
‘दबा’ हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. पंचक्रोशीतही ते याच नावाने परिचित आहेत. तशी या नावाची खरी गंमत म्हणजे हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले. साधारण दीड दशकापूर्वी रत्नागिरीच्या खंडाळा येथील महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून रूजू झाले. महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्यांनी दबांच्या आणि त्यांच्या पिताश्रींच्या नावाची आद्याक्षरे घेऊन ‘दबा’ हे एक आगळंवेगळं नाव निर्मिले. त्यांनी सर्वांशी एक स्नेहभावाचं नातं निर्माण केलंय. प्रत्येकाबद्दलची आपुलकी, जिव्हाळा दबांनी साऱ्या शिक्षक, कर्मचारी आणि विद्यांर्थ्यांमध्येही अल्पावधीत निर्माण केलाय. बरं सिंधुदुर्गात त्यांना या नावाने कोणीही ओळखणार नाही. तिथे फक्त 'दशरथ' आणि रत्नागिरीसाठी 'दबा'. तर हे दबा तसे बहुआयामी. ड्युटी संपवून घरी आले तरी ते स्वस्थ बसत नसत. आजही सेवानिवृत्त होऊनही ते त्यांच्या विश्वातच रममाण असतात. कारण त्यांच्यातला सृजनशील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
त्यांच्या घरी तुम्ही कधी गेलात तर दरवाजाला, समोरील खिडक्यांना लटकलेले सरपटणारे प्राणी, डायनॉसोरसारखे हिंस्त्र पशु पाहून क्षणभर काळजाचा ठोका चुकतोच… तुम्ही पण दचकलातच ना… हे सरपटणारे प्राणी, हिंस्त्र श्वापदं, मगर, सरडा, घोरपड, हरिण, काळवीट, हंस, धावणारा हत्ती, वेगवेगळे पक्षी, बगळे, आदीमानव, मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीसारख्या भासणाऱ्या स्त्रीया हे सर्व पाहून कोणाला नाही दचकायला होणार..? हां, पण त्यातंच श्रीगणेशाची प्रतिकृती पाहून कोणा नवख्याला स्वत:ला थोडं सावरायला वाव मिळतो… त्यांनी त्यांच्या सृजनशील आणि कलात्मक गुणांतून नजरेला मोहून टाकणारी अशी विविध विलक्षण काष्ठशिल्पे साकारलीयेत. ही सर्व काष्टशिल्पे सुकलेल्या झाडांच्या मुळांपासून दबांनी तयार केलीयेत. ती पाहता-पाहता नकळत 'हा छंद जीवाला लावी पिसे' या गीताच्या ओळी मनात उमटून जातात.
दबा डयुटीवरून आले की एकटेच जंगलात जातात. जंगलात फिरताना त्यांच्या त्या कलात्मक नजरेतून विलक्षण आकारची कोणतीच वस्तू सूटत नाही. जे जे त्यांच्या हाताला लागेल ते सर्व पाठीवर मारून घरी घेऊन येतात. निसर्गत:च त्या झाडाच्या मुळांच्या असलेल्या आकाराचा वेध घेऊन त्यावरची माती, कचरा साफ करून त्याला मुळचा आकार न बिघडवता पॉलिश करून त्यावर पुढील प्रक्रीया करतात आणि मग पाहता पाहता अशी हुबेहुब वाटणारी शिल्पे ते लिलया साकारतात. या कामात ते इतके तल्लीन होऊन जातात की वेळेचं भानही नसतं.
दबा डयुटीवरून आले की एकटेच जंगलात जातात. जंगलात फिरताना त्यांच्या त्या कलात्मक नजरेतून विलक्षण आकारची कोणतीच वस्तू सूटत नाही. जे जे त्यांच्या हाताला लागेल ते सर्व पाठीवर मारून घरी घेऊन येतात. निसर्गत:च त्या झाडाच्या मुळांच्या असलेल्या आकाराचा वेध घेऊन त्यावरची माती, कचरा साफ करून त्याला मुळचा आकार न बिघडवता पॉलिश करून त्यावर पुढील प्रक्रीया करतात आणि मग पाहता पाहता अशी हुबेहुब वाटणारी शिल्पे ते लिलया साकारतात. या कामात ते इतके तल्लीन होऊन जातात की वेळेचं भानही नसतं.
खरंच जीवाला वेडंपिसं करणाऱ्या छंदापेक्षा सुखदायक दुसरी कोणतीच चीज नसावी या जगात बहुतेक… अगदी प्रियसीच्या प्रेमापेक्षाही… ही शिल्पं पाहतानाच आणखी एक विचार मनात येऊन जातो की, प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता तरी छंद असायला हवाच. हा छंदच, ती कलाच त्या व्यक्तीला जगवायला भाग पाडते. परवा एका मोटिव्हेशनल सेमिनारला सहजच हजेरी लावली. त्या सेमिनारच्या इंटरप्रिन्युअरने एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. तो म्हणतो, 'आपल्याकडे इमोशन्स असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा ध्यास लागत नाही.' हा ध्यासच आपलं ध्येय गाठायला भाग पडतो. आणि मग जीवनात सृजनशीलतेने एखादी चीज निर्माण झाली की त्या कलाकाराला आयुष्य अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. ही एक प्रेरकशक्ती आहे. याच जीवनशैलीतून असा प्रतिभावंत निर्माण होतो. त्यामुळेच की काय प्रतिभावंत हे सृजनशील असतात. सृजनशीलता म्हणजे वैविध्यतेने, तर्कसंगतीने चौकटीबाहेरच्या विचारातून नवनिर्मिती करणे आणि अश्या चौकटीच्या बाहेर डोकावणाऱ्याच्या हातून बेशक नक्कीच काहीतरी विलक्षण होऊन जातं हे दाबांकडे पाहून मनोमन पटतं.
बरं, ही सर्व काष्टशिल्पं पाहून झाल्यावर घरात गेलात तर आणखी एका वेगळयाच कलाविष्काराचं दर्शन होतं. पिंपळाची पानं जीर्ण झाल्यावर जशी जाळीदार होतात तशी ती दबा त्यांच्या कृत्रिम कलेतून जाळीदार करून त्यावर नाजूकपणे देशाच्या महापुरूषांची, देवतांची हुबेहुब चित्रे पेंटींग केलेली पहायला मिळतात. यामध्ये गौतम बुध्द, डॉ. आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, शाहु महाराज, विनोबा भावे, आगरकर, पंडित नेहरू, राणी लक्ष्मीबाई, संत कबीर, स्वामी स्वरूपानंद, बाळासाहेब ठाकरे, टॉम ॲन्ड जेरी, निसर्गचित्रे, गणपती, स्वामी समर्थ, अनिरूध्द बापू, साईबाबा, पार्वती शंकर, शिवशंकर, श्रीकृष्ण, देवालय, ताजमहाल, विविध पक्षी, अशोकचक्र, विविध देवता, क्रीडापट्टू सचिन, सौरव गांगुली, अझरूद्दिन, सानिया मिर्झा, गोंडस बाळं, सुबक हस्ताक्षरातील बौध्दप्रतिज्ञा आदी शेकडो जाळीदार पिंपळपानांवरील ही सर्व चित्रे पाहून मन भारावून गेल्याशिवाय राहत नाही. त्यात भारतीय चलनाची पाच रूपयाची-विस रूपयाची नोट तर लक्ष वेधून घेते. या कलाविष्काराचा परमोच्च बिंदू असलेल्या जगविख्यात चित्रकार लिओनार्दो-द-विन्सीने साकारलेली मोनालिसाची प्रतिमा. तीच्या चेहऱ्यावरील ते सौंदर्य, गुढता अगदी सहजगत्या दबांनीही त्यांच्या कुंचल्यातून रेखाटलेली पाहून थक्कच व्हायला होतं. माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं याच पिंपळाच्या जाळीदार पानावर रेखाटलेलं चित्र त्यांनी डॉ. कलामांना सप्रेम भेट म्हणून पूर्वी पोष्टाने पाठवले देखील आहे. कल्पना करा, साध्या ड्रॉईंग पेपरवर एखादं चित्र काढायचं म्हटलं की आपली किती त्रेधातिरीपट होते. दबांनी तर पिंपळाच्या तेही जाळीदार पानांवर रंगांची उधळण केलेली पाहून त्यांच्याबद्दलचा, त्यांच्या कलेबद्दलचा आदर आपसुकच वाढतो.
त्यानंतर समोरच्या कपाटातील सर्वांत वरच्या कप्प्यातील पुस्तकांची जागा लक्ष वेधून घेते. त्याबद्दल त्यांना विचारले असता पुस्तकं वाचनाचीही आवड असल्याचं दिसून आलं. ही पुस्तकं बघता बघता ४/५ नाटकांची पुस्तकेही दिसतात. फोटोंच्या अल्बमधून आणखी एक माहिती समोर येते ती म्हणजे त्यांच्यातल्या अभिनय कलेची. त्यांनी अनेकदा नाटकांतूनही विविध रूपरेखा साकारून अभिनयाची कला सादर केलीय. त्यानंतर हॉलमधील शोकेसमध्ये दोन तीन काचेच्या सीलबंद बाटल्या आपलं लक्ष वेधून घेतात. या बाटल्यांमध्ये हलक्याशा रंगछटा असलेल्या पाण्यात सोनचाफ्याची फुलं गेली दोन तीन वर्षांपासून जशीच्यातशी आजही अगदी ताजी टवटवीत आहेत.
त्यानंतर चहापान वगैरे आटपून तुम्ही निघताना घरासमोरील मोकळया जागेतून ते अगदी त्यांच्या गेटपर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या विविध रंग ल्यालेल्या वनस्पती निदर्शनास येतात. ज्या कधी पाहिलेल्या नसतील अशा दुर्मिळ वनस्पती, कमळाचे कृत्रिम छोटेखानी तलाव, त्या तलावात उमललेली एक दोन कमळे, झाडांच्या वेली, पिंपळाचे सुमारे १५-१६ वर्षांपूवीचे झाड पण अगदीच दीडदोन फुटाचेच... हो... खरंच... त्यात त्यांनी झाडाच्या बुंद्याशी कलात्मकतेने कोरवून ठेवलेली बुध्दाची मुर्ती. ही मूर्ती देखील त्यांनी स्वतः शिश्यापासून केलीय... हे सर्व पाहून आणखी एका नव्या प्रयोगशील कलेची जाणीव होते.
प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवेत असल्यापासून त्यांनी दरवर्षीच्या प्रत्येक शैक्षणिक विज्ञान प्रदर्शनात आपल्या कल्पकतेची छाप निर्माण केलीय. अनेक सन्मानचिन्हे, पारितोषिके याची साक्ष देतात. जिल्ह्यातील अनेक विज्ञान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांना आजही व्यक्तीश: ओळखतात तेही ‘दबा’ या नावानेच. तसेच जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी संघटनेचे पहिले-वहिले अध्यक्षपद अनेक वर्षे भूषवून अनेकांना न्याय मिळवून दिल्याचे बोलता बोलता लक्षात येते. त्यासाठी त्यांना बहुतांश वेळा महाराष्ट्र भ्रमण करावं लागलंय.
आता सेवानिवृत्त होऊनही ते कधी तुम्हाला स्वस्थ बसलेले दिसणार नाहीत. सतत काही ना काही तरी घडविण्याचं काम चालूच असतं. सुरूवातीसुरूवातीला ते काय चाललंय हे समजत नाही. पण हळूहळू ती गोष्ट जशी आकार घेऊ लागते तसतसे आपल्या मनातील तर्कविर्कांना उधाण सुटून ते घडवित असलेल्या त्या कलाकुसरीकडे पहावतंच रहावसं वाटतं.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या काष्टशिल्पांची अनेक प्रदर्शने झाली आहेत. अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या सुंदर-सुंदर कविता, जगातील थोर पुरूषांचे सुविचार, त्यांचा जीवनपट, आदर्श जीवनाचा मुलमंत्र, आरोग्यविषयक माहिती, सामान्य ज्ञान, हास्यविनोद, कोडीइत्यादी प्रबोधनपर माहितीचे संकलन व बायडिंग करून ‘तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या सद्गुरू वामनराव पै यांच्या मोटिव्हेशनल वाक्याच्या नावानं एक पुस्तिका त्यांनी निर्मिलेली आहे. तसेच त्यांच्या तारुण्यातील उत्साहित, रोमांचकारी जीवनप्रवासाचे वर्णनही त्यांच्याच स्वहस्ताक्षरातून पुस्तकरूपाने निर्माण झालेले पहायला मिळते.
आजवरचा जीवनप्रवास कथन करताना ते सिंधुदुर्गातील तळवडे गावचे जयराम पेडणेकर (दाजी), ज्यांनी त्यांना बालपणापासून खंबीरपणे पाठीशी उभं राहून जगण्याचं धैर्य दिलं त्यांची आवर्जुन आठवण दबांना आल्याशिवाय राहत नाही. विद्याविहार ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आजगांव, सावंतवाडी येथे त्यांनी २० वर्षे तर खंडाळा महाविद्यालयात १८ वर्षे सेवा करताना त्यांनी ५ वी ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिके दाखविणे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिकांची योग्य मांडणी करणे ही जरी त्यांची एक प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून शासकीय जबाबदारी असली तरी पदाच्या कक्षेच्या बाहेर जावून मदतीचा हात देवून लोकांच्या मनात आदराची जागा निर्माण केलीय. विद्यालयात अचानक कोणी वरिष्ठ अधिकारी आले तर ताबडतोब पुष्पगुच्छ तयार करण्याचे कसब फक्त दबांनाच अवगत असल्याचे अनेक शिक्षक प्रांजळपणे कबुल करतात. विद्यार्थ्यांसमोर अनेकदा अंधश्रध्दा निर्मुलनाचे वैज्ञानिकतेने प्रात्याक्षिके करून दाखविताना नारळातून लाल रंगाचे पाणी काढणे, हातरुमालाला अचानक आग लागणे यासारख्या लक्षवेधी हातचलाखी करून भोंदूबाबांच्या क्लुप्त्यांबाबत अनेक विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश केलंय. आजही त्यांना त्यांचा जुना विद्यार्थी समोर आला तरी त्यांना वाकून नमस्कार केल्यावाचून पुढे जात नाही. "आयुष्यात जमवलेली संपत्ती ती हीच आहे आणि या संपत्तीत मी खूप समाधानी आहे," असं म्हणताना दाबांच्या डोळ्यांच्या कडा चमकून जातात.
अश्या विविध कलागुणांनी समृद्ध असलेल्या या बहूआयामीचा निरोप घेऊन निघता निघता नकळत, कसं जमतं हे सगळं..? कधी करता हे सर्व...?? कसा वेळ मिळतो...??? दबांकडे येणारा प्रत्येकजण हे प्रश्न विचारतोच... आणि त्यावर ते नम्रपणे स्मित करून उत्तरं देणं हे त्यांचं नित्यनेमाचं होवून बसलंय...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा