडण्याविना जगाला पर्याय नाही असं त्या पत्रात लिहितात. याचाच अर्थ बुध्दाच्या धम्माला त्याच्या विपश्यनेला पर्याय नाहीय यापुढे बंधुनो.
      डॉ. आंबेडकरांचा एक अतिशय सुंदर असा सुविचार आहे, “Cultuvation of mind should be ultimate aim of human existence.” मनाची मशागत ही मानवी अस्तित्वाचे अंतीम ध्येय असावे. म्हणजे बुध्दीचा विकास मानवी अस्तित्वाचे अंतीम लक्ष असायला पाहिजे आणि बुध्दीचा विकास हा दोन पर्यायांनी आत्मसात करता येतो-एक म्हणजे पुस्तकांचे वाचन करून जो बाबासाहेबांनी मार्ग निवडला आणि दुसरा म्हणजे विपश्यनेने Meditation ने मेडिटेशनमध्ये खरी खुरी रिॲलिटी असते. आपलं मन म्हणजे एक जादू आहे जादू. एक किस्सा आठवला. तो ऐकल्यावर आपल्यालाही खात्री पटेल की काय ताकद असते ती मनाच्या सामर्थ्याची..! 
      एका गावाच्या वेशीबाहेर एक ५/६ वर्षांचा आणि दुसरा ११/१२ वर्षांचा मुलगा जंगलामध्ये फिरायला गेले. जंगलात फिरता फिरता त्यांना एक विहीर दिसली. त्या विहीरीजवळ गेल्यावर अचानक एक अपघात झाला. त्या दोन मुलांपैकी जो मोठा मुलगा ११/१२ वर्षाचा होता तो त्या विहीरीत पाण्यामध्ये पडला. आता दोघेही खूप घाबरलेले, किंचाळत होते. वाचवा-वाचवा म्हणून ओरडून धावा करीत होते. पण गावापासून दूर असलेल्या त्या जंगलात कोणी नसल्यामुळे या दोघांना काही सुचेनासं झालं. विहीरीच्या वर असलेल्या लहान मुलाने वेळ न दवडता त्या विहीरीला असलेल्या पाणी काढायच्या दोरीला पाण्यामध्ये लगेच फेकले आणि त्याच्या मित्रास पकडायला सांगितले. पाण्यामध्ये पडलेला मित्रही लगेचच त्या दोरीला बिलगला व वरती येण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर वर असलेल्या त्या लहान मित्राने त्याचे सर्व प्रयत्न पणाला लावून त्या दोरीने त्याला वर काढले. त्यांनी एकमेकांना गच्च मिठी मारली आणि त्यांच्या डोळयातून आनंदाश्रू वाहू लागले. पण बंधुंनो गोष्ट खरी पुढे सुरू झाली. या अपघातातून ते दोघे मित्र आपल्या गावी परतले. झाला प्रकार त्या दोघांनी लोकांना सांगितला. पण त्या दोघांना धीर द्यायच्या ऐवजी लोकांनी मुर्खात काढले आणि कधी शक्य आहे का? हे खोटं बोलतायत म्हणून मग त्या गावामध्ये एक वयस्कर गृहस्थ जे बुजूर्ग समजले जायचे त्यांच्याकडे हे लोक गेले आणि झाला प्रकार सांगून ही गोष्ट शक्य आहे काय? असे त्या गृहस्थाला विचारले तर ते बुजूर्ग त्वरीत म्हणाले , 'का नाही हा छोटा मुलगा एक त्याहून मोठ्या मुलाला विहीरीतून बाहेर काढू शकत? काढू शकतो. नक्की काढू शकतो.' तरीही लोकांना पटेना म्हणून त्यांनी आणखी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्या बुजूर्ग माणसाने सांगितलेले शब्द किती मार्मिक आणि प्रभावी आहेत याचे प्रत्यंतर येते. ते असं म्हणाले, ‘ज्यावेळी मोठा मुलगा विहीरीत पडल्यावर छोट्या मुलाने आपले सारी शक्ती पणाला लावून प्रयत्न केला आणि त्याने आपल्या मित्राला सहिसलामत विहिरीच्या बाहेर काढले याचे कारण असे की, त्यावेळी त्या ठिकाणी त्या लहान मित्राला ‘तुला हे जमणार नाही,’ असं सांगणारा तिथे अन्य कोणीही नव्हता…' पाहिलंत एक लहान मुलगा आपल्यापेक्षा एका मोठ्या मुलाला विहिरीतून दोरीच्या सहाय्याने सहिसलामत बाहेर काढू शकतो. दॅट इज द पॉवर ऑफ माईंङ याच पॉवर ऑफ माईंडने आपण अशक्यप्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवू शकतो. मग ती युपीएससी-एमपीएससीची परिक्षा असो, स्पोटर्स, आर्ट, ट्रेकिंग सारखे धाडशी साहसे असोत वा अन्य काहीही. कोणत्याही गोष्टीची आवड लागली ती हाती लागेपर्यंत तीचा ध्यास सोडता कामा नये यासाठी केवळ आपल्या मनात एक ठिणगी पडणे आवश्यक आहे आणि ती ठिणगी म्हणजे प्रबळ इच्छेची.
    माझं असं म्हणणं आहे की, या आपल्या निसर्गत:च मिळालेल्या मनाच्या सामर्थ्याच्या (mind power) जोडीला जरका spirituality अध्यात्माची जोड मिळाली तर या जगात असाध्य ते साध्य होवू शकतं. सध्या समाजात चाललेल्या अत्याचारांवर, व्याभिचारांवर, आपापसातील संघर्षांवर, चोरी, खून बलात्कार या अतिशय वाईट घटना थांबू शकतात. या रानटीपणाचे रूपांतर सज्जनामध्ये घडू शकतं असं मी खात्रीलायक सांगू शकतो. जसं म्हणतात ना वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याचप्रमाणे तथागतांच्या जीवनातील जो प्रत्येक वाटसरूची हत्या करून त्याचे एक बोट तो आपल्या गळ्यातील माळेत बांधून ठेवी तो अंगुलीमालासारखा क्रुर डाकू त्यांना लीन झाला. किती शक्ती असते या आपल्या मनाच्या सामर्थ्यात. आपण ज्यांना चमत्कार म्हणतो ते बुध्दाकडेही दाखविण्यासारखे नव्हते असे नाही. पण त्यांनी कधी त्याचे प्रदर्शन केलं नाही. त्यांनी त्याही पुढे जावून मानव दु:खाने गांजलेला आहे आणि त्या दु:खाचं मुळ शोधून काढल्याशिवाय ते शांत झाले नाहीत. ही संबोधी म्हणजे ज्ञानप्राप्ती मिळवण्यासाठी आपणा साऱ्यांनाच माहिती आहे त्यांनी आपले आईवडील, पत्नी, मुलगा इतकंच नव्हे तर तो एका विजयी राजाचा राजपुत्र असूनही संपूर्ण राज्याचा त्याग करून वैराग्य धारण करून त्यानंतर आत्मक्लेश करून पाहिला. त्यांच्या मनात असलेल्या साशंकता तपासण्यात काही वर्षे घेतली. सर्व मनुष्य, प्राणी अन्य जीवसृष्टीस अनुकूल ठरेल अशा मध्यम मार्गाचा धम्माची ज्ञानप्राप्ती केवळ ४ आठवड्यांमध्ये झाली. त्यात त्यांना या जगात दोन समस्या आहेत हे उमजलं. एक म्हणजे दु:ख आणि दुसरं म्हणजे दू:ख दूर करून मानवाला सुखी कसं करावे हे होय. तथागतांची त्यानंतरची घोडदौड आपणास ठावूकच आहे. हा हा म्हणता जगभर त्यांचे नाव पसरलं. जनसमुदायांचे लोटच्या लोट भिक्खूसंघात सामिल झाले.
     बुध्दाने आपल्या धम्मशासनात आपणा स्वत:साठी असे विशेष स्थान निर्मिलेले नाही किंवा आजच्या भोंदूसाधूंप्रमाणे आपला त्यांनी उत्तराधिकारीही नेमला नाही. त्यांच्यामते, ‘धम्म हा स्वत:च्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे; त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे.’ त्याचबरोबर ते असं म्हणतात की, मी मार्गदात आहे, मोक्षदाता नव्हे, मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवावा. केवढा तो नम्रपणा, किती विनय, किती ती करूणा आणि किती तो शांतीमय प्रफुल्ल असा चेहरा. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच आपल्याही अंतरंगात एक विशिष्ट प्रकारची फ्रिक्वेन्सी तयार झाल्यावाचून राहत नाही. ज्याला ज्याला बुध्द म्हणजे काय हे जाणून घ्याचं असेल त्याने त्याने मेडिटेशनची पहिली पायरी तरी चढून पहावी. नाहीतर हे सर्व सांगणं म्हणजे सात आंधळे आणि हत्ती यांच्या गोष्टीसारखं होईल. जसं सात आंधळे असतात. त्यांना एका हत्तीसमोर उभे केलं जातं त्यातीत पहिला आंधळा हत्तीच्या पायाला हात लावून असा निष्कर्ष काढतो की, हा एक मोठा खांब आहे. त्यानंतर दुसरा आंधळा त्याच्या सोंडेला हात लावून म्हणतो की, हा एक वेडावाकडा रस्ता आहे. तिसरा आंधळा हत्तीच्या शेपटीला स्पर्श करून ही एक दोरी आहे असे अनुमान काढतो. असे करत करत ६ आंधळे त्या हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून वेगवेगळे अनुमान काढून त्या बिचाऱ्या हत्तीला वेगवेगळया वस्तुंची उपमा देवून टाकतात पण कोणालाच हत्ती हा प्राणी आहे हे ओळखता येत नाही. परंतू डोळस माणूस असे म्हणेल की, हत्तीच्या बाबतीत ही सर्व वर्णने अंशत:च खरी असून त्याचे प्रत्यक्ष स्वरूप यापेक्षा वेगळे आहे. म्हणून म्हणतो एखादी गोष्ट ‘जाणण्याने’ विश्वास येतो आणि ‘मानण्याने’ अंधविश्वास येतो. अग्नी ही एक ऊर्जा आहे. तीला स्पर्श केला तर शरीराला इजा होते. तसेच बर्फ ही थंड वस्तू आहे या गोष्टी आपण जाणतोच-मानत नाही. कारण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि प्रत्यक्ष अनुभव घेणे यालाच जाणणे म्हणतात आणि अप्रत्यक्ष अनुभवणे उदा. माझ्या खापरपणजोबांनी पणजोबांना सांगितले, पणजोबांनी आजोबांना सांगितले आजोबानी वडिलांना सांगितले आणि वडिलांनी मला सांगितले म्हणून मी कोणत्याही तर्कबुद्धीने खरी वस्तुस्थिती न पाहता  नुसतं मानू लागलो तर आणि लोकांनी सांगितले म्हणून मी विश्वास ठेवला याला म्हणतात अंधविश्वास. तथागतांना काही लोक हे विष्णूचा अवतार मानतात. त्याच्या विरोधात आंबेडकरांनीही आपल्या २२ प्रतिज्ञांमध्ये त्याचे खंडन केले आहे. क्रमांक ५ मध्ये त्यांनी असं म्हटलंय, “बुध्द हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा व खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो.” मुळात बुद्धानेही आत्मा आणि पुनर्जन्माचे खंडन केले आहे आहे. मनुष्याचे त्याच्या जन्मापासून ते मारेपर्यंतच त्याचे अस्तित्व आहे असा वैज्ञानिक दृष्टीकोन त्याने जगासमोर मांडूनही त्याला विष्णूच्या रांगेत बसविले जाते हे अज्ञान नाही तर काय?
     स्वामी विवेकानंदांचा एक सुविचार लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणतात, “एका वेळी असे शंभर बुध्द निर्माण व्हायला हवेत ही काळाची गरज आहे.” कारण याच बुध्दाने-तथागताने दृष्टीआडची सृष्टी पाहिली आणि आपल्यालाही दाखवली. तर ही दृष्टीआडची सृष्टी कधी पहायला मिळते तर डोळे मिटून काही काळ शांत बसल्याने-ध्यान साधनेने-मेडिटेशनने. Meditaion is a part of spirituality and the spirituality meance right action with the right time. किंवा Reality हा as it is observe करणं म्हणजे spirituality.
     पण इथेही एक संभ्रम आहे तो स्पष्ट केलाच पाहिजे. शाळा शिकून मोठा झाला याला आपण सुशिक्षित म्हणतो. पण सुशिक्षताची परिभाषा कशी ठरवावी. डॉ. बाबासाहेब म्हणतात की, शिक्षण हा एक विशाल महासागर आहे आणि तो आपण आजन्म शिकावयाचे ठरविले तरी त्याच्या केवळ गुडगाभर पाण्याच्या खोलीइतके ज्ञान प्राप्त करू शकतो. इतके हे ज्ञान विशाल आहे. त्यामुळे गंमत अशी होते की चार दोन पुस्तके वाचून काही इयत्ता शिकलेला माणूस स्वत:ला सुशिक्षीत म्हणजे ‘बुध्दीमान’ म्हणवतो. तर अजिबातच न शिकलेल्यास लोक अशिक्षित ‘बुध्दू’ समजतात आणि या अशिक्षित आणि सुशिक्षितांच्याही कितीतरी वर गेलेला तो ‘बुध्द’ होय. म्हणजे सर्वात खालचा बुध्दू, त्याच्यावरचा बुध्दीमान आणि सर्वात उच्च स्थानावर असलेला तो बुध्द होय. पण या तीन स्तरांमधील सर्वात खालचा म्हणजे बुध्दू आणि सर्वात वरचा म्हणजे बुध्द हे दोन्ही लोक कुणाच्याही वादविवादात सामिल होत नाहीत. सर्वात खालचा बुध्दू याला तर त्या विषयाचे काहीच ज्ञान नसते आणि सर्वात वरचा म्हणजे बुध्द (ज्याला खरोखर संबोधि प्राप्त झाली) याला त्या विषयाचे पुरेपूर ज्ञान असतेच शिवाय त्याच्या व्यतिरिक्त अन्यही सर्वांगीण ज्ञान आणि त्याचा परिणाम काय साधला जाणार आहे याची तर्कबुध्दीच्या जोरावर तो सारे अवगत असतो आणि त्यामुळे हा बुध्द कुठल्याही वादात पडण्याचे टाळतो. आता राहता राहिला तो मधला बुध्दीमान समाजाला जाणारा वर्ग. याला तर काही कामच नाही म्हणा ना. कोणताही विषय त्याला द्या हा आपला सुरूच झाला पाहिजे जेणेकरून समोरच्यालाही वाटावे की किती हा विद्वान बरे. पण या स्वत:ला बुध्दीमान म्हणविणाऱ्या आणि आपलेच म्हणणे दुसऱ्यावर लादणाऱ्या अशा वर्गापासून आपण सावध राहिले पाहिजे.    
     नाईलाजाची विश्रांती म्हणजे झोप आणि ईलाजाची विश्रांती म्हणजे ध्यान-मेडिटेशन. याच मेडिटेशनच्या जोरावर आपण दृष्टीआडची सृष्टी पाहू शकतो. अन्यत: आपण सर्व एका अंधाऱ्या खोलीत धडपडतोय असं म्हणवं लागेल. याच मेडिटेशनमुळे सत्य काय आणि असत्य काय याचं अन्वेषण (analysis) तंतोतंतपणे करता येतं. नाही तर लोकांनी प्रेम या भावनेला किती विचित्रपणे रंवून ठेवलंय… एक प्रेम आहे ज्यातून आपण काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न कातो आणि एक प्रेम आहे ज्यात आपण पूर्णपणे डूबून जातो. तिथे कोणताही स्वार्थ्, संकुचतपणा, कुहेतू नसतो. निर्मळ प्रेम, प्रेम आणि प्रेम प्रज्ञावान प्रेम असतं.पहिलं प्रेम हे मुला-मुलींचं प्रेम, आई-मुलांचं प्रेम, वडील-मुलाचं प्रेम, भाऊ-बहिणीचं प्रेम आणि अन्य नात्यातील प्रेम हे प्रेम आणि मी वर सांगितलेलं प्रेम यात जमीन-समानाचं अंतर आहे. पहिल्या प्रमात केवळ मिळावट आहे, स्वार्थ आहे तर दुसऱ्या प्रेमात नेहमीच त्याग आणि त्यागच असतो. बरं देशभक्ती म्हणजे प्रेम आहे का? तसे असेल तर दोन राष्ट्रा-राष्ट्रांमधील देशभक्तांनी केलेली एकमेकांची हत्या ही एक प्रेमळ कृती समजावी लागेल. म्हणून खरे प्रेम हे आंधळे नसते. प्रमाची स्वत:ची अशी प्रज्ञा असते. तेथे अहंकाराला जागा नसते. ते निरागस असतं.

     एका चित्रकाराला परमेश्वराचं चित्र काढायची इच्छा  होते. त्याचा मित्र त्याला एका ५/६ वर्षांच्या मुलाचं चित्र काढ ते थेट कृष्णासारखे होईल असा सल्ला देतो. चित्रकार या कामात यशस्वी होतो. खूप सूंदर झालेल्या कलाकृतीमुळे हा चित्रकार बक्कळ पैसाही कमावतो. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा त्याला राक्षसाचं चित्र काण्याची कल्पना सुचते. पुन्हा मित्र त्याला सल्ला देतो की, तुरूंगात जाऊन ज्यानं अनेक खू, दंगली, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केलेल्या कैद्याला समोर बसवून तो राक्षसाचं चित्र काढतो. हिंस्त्र दिसणारा, लाबुंद डोळे, केस-दाढी वाढलेला, क्रूर चेहऱ्याचा कैदी विस्मयानं जेव्हा चित्रकाराला विचारतो, तेव्हा त्याला समजते की, चित्रकार एका राक्षसाचं चित्र काढतोय. क्षणात तो कैदी स्तब्ध होऊन त्याच्या डोळयातून अश्रू वाहू लागतात. म्हणून चित्रकार त्याला विचारतो की, तू रडतो का आहेस? त्यावर तो कैदी म्हणतो, चित्रकार महाशय, तुम्ही मला ओळखलं नाहीत. वीस वर्षांपूर्वी त्या गोड मुलाला समोर ठेवून कृष्णाचं चित्र काढलं होतं, तो मीच आहे. या वीस वर्षांच्या माझ्यातला देव हळूहळू क्षीण, दुबळा होवून मरत गेला आणि राक्षस हळूहळू बलवान होत गेला… असंच काहीसं आपल्या आतमध्ये दोन प्रवृतींचं सदैव युध्द सुरू असतं, यामध्ये जिंकतं कोण? बरेचदा ज्या प्रवृत्तीला आपण प्रोत्‍साहन देतो ज्याच्या आम्ही आहारी जातो आणि गुलाम होतो.
     आणखी एक वेगळा मुद्दा आपल्यासोबत शेअर करावासा वाटतो तो म्हणजे कोणत्याही नागरी संस्कृतीचा विनाशाचे तीन कट - एका पौर्वात्य विचारवंताच्या चिंतनातून आलेलं हे क कटूसत्य-
1.  कुटूंबव्यवस्था उध्वस्त करणे : कुटूंबातील आईचं स्थान उळमळीत करणे. तीला घर सांभाळणारी स्त्री म्हणून घेण्याची लाज वाटू लागेल तेव्हा ती आपल्या पाल्यांवर आणि संपूर्ण घरावर संस्कार करण्यास अपयशी होईल. 'स्वामि तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे उचीग नाही म्हटलेलं. पण मग याच आईमुळे तीच्या पाल्यांवर, घरावर योग्य संस्कार करण्याची, त्यांना घडविण्याची शक्ती असते. कोणत्याही पाल्याला बाळकडू हे तीच देते. त्याच मातेला चिथावणी देऊन नको ते डोक्यामध्ये घालून तीचं मुळात घरपण आणि घर सांभाळणारी स्त्री अशी जाणीव करून दिली; तीच्या आत अन्यायाची ठिणगी पेटावी आणि एकदा ठिणगी पेटली की आपणा सर्वांना माहित्येय त्या ठिणगीचं वणव्यात कसं रूपांतर होते आणि त्याचे काय परिणाम होतात ते.
2.  शिक्षणप्रणाली भ्रष्ट करणे : गुरू, गुरूजी या शब्दाचा खरा अर्थ- 'गु 'म्हणजे अंधार आणि 'रू' म्हणजे दूर करणारा. मुलांवर आईनंतर संस्कार करणारा दुसरा गुरू म्हणजे शिक्षक! पण याच नागरी संस्कृतीच्या विनाशासाठी शिक्षकांचं समाजातील स्थान महत्व कमी करणे. विद्यार्थ्यांच्या मनातील त्यांची प्रतिमा, आदर संपुष्टात येईपर्यंत तुच्छ लेखणे हे एक नागरी संस्कृतीचा विनाशाचे कारण होय. 
3.  जे आदर्श/दीपस्तंभ आहेत त्यांची मानहानी करणे : बुद्धिवंतांच्या- आपल्या आदर्श व्यक्तींच्या कार्यामुळे पुढील पिढीस प्रेरणा मिळते, बळ मिळते. समाजासाठी हिताचं कार्य करण्याची इर्शा निर्माण होते. पण समाज बिघडविण्यासाठी नागरी संस्कृतीचा नाश करण्यासाठी याच बुध्दिवंतांचा अपमान करणे, त्यांच्यावर शिंतोडे उडविणे, विटंबना करणे, त्यांच्या विचारांवर एवढा संशय निर्माण करणे की, कोणी त्यांचं गंभीरपणे ऐकणार नाही. कोणी त्यांच्या विचारधारेचा अवलंब करणार नाही किंवा कोणी त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणार नाही. एकदा का विवेकी आई गायब झाली, विद्येसाठी आयुष्य वेचणारा धेयवादी गुरू खचून गेला आणि सर्वस्व त्यागणारा, समर्पित वृत्तीच्या बुध्दिवंताचा ऱ्हास झाला की नव्या पिढीला मुल्याचं शिक्षण कोण देणार?

       बुध्दाच्या वाटेवर चालणाऱ्या या बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांचे कर्तुत्व आणि उपकार संपूर्ण भारतवासियांवर आहेत. भारताच्या बहुजनांसाठी त्यांच्या हितासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आपला देह झिजवला. बंधुनो, बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरूध्द लढण्यासाठी ते स्वत:च्या कुटूंबापासून अनेकदा दूर राहिले. मनामनात अन्यायाविरूध्द लढण्याची इर्शा निर्माण केली. खचलेल्या पिचलेल्यांचे मनोबल वाढविले. इतकेच नव्हे तर इतरांचा रोष आढवून घेतला, टीकांना सामोरे जावे लागले. राष्ट्रद्रोहाचा त्यांच्यावर आरोपही झाला. पण या सगळयाला बाबासाहेबांनी अत्यंत प्रभावीपणे कृतीतून उत्तरे दिली आणि भल्याभल्या प्रकांड पंडितांची तोंडे बंद केली . पण मला एका अदृश्य मुद्दयावर भाष्य करावसं वाटतं ते म्हणजे, आपल्या समाजासाठी विषमेतेविरूध्द लढत असताना त्यांनी आपला पिता गमावला. वडीलांच्या आरोग्याकडे बाबासाहेबांना नीट लक्ष नाही देता आलं. याच विषमतेविरूध्द लढताना बाबासाहेबांनी आपली पत्नी रमा हिला गमाविले. याचसाठी बाबासाहेबांनी राजरत्न आणि त्यांच्या इतर मुलांना गमाविले. याचसाठी त्यांनी मोठे बंधू यांना गमाविले. ही जी मोठी लोकं असतात ना त्यांना स्वत:च्या घरच्यांचा विचार करायला त्यांची देखभाल करायला वेळच नसतो. त्यांना त्याही पेक्षा महत्वाचे काम हे समाजचे वाटते आणि त्यात ते स्वत:ला झोकून देतात. किंबहुना स्वत:साठी लक्ष द्यायला त्यांना सवडच नसते. मला असं वाटतं की, ही महान माणसं जन्मच मुळी दुसऱ्यांचं हित जपण्यासाठीच घेतात. तथागत गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे आपणा सर्वांवर अमाप उपकार आहेत म्हणून बंधूंनो या महामानवांचे आपण कायम ऋणीच असलं पाहिजे.


(सदरील लेख हा माझे सन २०१७ चे भाषण आहे) 

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

राजगृहाची अविस्मरणीय भेट

राजगृहाची अविस्मरणीय सपत्नीक भेट


     भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'राजगृह' हे मुंबईमधील दादरच्या हिंदू कॉलनीतील तीन मजली पवित्र, ऐतिहासिक, आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थळ.  ह्या वास्तूचे दर्शन घेण्याचा आज १८ नोव्हेंबर २०१८ रोजी योग आला. हिंदू कॉलनीसारख्या उच्चभ्रू वस्तीत हेरिटेज (वारसा वास्तू) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन मजल्यांच्या डौलदार इमारतीमध्ये बाबासाहेब १५ ते २० वर्षे वास्तव्यास होते. तत्पूर्वी डॉ. आंबेडकर मुंबईतील पोयबावाडी परिसरात राहत व त्यांचे ऑफिस परळच्या दामोदर हॉल जवळ होते.

 

    खरंतर बाबासाहेबांचे बालपणापासूनचे ते शिक्षण होईपर्यंतचे दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली आणि अल्पावधीतच ते एक ख्यातनाम वकिल म्हणून नाव झालं. घरी येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता वाढला. त्यामुळे पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. आयुष्यभर पुस्तकांची असीम भूक असलेल्या बाबासाहेबांनी त्यांच्या संग्रही असलेल्या खास ५०,००० हून अधिक ग्रंथांसाठी अपुऱ्या जागेअभावी १९३१ ते १९३३ मध्ये हे राजगृह बांधले. तत्कालीन जगातील सर्वात मोठे वैयक्तिक ग्रंथालय म्हणून ओळखले जाते. हाच तो त्यांच्या स्वप्नातला प्रत्यक्षात उतरलेला राजगृह! हा राजगृह उभा करताना ग्रंथालयासह घराचा आराखडा त्यांनी स्वत:च तयार केला. परदेशातील उत्तमोत्तम ग्रंथालयांची रचना ते आजवर पाहत आलेले होतेच. पण हा राजगृह असा तसा उभा नाही राहिलेला. पूर्वी बाबासाहेबांनी दादरच्या हिंदू कॉलनीत दोन प्लॉट खरेदी केले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन दोन वर्षात बांधकाम पूर्ण केले. पुढे मग कर्जाची फेड व ग्रंथ खरेदी करण्यासाठी दोन प्लॉट वरील बांधकामांपैकी तिसऱ्या गल्लीतील प्लॉट क्रमांक ९९ वरील 'चार मिनार' ही इमारत विकली आणि पाचव्या गल्लीतील प्लॉट क्रमांक १२९ वरील ५५ चौरस यार्ड जागेवर पुस्तकांच्या सुरक्षेसाठी बांधलेले ‘राजगृह’ कायमचे सुरक्षित ठेवले.











     अशा या पुस्तकप्रेमीने खास पुस्तकांसाठी उभारलेल्या राजगृहाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच 'बुद्धमं शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि' चे सुमधूर ध्वनी कानावर पडले आणि मन प्रफुल्लित आणि चैतन्यमयी होऊन गेले. समोरच टेबल-खुर्ची, टेबलावरील राष्ट्रहितैषी दूरदृष्टी लाभलेल्या बाबांच्या चष्म्यावरून आमची नजर हटत नव्हती. क्षणभर असंही वाटलं की, बाबा आताच डोळ्यावरचा चष्मा टेबलवर ठेवून इथे कुठे बाजूला तर गेले नाहीत ना? टेबलावर आणखी बाजूलाच त्यांचा पाणी प्यायचा तांब्या-पेला दिसला आणि त्यांनी बालपणी याच पाण्यामुळे भोगलेल्या यातनांचे प्रसंग चटकन डोळ्यासमोर झर्र्कन येऊन गेलेच. बाबा चालताना वापरात असलेल्या ऊर्ध्वबाजूला अर्धगोल असलेल्या ५/६ काठ्याही नकळतपणे खूप काही सांगून जातात. टेबल-खुर्ची भोवती आणि खोलीभर मोठमोठाले ग्रंथ फर्निचरी कपाटात व्यवसथितरित्या लावलेले पाहिले. त्यातील एका समोरील कपाटावर दोन फुटी तथागत बुद्धांची अगदी खरंखुरं चीवर परिधान केलेल्या उभ्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन आम्ही दुसऱ्या खोलीत गेलो. तिथे बाबासाहेबांची जेवणाची भांडी, बाथ-टब, माता रामाईचं ओरिजिनल छायाचित्र पाहून बाबासाहेबांचा संसार डोळ्यासमोर उभा राहतो. तसेच रमाईंच्या देहांतानंतरच्या वैफल्यग्रस्त मन:स्थितीतील छायाचित्राने रमाईवरील त्यांच्या प्रेमाचं प्रत्यंतर आल्यावाचून राहत नाही. त्याच्या बाजूलाच बाबांची बैठक खोली आणि भिंतींच्या चाहोबाजूनी व्यापून टाकलेली हिस्टोरिकल छायाचित्रे पाहून बाबांची कारकीर्द आणि त्यांनी आयुष्यभर केलेला विषमतेविरुद्धचा संघर्ष बोलका होतो. शेवटच्या रांगेत ब्लॅक अँड व्हाईट छबीतला बाबांच्या अंत्ययात्रेचा आणि या अंत्ययात्रेला त्यांच्या अनुयायांचा चैत्यभूमीच्या अरबी समुद्रावर लोटलेला महासागर पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रति त्या राजगृहात अश्रुंचे दोन थेंब अखेर ठिपकलेच. 
  
















   
      त्याच्या पुढच्या खोलीत थायलंड देशाने खास राजगृहासाठी भेट म्हणून अर्पण केलेली तथागत बुद्धांची पांढरीशुभ्र ध्यानमुद्रेतली सुमारे ८ फुटी मूर्ती इतक्या जवळून डोळ्यात मावत नाही. डोक्यावर पांढरी शुभ्र त्या देशाची संस्कृती ल्यालेली गोलाकार सुबक आकाराची छत्री लक्षवेधी ठरते. बुद्धाच्या चेहऱ्यावरील असीम करुणामयी मुद्रेकडे पाहता-पाहता एव्हाना मंद आवाजातील 'बुद्धमं शरणं गच्छामि'चा ध्वनी मोठा होऊन तो हृदयात खोलवर जात असल्याचा विलक्षण अनुभव आला. ज्याने शुद्धोधनासारख्या शूरवीर पराक्रमी राज्याचे विशाल साम्राज्य, विपुल धनसंपत्ती, यशोधरेसारखी रूपवान, शीलसंपन्न पत्नी  व गोंडस राहुल या सर्वांचा त्याग करून तो अखंड मानवजातीच्या दुःखाचे, वैराचे, अत्याचारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विपश्यनेतून सम्यक संबोधी प्राप्त करून साऱ्या अंधःकारी जगाला प्रज्ञेचा नवा प्रकाश दाखविला ते विश्वदीप, करूणेचा महामेरू तथागत गौतम बुद्ध आणि ज्याने अतुल्य अशा शिक्षणाच्या उच्च शिखरावर जाऊन स्वतःचे वडील, पत्नी, मुलं आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष्य करून माझ्यासारख्या लाखो कुटुंबांसाठी अहोरात्र चंदनापरी झिजला त्या थोर महामानवाचे-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुनःश्च दर्शन घेऊन राजगृहाच्या बाहेरील दरवाजात असलेल्या नोंदवहीत राजगृह भेटीने धन्य पावल्याचा अभिप्राय लिहून आम्ही दोघं पती-पत्नी तृप्त मनाने आणि नवचैतन्याने या आमच्या प्रेरणास्थळाचा-राजगृहाचा अखेर निरोप घेतला.

https://www.youtube.com/watch?v=kFUD_9amtBY&app=desktop


*******

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

मनुस्मृती दहनामागील डॉ. आंबेडकरांची राष्ट्रहितैषी भूमिका

     राजगृहात पन्नास हजार ग्रंथांचं संग्रहालय आणि पंचवीस हजारांपेक्षा जास्त जगभरातील महान ग्रंथांचं परदेशातून भारतात येतानाचं डुबलेलं जहाज इतका पुस्तकांचा खजिना बाळगणाऱ्या आणि पुस्तकांप्रति असीम प्रेम असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ मनुस्मृतीसारखा एकच ग्रंथ जाळावास का वाटला? त्यांनी पोटाची भूक मारून ज्ञानाची भूक भागविण्यासाठी जगभरातील ज्ञानाचं परिमार्जन करून तसंच रस्त्यावरील स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात वाचन करून स्वत:ची प्रज्ञा प्रगल्भ करणाऱ्या या प्रकांड पंडितानं मनुस्मृतीचा विध्वंस का करावा? का त्याचं मनुशी वैर होतं? नाही, मनू तर कित्येक शतकं अगोदर निर्मिला गेला होता. डॉ. आंबेडकरांच्या वाचनात जेव्हा हा ग्रंथ आला तेव्हा त्यांना या ग्रंथातील(?) विषमतेचे जहर किती ठासून भरलेलं आहे हे लक्षात आलं. जगाच्या तुलनेत केवळ भारत देशातच इतकं बिभित्स चित्र होतं की, इथे पशुपक्षांना जगण्याचा अधिकार होता. पण तुमच्या आमच्यासारख्या चालत्याबोलत्या जीवंत हाडामांसाच्या माणसांना मात्र नव्हता. किती हा विरोधाभास? बरं याचे क्षणोक्षणी चटके सोसलेल्या या महान तपस्वीने शेवटी स्वत:ला मानवधर्मशास्त्र म्हणवून घेणाऱ्या मनुस्मृतीनामक विषमतेच्या जहराची २५ डिसेंबर १९२७ रोजी राखरांगोळी केली आणि त्यास सुरक्षित पर्याय म्हणून भारतीय संविधान निर्माण करून बहुजनांचा उध्दार केला.  

    अतुलनीय अशा भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास तर केलाच शिवाय आपल्याच देशातील प्राचिन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरांचा, राजकीय, सामाजिक, धार्मिक घडामोडींचा आणि त्यांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करताना त्यांना एक अद्भुत अमानवी कठोर नियमांची स्मृती आढळून आली. ती मनुस्मृती होय. मात्र आजवर कोणीही या ग्रंथाचा इतका चिकित्सकपणे अभ्यास न करता आणि आपले परखड मत जगासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कोणीही मांडले नाही. गेल्या शतकातील समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांनीही ‘जाळून टाकावा मनुग्रंथ’ असे म्हटले आहे. या गुरूच्या मनातील चीड शिष्याच्या थेट ह्रदयात जावून भिडली आणि इतकेच नाही तर त्यांच्या विद्वत्तेच्या जोरावर मनुस्मृतीला दुसरा पर्याय सार्वभौमत्वाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असलेले संविधान निर्मिले आणि समस्त बहुजनांवर आणि सर्व स्त्रीयांवर मग त्या स्त्रीया ब्राम्हण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो वा शुद्र सर्व स्तरातील स्त्रीयांना न्याय्यहक्क मिळवून देऊन जणू त्यांना दुसरा स्वाभिमानाचा जन्म बहाल केला. 

     कधी कधी गंमतीनं असं वाटतं की डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी सकपाळांनी याच महान कार्यासाठी तर नाही ना भिवाला संस्कृत शिकावयास लावले? कारण आजतागायत कोणीही या स्मृतींना हात लावण्यास धजावला नाही; तो विडा फक्त डॉ. बाबासाहेबांनीच उचलला. जगात एखाद्या गोष्टीला नकारात्मक शिक्कामोर्तब करणात्यांची संख्या कमी नाही; पण याने तर नकारातून सकारात्मक असे संविधान निर्मिले आणि आज चातुवर्ण्यव्यवस्थेच्या राक्षसी गरकेतून आपली सहिसलामत सुटका केली. हजारो वर्षांचा जुना बौध्द साम्राज्याचा लोप पावलेला इतिहास शोधून तो परत भारतात सहिसलामत परत आणणाऱ्याला त्यानंतरचे कर्मकांड शोधून काढणं आणि मानवाच्या पशुहीन जगण्याला न्याय मिळवून देणं यात त्यांच्यासाठी काहीच कठीण नव्हतं. कदाचित या वास्तववादी सृष्टीलाही हेच अपेक्षित असावं. कारण हजारो वर्षे या माणूसरुतींच्या कपट विळख्यात माणूस पार अडकून गेला होता. चातुर्वर्ण्यव्यवस्था डंका पिटवणाऱ्या या मनुस्मृतीने सर्वात उच्चपदी ब्राह्मणाला ठेवलं, त्याच्याखाली दुसऱ्या क्रमांकावर मराठ्यांना ठेवलं, तिसऱ्या क्रमांकावर वाण्यांना ठेवलं आणि सर्वात शेवटी शूद्रांना ठेवलं. पहिल्या तीन जातींची या शेवटच्या जातीने विनातक्रार कायमची सेवा करायची. बरं या शूद्र जातीचे लोक म्हणजे नक्की कोण? शुद्रांसाठी बाबासाहेब इतके झगडले म्हणजे नक्की कुणासाठी झगडले? कुणासाठी ह्या ग्रंथाची जाळून होळी केली? इथेच बर्याचजणांची  गफलत होते. बहुतेकांना वाटतं की बाबासाहेबांनी महार किंवा बौद्धांसाठी हे सारं घडवून आणलं. पण खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. मनुस्मृतीच्या चौथ्या व्यवस्थेतील शूद्र म्हणजे आजच्या इतर  मागासवर्गीय जाती (Other Backward Caste) म्हणजे ओबीसी. या ओबीसीमध्ये ३४६ जातींचा समावेश होतो. त्यामध्ये कुणबी, शिंपी, सोनार, रंगारी, भिस्ती, दर्जी, कुरुबर , तांबट, कासार,  सुतार, आगरी, भावसार, तेली,माळी, कुंभार,  न्हावी, ख्रिश्चन, परिट यांसारख्या ३४६ जातींच्या न्याययहक्कांसाठी डॉ. आंबेडकरांनी हा लढा पुकारला. कारण तितकीच दयनीय होती. म्हणूनच या अमानुष ग्रंथाची डॉ. आंबेडकरांनी चिता पेटविली. 


    या चातुर्वण्य व्यवस्थेत आज बौद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांचा अंतर्भाव नाही. अतिशूद्र किंवा अत्यंज किंवा अस्पृश्य वैदिकांच्या वा हिंदूंच्या समाजरचनेच्या वेशीबाहेरच आहे. अस्पृश्य हा लोकसमूह वर्णव्यवस्थेत नाही याचा अर्थ तो धर्माच्याही बाहेर आहे.

      हिंदू आणि बौध्द यांच्या भांडणातून अस्पृश्यता निर्माण झाली असे डॉ. आंबेडकर म्हणतात. शेतीच्या शोधानंतर भटक्या जमाती एके ठिकाणी वस्त्या करून राहू लागल्या. त्यांच्या जास्त उत्पन्नामुळे त्यांच्यावर इतर भटक्या जमाती स्वाऱ्या करीत. त्यांच्यात वारंवार होणाऱ्या युध्दामुळे बऱ्याच जमातींची वाताहत झाली. अशा लोकांना सधन असलेल्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी जवळ केले. त्यांना गावाच्या वेशीजवळ जागा देऊन समाजातील हीन व गलिच्छ कामे त्यांना करायला लावली. यातून अस्पृश्यतेचा उदय झाला. त्यांनी गावकुसाबाहेर राहावे. प्रतावरील कपडेच त्यांनी वापरावे. लोखंडाचे दागिने घालावेत. त्यांनी बेटीव्यवहार स्वजातीतच करावा, त्यांना  फुटक्या भांडयातून अन्न द्यावे. त्यांनी रात्रीच्या वेळी फिरू नये. राजाच्या आज्ञेनेच, त्याचे तिन्ह धारण करून दिवसा कामासाठी गावात हिंडावे, बेवारस प्रेतांची वेशीबाहेर नेवून विल्हेवाट लावावी. अशाप्रकारचे हे अमानवी कायदे मनुस्मृतीमध्ये आहेत. अस्पृश्यतेची ही निर्मिती बुध्दपूर्वकाळातच घडून आली होती. मात्र तथागत गौतम बुद्धांनी अस्पृश्यतेला चातुर्वण्याच्या सामाजिक विषमता नष्ट केली. याच आपल्या गुरूच्या तत्वाची कास धरून 1956 साली डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांना बौद्ध धम्माची दीक्षा त्यांचे वेशीबाहेर गेलेले अस्तित्व परत मिळवून दिले. 


ब्राम्हणांचे अधिकार :- 

     मनुस्मृतीच्या नियमानुसार शिक्षण ब्राम्हणांनी घ्यावे, युद्ध  करणे,  प्रजारक्षण क्षत्रियांनी करावे, व्यापार व शेती वैश्यांनी करावे आणि या ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांची कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे म्हणे देवाने नेमून दिलेले शुद्राचे काम होय, ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ आहे कारण तो पुराणातील ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मला. त्याच्यामध्ये ब्रम्ह राहते.  पृथ्वीवर असणारे सर्व द्रव्य ब्राम्हणाचेच असते. दहा वर्षांचा ब्राम्हण मुलगा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियालाही बापासमान असतो, शूद्राचे प्रेत दक्षिण दिशेने, वैश्याचे प्रेत पश्चिमेच्या दिशेने, क्षत्रियाचे प्रेत उत्तर दिशेने आणि ब्राम्हणाचे प्रेत सूर्य उगावतो त्या पूर्व दिशेने न्यावे, ब्राम्हणाने कधीही सेवा करू नये ब्राम्हणाने कर्ज घेतल्यास त्याच्याकून अत्यल्प असे शेकडयामागे २ रूपये व्याज घ्यावे. हाच दर क्षत्रियासाठी ३ रूपये, वैश्यासाठी ४ रूपये तर शूद्रासाठी ५ रूपये आहे अशी तफावत मनुस्मृतीने केलेली आहे. मांस, लाख व मीठ विकल्यामुळे ब्राम्हण तात्काळ पतित होतो आणि दूध विकल्यामुळे तो शूद्र होतो. जगातली सर्व संपत्ती ब्राम्हणाची आहे,  ब्राम्हणाला उपाशी मरू देऊ नये कारण त्यामुळे सारे राष्ट्रच नष्ट होते. म्हणून राजांनी ब्राम्हणांना भरपूर दान दक्षिणा द्याव्यात, शुद्राकडील सर्व पैसे संपत्ती ब्राम्हणाने काढून घ्यावी, ब्राम्हणांच्याबाबतीत राजाने क्षमाशील वृत्ती ठेवावी, इतरांनी खोटी साक्ष दिली तर दंड घ्यावा आणि त्यांना हद्दपारही करावे. ब्राम्हणाला केवळ घराबाहेर घालवावे. ब्राम्हणहत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही, ब्राम्हणाचा अवमान करू नये, अग्नीला ज्यांनी गिळंकृत केले, समुद्राला पिऊन टाकले, चंद्राला लुप्त करणारे ब्राम्हण कुणालाही नष्ट करू शकतात, ब्राम्हण ज्ञानी असला काय वा नसला काय तो दैवतच आहे, 




शूद्रांचे अधिकार :- 

   शूद्रांनी उष्टे अन्न खावे, जुनी वस्त्रे घालावीत. धान्याचा उरलेला तुकडा व जुने अंथरूण वापरावे. धर्मकार्यात शूद्रांनी पंच महायज्ञ करावा पण वैदिक मंत्र म्हणू नये. शूद्राने आवश्कतेपेक्षा धनसंचय करू नये. त्याने ब्राम्हणाला धर्माचा उपदेश केला तर त्याच्या कानात व तोंडात तापलेले तेल आतावे हेही मनुस्मृती सांगते. शूद्राने कोणाला शिवी दिल्यास त्याची जीभ छाटावी व त्याच्या मुखात दहा अंगुळे लांबीचा लोखंडाचा तापलेला खिळा घालावा (8 : 271) शूद्राने ब्राम्हणास मारण्याकरिता काठी उचलली, हात उचलला वा लाथा मारल्या तर तो हात वा पाय तोडणेच योग्य होय. ब्राम्हणासोबत आसनावर बसणाऱ्या शूद्राच्या कंबरेवर तप्त लोखंडाचा चट्टा देऊन त्याला हद्दपार करावे किंवा त्याचे कुल्ले कापावेत. ब्राम्हणापुढे गर्वाने थुंकणाऱ्या शूद्राचे राजाने ओठ कापावे. ब्राम्हणासमोर लघवी करणाराचे लिंग कापावे आणि तो ब्राम्हणासमोर पादला तर त्याचे गुद कापावे. गर्वाने ब्राम्हणाचे केस धरणाऱ्या शूद्राचे हात विचार न करता छाटावे किंवा शूद्राने ब्राम्हणाला मारण्यासाठी त्याचे पाय पकडले, दाढी पकडली, मान धरली किंवा वृषण पकडले तर राजाने त्या शूद्राचे दोन्ही हात तोडून टाकावे. मारहाण करणे, द्रव्यहरण करणे याप्रकारे ब्राम्हणाला त्रास देणाऱ्या शूद्राला राजाने हालहाल करून ठार मारावे असे अत्यंत अमानुष पध्दतीचे धर्मशास्त्र हे मनूस्मृतीत आहे.



मनुस्मृतीमध्ये विश्वनिर्मितीचे खोटे दैवी कथन :- 
    मनुस्मृती म्हणते की, पृथ्वी, येथील मानव आणि जातीवर्णव्यवस्था या सर्वच गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत. हे जग प्रलयाचे वेळी अंधारात गडप झाले होते. तिथे ते निश्चेष्ट होऊन पडले होते. प्रलय संपलयानंतर परमेश्वर निर्माण झाला. मग त्याने प्रजोत्पती करण्यासाठी पाणी निर्माण होण्याची इच्छा करताच पाणी निर्माण झाले. त्यात त्याने शक्तीरूप बीज पेरले. त्या बीजापासून सूर्यासारखे तेज असणारे एक सोन्यासारखे अंडे निर्माण झाले. त्यातच प्रत्यक्ष ब्रम्हदेवाची निर्मिती झाली. ब्रम्हदेव त्या अंडयात एक वर्ष राहून नंतर स्वत:च्या इच्छेनेच त्या अंडयाची दोन शकले करून बाहेर आला. अंडयाच्या वरच्या शकलापासून स्वर्ग आणि खालच्या शकलापासून पृथ्वी निर्माण करून त्यात आकाश, अष्ट दिशा आणि जळाब्धीची निर्मिती केली. त्यानंतर मन, अहंकार, क्रोध आणि सर्व प्राणिमात्रांची देखील निर्मिती केली. त्याने पूर्वी जशी सृष्टी प्रचलित होती तशीच पुन्हा निर्माण केली. दिवस, महिने, ऋतु, नक्षत्रे, ग्रह, नद्या, समुद्र, पर्वत अशी सर्व सृष्टी त्याने निर्माण केली. परमेश्वर पुन्हा पुन्हा जगाची निर्मिती करतो. पुन्हा प्रलयाच्या वेळी उपसंहार करतो. हे सर्व रसभरीत वर्णन या सनातनी मनुसमृतीमध्ये आढळते. मग जर प्रलयापूर्वी सृष्टी जशी प्रचलित होती तशीच परमेश्वराने निर्माण केली याचा अर्थ या सृष्टीत असलेल्या वर्णव्यवस्था, स्त्री-पुरूष भेद या गोष्टी या पूर्वीच्याही सृष्टीत होत्या असे म्हणावे लागेल. ब्रम्हाने त्याच्या शरीराचे अर्धे अर्धे असे स्त्री व पुरूष दोन निर्माण केले. त्या स्त्रीपासून मैथुनधर्माने विराट नावाचा पुरूष निर्माण केला. मन हा या विराट पुरूषाचा मुलगा आहे. हे कमी की काय म्हणून त्याच्याही पुढे जाऊन मनुस्मृती सांगते की, ब्रम्हदेवाने मुखापासून ब्राम्हण, बाहूपासून क्षत्रिय, मांडीपासून वैश्य व पायापासून शुद्रांची उत्पत्ती केली. ब्रम्हाने वेद निर्माण केले. यामध्ये ब्राम्हणाचे सर्वश्रेष्ठत्व कायम रहावे म्हणून आणि इतर सर्व जातीवर्गाला दुय्यम दर्जा शाबीत रहावा या दुष्ट आणि अमानुष हेतूने काल्पनिक आणि चमत्कारीक गोष्टी मनुने सांगून लोकांच्या मनात एक भिती निर्माण केली. याच भितीपोटी लोक आंधळेपणाने या भ्रमाला पवित्र मानू लागले ते आजतगायत.


मनुस्मृती अशी जाळली :- 

     रायगड जिल्ह्यातील महाड येथे सत्याग्रहासाठी डॉ. आंबेडकर  आले होते. सत्याग्रहाच्या याच बैठकीत मनुस्मृतीबाबत ठराव मांडण्यात आला.  सखोल अभ्यासाअंती अतिशय नियोजनबध्दतेने डॉ. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर 1927 ला महाड येथे परिषदेसाठी तयार केलेल्या मंडपात मनुस्मृतीचे  दहन केले. डॉ. आंबेडकरांनी परिषदेच्या या मंडपाच्या  दारात शृंगारलेल्या वेदीवर रात्री ९ वाजता एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन केले.


टीकाकारांना  आंबेडकरांचे सडेतोड उत्तर :-

     त्यानंतर बाबासाहेबांनी जाहीरपणे आपल्या ३ फेब्रुवारी १९२८ च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अंकात मनुस्मृती जाळण्याचे कारण स्पष्ट केले. त्यावर ‘स्वराज्य’पत्राचे संपादक रा. भुस्कुटे याबाबत आक्षेपार्ह पत्र पाठविले. त्यास बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिले ते असे – “आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी; कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, धर्माची विटंबना आहे; आणि समतेचा मागमूस नसून, असमतेची मात्र धुळवड घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही एवढेच दर्शविण्याकरीता महाड येथे त्याची होळी करण्यात आली.” (पृ. 158 :2) रिडल्स इन हिंदुइझम (खंड ४) या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी १८ व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडलच MANU’S MADNESS म्हणजे ‘मनूचा वेडेपणा’ या नावाने लिहून चिकित्सा केली आहे. तसेच त्यांनी बाराव्या खंडातही (पृ. 719-724) मनुस्मृतीची समीक्षा केलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  म्हणतात . “Manu is not a matter of the past. It is even more than a past of the present. It is a ‘living past’ and therefore as really present as any present can be.” डॉ. आंबेकरांच्या मतानुसार मनुसमृती हा वर्तमानकाळात विद्यमान असलेला भूतकाळ आहे. याचा अर्थ असा की मनुसमृतीची निर्मिती इ.स. च्या आरंभकाळात झाली असली तरी तिच्या विषारी शिकवणुकीचा प्रभाव आजही लोकांच्या मनावर आहे. मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातींची विषमता, त्याने शिकविलेला देव आणि दैववाद, त्याने शिकविलेली अंधश्रध्दा आणि परस्परतुच्छता या गोष्टी आजही कायम आहेत.  


मनुस्मृती दहनामागचा हेतू :- 

      मनुस्मृतीने हजारो वर्षे लोकांच्या मनावर उच्चनीचतेच्या विषमतेचे जहर पाजल्यामुळे लोकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या गोष्ट अस्तित्वात असू शकतात हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. 'गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल,' या डॉ. बाबासाहेबांच्याच गर्जनेने मनुस्मृती जाळणे म्हणजे लोकांची ही मनुवादी समजूत जाळणे होय. शूद्रांनी फक्त आपल्या वरच्या तीन वर्णांची विशेषत: ब्राम्हणांची सेवा करावी. असे केल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतो आणि आणखी दुसरा फायदा म्हणजे शुद्राला स्वर्गप्राप्ती होते. पशूप्रमाणे जीवन जगणाऱ्या, स्वत:चं मन मारून फक्त ब्राम्हणांची सेवा करणारे शूद्रांनी आवश्यक तेवढीच संपत्ती बाळगावी. त्यापेक्षा अधिक संपत्ती शूद्रांनी बाळगली तर ब्राम्हणांसाठी ते घातक ठरते हे मनुस्मृती सांगते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ह्या लोकतंत्राच्या सूत्रांचा त्या विकृत मनुस्मृतीत अंतर्भाव असणे शक्यच नसल्यामुळे हा कायदा जाळून लोकांची मनं बदलणे हे डॉ. आंबेडकरांना तीव्रपणे वाटले. समता जाळणाऱ्या, माणुसकी जाळणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून त्यांनी लोकांच्या मनात भरलेली विषमता जाळून टाकली. 

    हल्लीच गेल्या काही दिवसात व्हॅट्सऍपवर एक माथेफिरू संविधान जाळताणाचा विडिओ व्हायरल झाल्याचं सर्वांनी पाहिलं असेल. मधेमधे तर दुर्दैवाने आंबेडकरांच्या पुतळ्यावर काहीतरी फ़ेकतानाचे हेच तरुण ज्यांना डॉ. आंबेडकराणीच जगवलं. पण या तरुणांना इतिहास माहित नाही म्हणून असे हे उपद्व्याप करतात. मधेच कुठेतरी पेपरात वाचलं की मनुस्मृतीच्या प्रती गुप्तपणे पुस्तकांच्या दुकानातुन वाटल्या जातायत. यावरून पुढे येणाऱ्या संकटाचा अंदाज येतो. कदाचित या राक्षसी इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. 

     डॉ. यशवंत मनोहर आपल्या डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? पृ. क्र. 22 मध्ये लिहितात, ‘संपत्तीमुळे माणूस स्वावलंबी होतो आणि शूद्राला तर स्वावलंबी, स्वयंपूर्ण होऊच द्यायचे नाही ही मनुसमृतीची भूमिका आहे. शूद्रांची योग्यता वाढणे, जीवनाच्या आर्थिक, शैक्षणिक, वाङमयीन अशा वर्ग क्षेत्रात तो स्वतंत्र आणि स्वयंभू होणे ब्राम्हणांसाठी धोक्याचे आहे. केवळ आपली सेवा करीत राहणारा आपला गुलाम गमावणे ब्रम्हणांना परवडण्यासारखे नाही. म्हणजे शूद्रांनी ज्ञान मिळवू नये, शूद्रांनी आर्थिकदृश्टया स्वयंपूर्ण होऊ नये हा मनुस्मृतीचा आदेश मानवाधिकारांच्या विरोधी आहे. शूद्रांना मूलभूत मानवी अधिकार देण्याला वा शूद्रांना माणूस म्हणून जगू देण्यालाच मनुस्मृतीचा नकार आहे. म्हणूनच ‘इति मानवे धर्मशास्त्र भृगुप्रोक्तायां…’ अशा शब्दांनी मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाची समाप्ती होत असली तरी मनुस्मृतीला मानवधर्मशास्त्र म्हणता येणे अजिबात शक्य नाही. ते ब्राम्हणधर्मशास्त्र आहे हेच मनुस्मृती इथून तिथून सर्वत्र सांगत आहे. 

  प्रसिद्ध लेखक डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली?’ या पुस्तकामध्ये मनुस्मृती जाळण्याबाबतचे त्यांनी तपशिलवार विश्लेषण केले आहे.  



मनुस्मृतीचे विषमतेचे स्वरूप : 

    या मनुस्मृतीत एकूण बारा अध्याय आहेत. 

1. जगाची उत्पत्ती, २) संस्कारविधि, व्रतचर्या व नमस्कारादि उपचार, 3) विवाह, महायज्ञ व श्राध्दकल्प, ४) वृत्तीचे लक्षण व स्नातक, ५) भक्ष्याभक्ष्यनिर्णय, आशौच व द्रव्यशुध्दिी, ६) वानप्रस्थ व यति यांचे धर्म, ७) राजांचे सर्व धर्म, ८) न्यायनिरूपण, ९) स्त्री-पुरूष धर्म, दायविभाग, द्युत, चोर व वैश्य-शूद्र धर्म, १०) संकर जाती व आपध्दर्म, ११) प्राश्चित विधी आणि १२) अध्यायाचे नाव आहे शुभाशुभ कर्मफल! या बारा अध्यायांमधील श्लोकांची संख्या 2684 एवढी आहे. 


“सर्वस्यास्य तु सर्गस्य गुप्त्यर्थं स महाद्युति: 
मुखबाहूरूपज्जानां पृथक्कर्माण्यकल्पयत्‌” (1:87) 
अध्यापनमध्ययनं यजनं याजनं तथा 
दानं प्रतिग्रहं चैव ब्राह्मणानामकल्पयत्‌ (1:88) 
प्रजानां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च 
विषयेष्वप्रसक्तिश्च क्षत्रियस्य समासत: (1:89) 
पशूनां रक्षणं दानमिज्याध्ययनमेव च 
वणिक्पथं कुसीदं च वैश्यस्य कृषिमेव च (1:90) 
एकमेव तु शूद्रस्य प्रभु: कर्म समादिशत्‌ 
एतेषामेव वर्णानां शुश्रूषामनसूयया (1:91) 

शिकणे, शिकविणे, यजन, याजन, दान घेणे वा देणे ही ब्राम्हणांची कामे होत. प्रजारक्षण, दान देणे, यज्ञ, अध्यान व विषयासक्त नसणे ही क्षत्रियांची कामे. पुशपालन, दान, यज्ञ करणे, अध्यायन, व्यापार, सावकारी व शेती ही वैश्यांची कामे होत तर ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांची कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने नेमून दिलेले शुद्राचे काम होय. 

“उत्तमाग्ङगोभ्दवाज्जैष्ठयाद्‌ब्रम्हणश्चैव धारणात्‌ 
सर्वस्यैवास्य सर्गस्य धर्मतो ब्राम्हण: प्रभु: (1:93) 

ब्राम्हण हा या सृष्टीचा मुख्य आहे कारण तो सर्वांच्या आधी जन्मला. उत्तम अशा मुख अवयवापासून जन्मला व तो अध्ययन, अध्यापन करतो. चार वर्णांमध्ये मनुस्मृतीने ब्राम्हणांना सर्वश्रेष्ठ दर्जा दिलेला आहे. 

“ब्राम्हणो जायमाने हि पृथिव्यामधिजायते 
ईश्वर: सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये” (1:99) 
सर्व स्वं ब्राम्हणस्येदं यत्किंचिज्जगतीगतम्‌ 
श्रेष्ठयेनाभिजनेनदं सर्वं वै ब्राम्हणो$र्हति” (1:100) 

सर्व प्राणीमात्रांचा धर्मेश्वर ब्राम्हण असल्यासने तो जगात सर्वांमध्ये श्रेष्ठ जन्म घेत असतो. श्रेष्ठता व कुलीनता हे गुण ब्राम्हणात असल्याकारणाने पृथ्वीवर असणारे सर्व द्रव्य ब्राम्हणालाच योग्य व त्याचेच आहे.

पुढील श्लोक तर हास्यास्पदच वाटतो. ब्राह्मणाला श्रेष्ठत्व द्यायच्या भ्रमात वयोमानचाही मुद्दा लक्ष्यात घेण्यासारखा आहे. 

ब्राम्हणं दशवर्ष तु शतवर्ष तु भूमिपम्‌ 
पितापुत्रौ विजानीयाद्‌ब्राम्हणस्तु तयो: पिता” (2:135) 

दहा वर्षे वयाचा ब्राम्हण मुलगा शंभर वर्षे वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे होय. ही मनुस्मृतीची ब्राम्हणाला श्रेष्ठत्व देणारी भूमिका कोणी कशी मान्य करावी ?

ब्राम्हणांना समाजातले सर्वश्रेष्ठ स्थान आणि सर्वोच्च दर्जा कायम राखावा याची मनुस्मृती पानापानावर तरतूद करून ठेवते.

ब्राम्हण: संभवेनैव देवानामपि दैवतम्‌ 
प्रमाणं चैव लोकस्य ब्रम्हात्रैव हि कारणम्‌ (11:84) 

केवळ ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याने त्याच्यामध्ये ब्रम्ह राहते. म्हणून त्यास देव मानावा. 

“दक्षिणेन मृतं शुद्रं पुरध्‌वारेण निर्हरेत 
पश्चिमोत्तरपूर्वैस्तु यथायोगं द्विजन्मन: (5:92) 

शूद्राचे प्रेत दक्षिण दिशेने, वैश्याचे प्रेत पश्चिमेच्या दिशेने, क्षत्रियाचे प्रेत उत्तर दिशेने आणि ब्राम्हणाचे प्रेत मात्र जिकडून सूर्य उगावतो त्या पूर्वेकडील दिशेने न्यावे. 

खालच्या तीन्ही वर्णातील माणसांची प्रेते वेगवेगळया तीन दिशांनी नेण्यासंबंधीचा निर्देश करून ब्राम्हणाचे प्रेत पवित्र समजल्या जाणाऱ्या पूर्वदिशेनेच न्यावे हा अतिशय हास्यास्पद श्लोक वाटतो. या दिशांच्या शुभ-अशुभाबाबत डॉ. नरेंद्र दाभोळकरही मिश्किलपणे म्हणतात-‘पुर्व दिशा म्हणजे इंग्रजीमधील ईस्ट(east). ईस्ट म्हणजे ईष्ट (शुभ) आणि पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट आणि वेस्ट (waste) म्हणजे टाकावू.’ 

“सत्यानृतं तु वाणिज्यं तेन चैवापि जीव्यते 
सेवा श्ववृत्तिराख्यता तस्मातां परिवर्जयेत्‌” (4:6) 

सेवा करणे वा नोकरी करणे हे कुत्र्याचे जीणं म्हटलं जातं. त्यामुळे ब्राम्हणाने कधीही सेवा करू नये आणि खालच्या प्रतीचे धंदेही त्याने करू नयेत कारण त्यामुळे तो शुद्र होतो. त्यापेक्षा एकवेळ व्यापार करून ब्राम्हणाने  उपजीविका करावी. ब्राम्हणाला कर्ज दिल्यास दर महिन्याला शेकडयामागे २ रूपये व्याज घ्यावे. हाच दर क्षत्रियासाठी ३ रूपये आहे. वैश्यासाठी ४ रूपये आहे तर शूद्रासाठी ५ रूपये आहे अशी तफावत मनुस्मृतीने केलेली आहे.

“सद्य: पततिमांसेन लाक्षया लवणेनच 
त्रयहेण शूद्रो भवति ब्राम्हण: क्षीरविक्रयात” (10:92) 

मांस, लाख व मीठ विकल्यामुळे ब्राम्हण तात्काळ पतित होतो आणि दूध विकल्यामुळे तीन दिवसात तो शूद्र होतो.  ब्राम्हणाला सर्वच संदर्भात अशा विशेष सवलती दिलेल्या आहेत. मनुस्मृतीची ब्राम्हणांवर विशेष मर्जी असल्यामुळे त्यांच्या रक्षणासाठी मनुस्मृतीने सर्व प्रकारच्या सोयी करून ठेवीत आहे हे खालील श्लोकात मनुस्मृती सांगते. 
“द्विकं त्रिकं चतुष्कं चं पत्र्चकं च शतं समम्‌ 
मासस्य वृध्दिं गृण्हीयाद्वर्णानामनुपूर्वश:” (8:142)

जगातली सर्व संपत्ती ब्राम्हणाची आहे कारण तो श्रेष्ठ आणि उच्चकुलीत आहे हे पुढील श्लोकात मनू सांगतो. 

“सर्व स्वं ब्राम्हणस्येदं यत्किंचिज्जगतीगतम्‌ 
श्रैष्ठयेनाभिजनेनेदं सर्व वै ब्राम्हणा$र्हति” (1:100) 

हे ब्राम्हणाला दिलेले विशेषाधिकार आपणाला मनुस्मृतीत ठिकठिकाणी दिसतात असाच एक अधिकार म्हणजे भुकेने ब्राम्हणाला मरू न देणे. कारण त्यामुळे सारे राष्ट्रच नष्ट होते. 

“यस्य राज्ञस्तु विषये श्रोतिय: सीदति क्षुधा 
तस्यापि तत्क्षुधा राष्ट्रमचिरेणैव सीदति” (7:134) 

असेच असेल तर राष्ट्र कोण नष्ट करेल? राजांनी ब्राम्हणांना भरपूर दान दक्षिणा द्याव्यात.


“विस्त्रब्धं ब्राम्हण: शूद्राद्‌द्रव्योपादानमाचरेत्‌ 
नहि तस्यास्ति किंचित्सवं भर्तुहार्यधनो हि स:” (8:417)

शुद्राचा सर्व पैसा अडका ब्राम्हणाने काढून घ्यावा. कारण शूद्राचे स्वत:चे असे काहीही नसते. हे मनुस्मृती या श्लोकातून सांगते. 
“कौटसाक्ष्यं तु कुर्वाणांस्त्रीन्वर्णान्धार्मिको नृप: 
प्रवासयेद्दण्डयित्वा ब्राम्हणं तु विवासयेत्‌ (8:123)

ब्राम्हणांच्या संदर्भात राजाने क्षमाशील वृत्ती ठेवावी. ‘ब्राम्हणेषु क्षमान्वित:’ (7:32) इतर वर्णांच्या तुलनेने ब्राम्हणांना अत्यंत नाममात्र शिक्षा दिली जावी. 
“ब्राम्हणवधाद्‌भूयानधर्मो विद्यते भुवि 
तस्मादस्य वधं राजा मनसापि न चिन्तयेत्‌” (8:381)

इतरांनी खोटी साक्ष दिली तर दंडही घ्यावा आणि त्यांना हद्दपारही करावे. ब्राम्हणाला मात्र दंडही न घेता केवळ घराबाहेर घालवावे. ब्राम्हणहत्येसारखे दुसरे कोणतेही पाप नाही म्हणून ब्राम्हणहत्येचा विचारही राजाने मनात आणू नये आहे मनुस्मृती सांगते.  

ब्राम्हणांना विशेषाधिकार देणारे पुढील श्लोक बघा- 

“परमप्यापदं प्राप्तो ब्राम्हणान्न प्रकोपयेत्‌ 
हे ह्येनं कुपिता हन्यु: सद्य: सबलवाहनम्‌” (9:313) 

आपत्तीत सापडलेल्या राजानेही ब्राम्हणाचा अवमान करू नये तसेच झाले तर ते रागावतील आणि सैन्य, वाहने यांच्या साह्याने राजाचा नाश करतील. 

“यै: कृत: सर्वभक्ष्यो $ ग्निरपेयश्य महादधि: 
क्षयी चाप्यायित: सोम: को न नश्येत्प्रकोप्य तान्‌” (9:314) 

ज्यांनी अग्नीला सर्वभक्षक केले, समुद्राला पिऊन टाकले, चंद्राला क्षयी आणि पुन्हा पूर्ण केले ते ब्राम्हण कुणाला नष्ट करू शकणार नाहीत? असा या श्लोकातून धमकीच देऊन ठेवलीय. 

अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राम्हणो दैवतं महत्‌ 
प्रणीतश्चाप्रणीतश्चयथाग्निदैवतं महत्‌” (9:317) 

अग्नी कुठेही ठेवला असला तरी तो देवताच असतो त्याप्रमाणे ब्राम्हण ज्ञानी असला काय वा नसला काय तो दैवतच आहे. 
“एवं यद्यप्यनिष्ठेषु वर्तन्ते सर्वकर्मसु 
सर्वथा ब्राम्हणा: पूज्या: परमं दैवतं हि तत्‌” (9:319) 

ब्राम्हणांनी कितीही निंद्य कामे केली तरी ते मोठे दैवतच असल्याने पूज्यच असतात, शिवाय राजसभेत प्रवेश करण्याआधी राजाने ब्राम्हणाची पूजा करावी. ब्राम्हणांना देणग्या द्यावा (7:145, 7:201) असेही मनुस्मृती आवर्जून सांगते. ज्या ज्या क्षत्रिय लोकांनी वेदोक्त आचारधर्म, यज्ञ आणि ब्राम्हणांची पूजा केली नाही ते कसे शूद्र कोटीला गेले हे सांगताना मनुस्मृतीने पौंड्रक, औंड्र, द्रविड, कम्बोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद आणि खश या क्षत्रियांचा निर्देश केला आहे. (10:43, 44) 

मनु स्वत:ला सर्वज्ञ मानतो :- 
“य: कश्चित्कस्यचिध्दर्मो मनुना परिकीर्तित:. 
सर्वो$भिहितो वेदे सर्वज्ञानमयो हि स:” (2:7) 

त्याने सांगितलेला धर्म सर्व वेदात आहे हे या श्लोकात आहे. 

विषमतेवर आधारलेली चार वर्णांची समाजरचना ही परमेश्वरानेच स्वत: निर्माण केलेली असल्यामुळे ती चिरंतन आहे, तिच्यात बदल करणे हा अधर्म ठरतो. वेदाच्या आणि स्मृतींच्या विरूध्द कोणी बोलू नये, वेद आणि स्मृती अमान्य करणाऱ्या, त्यांची निंदा करणाऱ्या नासितकाला धर्मबहिष्कृत करावे, चातुर्वर्ण्याची अभेद्य चौकट पवित्र मानावी ती कायम करावी असा अप्रत्यक्ष दबाव मनुस्मृतीने टाकलेला आहे. म्हणून शतकानुशतके लोकांनी या भितीमुळे या विषमतेला पवित्र मानून आपल्याव धर्मातून हद्दपार होण्याची वेळ येऊ नये म्हणून आजवर मनुस्मृतीचे आदेश पाळण्यात आले. 

“श्रीतिस्तु वेदो विज्ञेयो धर्मशास्त्रं तु वै स्मृति: 
ते सर्वार्थेष्वमीमांस्ये ताभ्यां धर्मो हि निर्बंभौ” (2:10) 
“योऽवमन्येत ते मूले हेतुशास्त्राश्रयाद्द्विज: 
स साधुर्‍भिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिन्क:” (2:11) 

वेद आणि धर्मशास्त्र म्हणजे श्रुति आणि स्मृति यांच्यापासून धर्माचा उदय झाला असल्याने श्रुति वा स्मृति यांच्याविरूध्द मत मांडू नये आणि या दोन शास्त्रांचे मूल्य जो मानणार नाही त्या वेदनिंदक नास्तिकाला धर्मबहिष्कृत करावे असा त्याचा अर्थ आहे. 

    मनुस्मृतीमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय आणि वैश्य यांचा दोनदा जन्म होतो. हे तिन्ही वर्ण द्विज आहेत. यांचा एक जन्म आईच्या पोटी होतो आणि दुसरा जन्म मुंज होते तेव्हा होतो.पण शूद्राचा जन्म मात्र एकदाच होतो कारण त्याची मुंज होत नाही. 

      ब्राम्हणाचे नाव मांगल्यपूर्ण असावे. क्षत्रियाचे बलवाचक असावे, वैश्याचे धनयुक्त व शूद्राचे नाव निंद्य-किळसवाणी असावे. ब्राम्हणाचे जानवे कापसाचे, क्षत्रियाचे तागाचे व वैश्याचे बकऱ्याच्या लोकरीचे आणि तिहेरी असावे व त्याला उजवीकडून पीळ असावा. ब्राम्हणाने भिक्षा मागताना ‘भवती भिक्षा दही’ म्हणावे. क्षत्रियाने ‘भिक्षां भवती देहो’ म्हणावे आणि वैश्याने ‘भिक्षां देही भवती’ म्हणावे हे मनुस्मृती सांगते. एवढेच नाही तर वरील तिन्ही लोकांच्या विवाहाचे वेगवेगळे प्रकारही मनुस्मृतीने विशद केले आहेत. वैश्य किंवा शूद्र ब्राम्हणाचया घरी अतिथी म्हणून आले तर त्यांना घरचया नोकरांसोबत जेवू घालावे. ब्राम्हणाच्या घरी क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मित्र, आप्त किंवा गुरू हे अतिथिसमान मानले जाऊ नयेत. 

     एकंदरीत मनुस्मृतीच्या दृष्टीने ब्राम्हण वजा जाता इतर सर्वांनाच अत्यंत नीच, नगण्य आणि तुच्छ म्हणून गणले गेले आहे. इतर सर्वांनीच ब्राम्हणाचा नेहमी सन्मान केला पाहिजे. त्याचे श्रेष्ठत्व जपले पाहिजे असे सांगणारी मनुस्मृती इतर वर्णांबद्दल मात्र अवमानकारक व सामाजिकदृष्ट्या या सर्वांनाच ती अप्रतिष्ठित करते. 


        महाराष्ट्रामध्ये दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने मनुस्मृती या ग्रंथावर बंदी घातली होती. त्यानुसार या ग्रंथाचे प्रकाशन व विक्री करण्यास मज्जाव करण्यात आला होता. पण गेल्या दोन वर्षांपूर्वीपासूनबुकस्टॊलवर गुप्तपणे मनुस्मृतीच्या मराठी आवृत्यांची विक्री सुरु करण्यात आली. पुन्हा एकदा 'मनुस्मृती'ने डोकं वर काढलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला आणि सर्व बुक स्टॉलवाल्याना सज्जड बंदीचा इशाराच दिला. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/manusmriti-reprinted-in-marathi-now/articleshow/51322786.cms

         तसेच दैनिक लोकमतनेही याबाबत बातमी दिलेली आहे. http://www.lokmat.com/maharashtra/manusmriti-again-publishing-new-form-despite-being-banned/ 

     दैनिक लोकसत्तामध्ये दि. २६/११/२०१५ च्या अंकात झियाऊद्दीन सय्यद यांनी लिहिलेल्या मनुस्मृतीपासून संविधानाकडे! https://www.loksatta.com/vishesh-news/manusmriti-granth-toward-to-the-constitution-1163694/ हा लेखही विचार करायला भाग पडतो.




      मनुस्मृतीने आज अस्तित्वात असलेल्या शूद्रांच्या म्हणजे ओबीसींच्या ३४६ जाती, अनुसूचित जातीच्या ५९, अनुसूचित जमातीच्या ४७, अनुसूचित जातीच्या ५९, भटक्या जमाती अ ब क ड यांच्या ५१, आणि त्यांच्या स्त्रियांच्या अनेक पिढया हजारो वर्षे जाळल्या. कोटयवधीं मानवांच्या माणुसकीची होळी करणाऱ्या विषमतेची विषारी मनुस्मृतीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी होळी करून समस्त बहुजनांवर अमाप उपकारच करून ठेवलेत. माझ्यामते त्यातून आपण कधीच ऋणमुक्त होऊ शकत नाही आणि बाबासाहेबांच्या ऋणातच रहावसं वाटत असेल तर प्रत्येकानेच मनुस्मृतीला मनातून कायमची जाळून टाकायला पाहिजे. 

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...