जमाव हा नेहमीच महामार्गावरून चालतो; पण
कोणीतरी एखादाच अशी वाट शोधून काढतो आणि ती काढत असताना महामार्गावरून चालत असलेला
जमाव त्याला नावं ठेवून मोकळा होतो. मग कालांतराने काहीजण मनोमन पटल्याने ती वाट
धरतात तर काहीजण अहंकारापाई पटत असूनही काही केल्या आपला धोपटमार्ग सोडत नाहीत. जो
समाजासाठी काहीतरी वेगळं, हितावह करू पाहतो त्याला तोच समाज नावं ठेवतो ही परंपरा
पूर्वीपासून चालत आली आहे. हेच लोक त्याची दिवसागणिक उजळत चाललेली प्रतिमा कशी
मलिन करावी या कुहेतूने त्या वाटाडयावर निरर्थक आरोप करतात आणि याच बाबीमुळे
माझ्या मनातील भावनांनी उसळ घेऊन ती निर्जन क्षणी मुंबई येथील वडाळ्याच्या फाइव्ह गार्डनमध्ये साश्रुनयनांनी
उमटावी ते ही अगदी ओघवत्या सरींनी… ह्या मनकलहाने उमटलेल्या भावना म्हणजे त्या
क्षणी माझ्या मनातील माझ्या देवाप्रति-बापाप्रति वाहिलेली ही शब्दसुमनांजली…
बाप
माझा
बाप माझा…
माझा बाप…
निधड्या छातीचा, पोलादी देहाचा
वाणी वज्रघाताची
अन् भरदार उंचीचा…
बापाचा माझ्या स्वभावच न्यारा
एका भेटीत कोणालाही न कळणारा…
कधी कार्यकर्ता समाजाचा
तर कधी कारभारी घरचा
कर्तव्यतत्पर साठा संस्कारांचा…
जीवाला जीव देणारा मित्र
तर कधी रंगमंचावर सासऱ्याचं काम करणारं पात्र
स्वत:हून कोणाच्यातही न डोकावणारं
मिजासखोराला यथेच्छ धडा शिकवणारं
व्यक्तिमत्व माझ्या बापाचं…
गरीबाच्या न्यायासाठी तुफानी वादळ
आनंदाच्या क्षणी बरसणारं बादल
समाजाची देण मानून सेवा करणं त्याच्या नसानसात
घरी आलेल्याचा कधी न जाई रीता हात
दुसऱ्याच्या दु:खात स्वत:ला पतंगापरी झोकून देणारा
मुलांच्या आजारानं हळवा होणारा
बापाच्या माझ्या स्वभावच न्यारा
एका भेटीत कोणालाही न कळणारा…
मुलांच्या एखाद्या खोडीनं
क्रोधानं भडकलेला चेहरा…
प्रसंगी पाठीवर भरदार दंडाचा मारा…
मग उपाशी पोटी आम्ही झोपून जाताच
ह्रदयाशी कवटाळणारा…
आईच्या दु:खात मिसळणारा
तिला योग्यअयोग्याचं समीकरण समजावून देणारा
प्रसंगी मुलांचंही ऐकणारा
घरची सर्व त्याच्यावरच मदार
जसं बुडत्याला दोरखंडाचा आधार
आईलाही माहित्येय हे जग आहे नश्वर
पण तिच्यासाठी बाप माझा साक्षात आहे ईश्वर…
जयंती सणाला होऊन भिमसैनिक
घोषणांचा नाद सिंहगर्जनापरि
सारा गाव जागा करून
मग घोषणांमागून घोषणा… सरीवर सरी
असा बाप माझा विशाल मनाचा
सच्चा नेता समाजाचा, क्षणात होई म्हातारा वृध्दाचा
शूर सेनापती समाजाचा
तर कधी लहानात लहान बालकाचा
दु:खाला दूर लोटत…
प्रसंगी कठोर तर कधी चतूर
प्रसंगी मन त्याचं हळवं कोमल…
तो कसा तो कसा… कोकणातल्या फणसासारखा
मी जन्मापासून त्यांना पाहत आलोय
एखादं अवजड काम क्षणात फस्त करणारं
कमजोरांना आशेचा किरण दाखवून
त्यांच्या रक्तात सरसवणारं कार्य त्याचं…
अर्जुनाचं कौशल्य, भिमाचं बळ जणू माझ्या बापात
विवेकी बुध्दी त्याच्या दिमाखात
बाबा भिमापरि कार्य त्याच्या रक्तात
बुध्दाची करूणा त्याच्या काळजात…
भावंडात तिसरा असूनही थोरला वाटे साऱ्यांच्या मनात
एवढंच काय…
आजोबांचाही जीव होता माझ्या प्रिय बापात…
शोकसभांना परलोकी गेलेल्याचे गोडवे सर्वच गातात
पण जिवंतपणीच इतरांच्या शोकसभांमध्येही
त्याच्या निस्वार्थी कामाची पावती अनेकांकडून ऐकताना
माझे नकळत कंठ दाटतात…
मला हल्ली वाटत्येय भिती
काय ते सळसळणारं रक्त
असंच राहील का माझ्या बापात फिरत..?
कारण त्यांचं वय आता चाललंय वृध्दापकाळाकडे झुकत...
माझ्या बापाला काही न होवो
ही ईशकडे याचना
त्याला लाभूदे उदंड आयुष्य, भले माझेही अर्पण करतो
जीवेत शरद: शतम् ! जीवेत शरद: शतम् !!
मी इतकं सारं सांगितलं…
आता एकाच ओळीत सांगतो
माझा बाप…
बाप माझा…
नाही कधी ह्याच्यात ना त्याच्यात
मला नेहमी भासतो तो भिमबाच्या रूपात
गावकऱ्यांनी काय जाणो
ओळखला की नाही बापाला माझ्या
पण मी खूप जवळून पाहिलाय त्याला
नशीबवान समजतो मी स्वत:ला
धन्य तो बाप माझा..
माझा बाप…
- जितेंद्र पवार (2002)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा