गुरुवार, २४ मे, २०१८

कंडक्टरला जेलरचा फोन


फेरफटका

कंडक्टरला जेलरचा फोन                                                                                 



         दुपारी दोनची बस नुकतीच कोल्हापूर स्थानकातून सुटली. काही मिनिटातंच ती टाऊनहॉलला येऊन थांबताच एक सुशिक्षित महिला (मॉडर्न ड्रेसमधली?) आपल्या मुलासह आत शिरली…. गाडीमध्ये पाहते तर काय सर्व जागा फुल्ल… आणखी तीन चार जण उभेही… लागलीच आपल्या हायफाय पर्समधून हायफाय स्मार्टफोन काढून गाडीमध्ये खूप गर्दी असल्याचं ती कोणाला तरी सांगू लागली… काही मिनिटं बोलल्यावर तीने आपला मोबाईल कंडक्टरला दिला. तो फोन घेता घेता कंडक्टरच्या चेहऱ्यावरील रेषा क्षणार्धात अशा काही विसकटल्या की विचारू नका…आता कंडक्टर फोनवर बोलू लागला आणि इकडे त्या बाईच्या चेहऱ्यावर अलगद समाधान पसरू लागलं...  कंडक्टरने तिचा मोबाईल फोन  त्या महिलेकडे दिला… परत ती महिला त्या पलिकडील माणसाशी बोलू लागली. दरम्यानच्या काळात ही चाललेली फोनाफोनी… त्यात कंडक्टरचीही इन्व्हॉलमेंट यामुळे हे नाट्य रंगतदार झाले नाही तरंच नवंल… 

          माझ्या सिटच्या बाजूच्या सिटवर ऑलरेडी दोन हडकुळे कॉलेज युवक बसलेले होते त्यांच्यात हा तिसरा त्या महिलेचा मुलगा येऊन बसला... आम्हीही बसमध्ये मागे बसलेलो असल्यामुळे  प्रकरणाचा काहीच उलगडा होत नव्हता.... एव्हाना तर्कवितर्कांना उधाण आलं होतं...  माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. मी न राहून त्या नुकतीच दहावीची परीक्षा देऊन मोकळा झालेल्या त्या मुलास विचारलेच… ''ती फोनवर बोलतेय ती तुझी आई का?'' तर त्याने, ''हो'' म्हटले. मग मी त्याला दुसरा प्रश्न विचारला; ''तीने आता कोणाला फोन लावलाय?'' त्यावर तो मुलगा म्हणला, ''माझ्या भावाला, तो जेलर आहे.'' हे ऐकुन मीही (म्हणजे कंडक्टर पण जसा उडाला असेल तसा) उडालोच… मी त्याला, ''अच्छा'' म्हणून काही वेळ विचारात निघून गेला. एव्हाना त्या महिलेचे फोनवरील संभाषण संपले होते... गाडीतील जी सिट महिलांसाठी राखीव होती आणि ज्या सिटवर तिसरा तिचा मुलगा बसला होता त्या सिटवरील कोल्हापूर स्थानकापासून बसून आलेले ते दोन कॉलेजकुमार आपल्याच गप्पांमध्ये मग्न... त्या मॅडमचा फोन संपतो न संपतो तोच मास्तर (आपल्याच सिटवरून) त्या दोन कॉलेजकुमारांना (डोळयानं खुणावत), ''थोडसं ॲडजस्ट व्हा की, या मॅडमना बसू द्या,'' असं म्हणून त्या महिलेला कंडक्टरने बसावयास सांगितले.  दोन जणांच्या सिटवर ऑलरेडी तिच्या मुलासहित तिघेजण बसलेले… आणि त्यात कंडक्टरही सांगतोय की, ''त्या मॅडमला पण जागा द्या थोडं थोडं सरकून…'' सर्वांना हसू आवरेना… कंडक्टर परत त्या महिलेशी बोलू लागला , “अहो मॅडम, या लेडीज सिटचे नियम खूप किचकट असतात ओ… आणि एवढयाशा कामासाठी सायबांना फोन लावायची गरज नव्हती.'' हे ऐकल्यावर माझी उत्सुकता आणखिन वाढली आणि मी त्या महिलेच्या मुलाला परत विचारले, ''सिटसाठी तुझ्या आईने भावाला फोन लावून सांगितले का?'' त्यावर तो निरागसपणे ''होय'' म्हणाला आणि मला तेवढं बस्स झालं… माझ्यातला ‘तो’ जागा झाला. मग कंडक्टर त्या बाईला… आणि मी तिच्या मुलाला… हा नियम कोणत्या निकषांवर आधारित आले हे समजावून सांगू लागलो. माझं बोलणं त्या बाईपर्यंत पोहोचेल इतक्या आवाजात मी बोलत असल्याने ती माझ्याकडे एक एक कटाक्ष (अर्थात किंचितशा रागानेच) टाकून पाहू लागली. तिला जमेल तसं ती कंडक्टरचं आणि माझंही बोलणं ऐकू लागली. थोड्या वेळाने ती दोन पावलं पुढे सरकून कंडक्टरच्या दिशेन गेली. एव्हाना गाडी कोल्हापूर शहराच्या बाहेर पडून बांबवडेच्या दिशेने धावू लागली आणि माझ्या विचारांचं चक्रही…

          ती बाई आणि तिच्या मुलाकडे पाहून मिडलक्लास वाटत होते. मिडलक्लासवाले हे कॉमनमॅन पेक्षा शिक्षित आणि शिष्टाचारी (?) समजले जातात. तर मग ऑबिअस्ली आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सार्वजनिक व्यवस्था आणि त्यांचे नियम माहित असायलाच हवेत, बरं नसतील माहित तर जाणून तरी घ्यायला हवेत. न जाणताच एखादा शासकीय नियम तोही संबंधित कर्मचाऱ्याला दाखवला तर चारचौघात कसं हसू होतं याचं हे प्रत्यंतर.
          आपला एक मुलगा जेलर म्हणून सेवेत असल्याचा आईवडीलांना सार्थ अभिमान असतोच आणि तो असायलाच हवा. पण आपल्या मुलाबाबतचा हा अभिमान चारचौघात कसा आणि किती बाळगावा याचं भानही या वर्गाला असायला हवं. तसेच शायकीय पदाचा आपल्या वैयक्तिक कामांसाठी वापर करावा याचं न  राहून आश्चर्य वाटतं. याच मिडलक्लासवाल्यांनी आपल्या मुलांना जन्मापासून ते त्यांना नोकरीला लावण्यापर्यंत वाट्टेलतशी सधन मदत केल्याने त्यांच्या मुलांना (आणि पालकांनाही) सर्व गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे खऱ्या कष्टाचे महत्व त्यांना कळत नाही. सर्वसामान्यांचं जीवन आणि त्यांच्या व्यथा जाणून घेणं दूरच राहीलं. मी आणि माझा परिवार हेच महत्वाचे, स्पेशल, आणि श्रेष्ठ. या काहीशा आविर्भावात ही मंडळी आपल्या आजूबाजूला वावरत असल्यामुळ्ये या संकुचित विचार प्रवृत्ती सामाजिक विषमतेत भर टाकतात. असो. 
         'तुम्हाला मध हवी असेल तर त्या मधाच्या पोळयावर लाथ मारू नका,' या डेडली कार्नेगीच्या सुत्राने त्या मुलाचं ब्रेनवॉश करायच ठरवून मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, ''तुझ्यात मला भावी देशभक्त दिसतोय.'' त्यावर क्षणात त्याचे डोळे एकदम चमकले आणि तो माझ्याकडे थोडयाशा आश्चर्यानेच पाहून मी पुढे काय बोलणार याची वाट पाहू लागला. ''मित्रा, तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगाविशी वाटतेय,'' असं म्हटल्यावर त्याने विस्मयाने होकार दिला आणि म्हणाला, ''नाही राग येणार… त्यावर मी, ''हे बघ, आपलं म्हणणं योग्य असेल आणि वेळ अयोग्य असेल तरी त्या म्हणण्याला काही अर्थ नसतो. तसंच योग्य वेळी आपलं चुकीचं म्हणणंही खरं ठरतं.'' त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून मला राहवेना. मी म्हटलं, ''तू आणि तुझ्या वयाची मुलं म्हणजे आणखी पाच वर्षांनी देश सक्षमपणे  चालवणारी पिढी म्हणून सर्व जग तुमच्याकडे पाहणार.'' त्यावर त्याने मान डोलवली.. ''आपल्या कार्याचा किंवा आपल्या घरातील कोणत्याही वरिष्ठांचा आपल्या फायद्यासाठी इतरांचं (गरीबांचंच म्हणायचं हातं मला) नुकसान होईल असं वागता कामा नये. आता बघ, तुझ्या आईने गाडीमध्ये बसायला रिकामी सिट नाही मिळाली म्हणून तीने थेट आपल्या मुलाला जेलरला फोन लावून सांगितलं. त्यावर त्या जेलर मुलाने आईचं म्हणणं ऐकून बिचाऱ्या कंडक्टरला महिलांकरीता राखीव सिट देण्याची सूचना दिली. म्हणजे जेलर अधिकाऱ्याने एसटीच्या कर्मचाऱ्याला परिवहनाचा कायदा दाखवला. बरोबर? बरं, जेलर असूनही ह्या कायद्याचा पूर्ण व सखोल अभ्यास न करता डायरेक्ट कायद्यावरंच बोट ठेवल्याने कंडक्टरने ही सदरच्या कायद्याचे खरे निकष सांगितले आणि गोड बोलून ही वेळ मारून नेली. तुझा भाऊ जेलर असल्याचा जसा तुला अभिमान वाटतो तसाच त्यालाही आपल्या माणसांसाठी त्याच्या पदाचा असा वापर करण्याचा मोह झालाच. बरं तो कायदा दाखवून काही साध्य झालंच नाही. उलट त्याला एका कंडक्टरकडून नकारच मिळाला… म्हणून मी म्हणतो, की या अशा पदांचा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी उपयोग करू नका रे. अशाने त्याच्या पदाची किंमत होते…'' मी बोलत असलेलं त्याला किती कळालं माहित नाही; पण मान तरी डोलवत होता. ''योग्य वेळ बघून ही गोष्ट तुझ्या आईला पण सांग… तू सांगितलीस तर ती जास्त परिणामकारक ठरेल असं मला वाटतं.'' इतकं सारं बोलल्यावर त्यालाही ते पटलं. त्याचा चेहरा पाहून समजत होतं. समाधानाने तो माझ्याकडे पाहून म्हणाला, ''तुमचं म्हणणं पटलंय मला, मी नक्की प्रयत्न करीन.'' असं म्हणून त्याने मला शेकहॅन्ड केलं... दरम्यानच्या काळात बांबवडे स्टॉप आल्यावर गाडीतील लोकल प्रवासी उतरले. त्यामुळे ड्रायव्हरच्या मागील दोन क्रमांकाची सिट रिकामी झाली. चपळाईने ती जागा या मुलाच्या आईने पकडली आणि आपल्या मुलालाही तिथे बसावयास बोलावले. सर्वसामान्यांच्या एसटीमध्ये 'त्या' मिडलक्लासवाल्यांना बसायला जागा मिळाल्याने अखेर कंडक्टरचा जीव भांडयात पडला...


२ टिप्पण्या:

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान

मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान          हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनु...