मोहन पवार : रंगभूमीवरचं एक तुफान
हाच तो क्षण... हेच ते ठिकाण... हेच ते घर... हीच ती माणसं... आणि या माणसांमधल्या दोन व्यक्तींची अनुपस्थिती..! हाच तो दुःखाचा महापूर... आणि या दुःखद जड अंतःकरणाने एकवटून आलेला जनसमुदाय... एकाच्या दुःखातून सावरतो न सावरतो तोच दुसऱ्या आघाताने घायाळ आणि हतबल झालेला गोतावळा... आणि हेच ते चाफेरी बौद्धवाडीतील पवार घराणं... हेच ते दोस्तमंडळी... त्याच त्या दोन महामानवांच्या प्रतिमा... हेच ते उपासक आणि हाच तो पुण्यानुमोदनाचा शोक सभेचा कार्यक्रम... ज्या ठिकाणी आपण बसलोय तीच ती धरणी... आणि आपल्या डोक्यावरच तेच ते आकाश... बरोबर एक महिन्यापूर्वी जो क्षण आपण अनुभवला तोच पुण्यानुमोदनाचा क्षण आज आपण सर्वजण आणि हा माझा चाफेरी गाव पुन्हा अनुभवत आहे.
लौकिक अर्थाने समाजात, वारंवार उच्चारले जाणारे जे शब्द रूढ आहेत त्याचबरोबर पुस्तकांमधून, कादंबऱ्या आणि चरित्रांमधून वारंवार सापडणारे शब्द म्हणजे नशीब, नियती, प्रारब्ध, तकदीर आणि हेच नशीब, नियती, प्रारब्ध, तकदीर हे शब्द तर प्रायोगिक आणि सामाजिक नाटकांमधून तर पावलोपावली ऐकायला मिळतात. नियती, नशीब, प्रारब्ध या शब्दांचा समावेश असलेल्या नाटकातील डायलॉग्जवर आरुढ होऊन आणि आपल्या आवाजातील चढउतारांच्या रंजक अभिनयाने रसिकांची मने जिंकणा-या एका अवलिया कलाकाराच्या नशीबी असं विलक्षण नाट्य घडावं..? आता हेच बघा ना, एक महिन्यापूर्वी अचानक आपला एकुलता एक मुलगा निघून जातो काय... त्यानंतर त्याच्या संसाराची झालेली परवड... आणि या एका महिन्यात खुद्द जन्मदाताच आपल्या मुलाच्या मागोमाग आपला देह त्यागतो काय... अतिशय नाट्यमय पद्धतीने घडलेले हे असे दोन्ही प्रसंग प्रत्यक्षात रंगभूमीच्या कलाकाराच्याच नशिबी यावेत; यात केवढी मोठी शोकांतिका आहे! रंगभूमीवर कलात्मकतेने लिलया घोंगावणारं मोहन पवार नावाचं 'तुफान' आज शांत पहुडलंय...
दिवंगत मोहनदादाच्या कारकिर्दीचा आढावा घेताना नाट्यकलेचा उल्लेख केल्याविना पूर्णत्वास जाऊच शकत नाही. रंगभूमीलाच आपली कर्मभूमी मानणाऱ्या मोहनदादा यांनी पुऱ्या हयातीत नाटक कलेला अक्षरशः वाहून घेतले होते. गावोगावी होणारे नाटकांचे प्रयोग हे तुफान चालत असत. 'तुफान' या नावाचं नाटक आणि मोहनदादा हे एक समीकरणच होऊन गेलेलं.
मर्मबंधातल्या अभिनय काैशल्याच्या रंजक हिंदोळ्यावर झोके घेत घेत रसिकांची मने जिंकणारा हा अवलिया कलाकार म्हणून नावाजलेला आपला मोहनदादा मुंबईतल्या बहुतांश थिएटर्स आणि गावागावातले रंगमंच अगदी गाजवून सोडलेत. मात्र मोहनदादाच्या खऱ्या आयुष्यात याच नियतीने, याच नशिबाने आणि याच प्रारब्धाने कसा खेळ मांडला हे आपण सारे जण हाताशपणे पाहत आहोत. घडत असलेलं वास्तव कोणीही बदलू शकत नाही. मात्र आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये नशीब, नियती, प्रारब्ध अशा मायावी शब्दांना क्लीनचीट देऊन तथागतांनी कसोटीला उतरून आत्मविश्वासाने कर्मसिद्धांत जगासमोर आणला. आपल्या धम्मात नशीब, नियती, प्रारब्ध या शब्दांना थारा नाही; तर कर्म सिद्धांत खरा आहे. आता हा कर्म सिद्धांत म्हणजे काय यावर विस्तृतपणे भाष्य आपले बौद्ध उपासक, भंतेजी करू शकतात. मात्र मी सरळ साध्या शब्दात एका ओळीत याची व्याख्या करतो ती अशी की, मानवासहित अन्य कोणत्याही जीवसृष्टीस कुठलीही हानी न पोहोचवता आपले कार्य करणे म्हणजेच कर्मसिद्धांत होय.
मोहनदादाचा मुलगा दि. वैभवच्या शोकसभेत माझे वडिलांनी मोहन दादा आणि त्याचे ज्येष्ठ बंधू जयवंत दादा यांना या पंचक्रोशीचे "नटसम्राट'' ही उपाधी देऊन या दोन्ही बंधूंबद्दल गौरोजगार काढले. गौरवाचे हे बोल खरेच आहेत. आमच्या चाफेरी गावाला नाट्यकलेची खरी ओळख ही या दोन बंधूंमुळेच म्हणजे जयवंतदादा आणि मोहनदादा यांच्यामुळेच झाली. नाटकाची पुस्तकं फाडणे म्हणजे काय? भुमिका आणि पात्रे म्हणजे काय? दिग्दर्शन म्हणजे काय? नेपथ्य, संगीत, प्रवेश, प्लॉट सीन आणि निर्माता म्हणजे काय हे सारे पैलू आम्हाला जे कळाले ते केवळ आणि केवळ या दोन बंधूंमुळेच. मी छाती ठोकपणे सांगू शकेन की, चाफेरी वा या पंचक्रोशीतील जे जे युवक ज्यांनी रंगभूमीवर प्रत्यक्ष काम करून आपली कला पेश केली आणि भविष्यात देखील जो कोणी येथे कलावंत घडेल त्याचे सारे श्रेय हे जयवंत दादा आणि मोहनदादा यांना जाते यात तीळ मात्र शंका नाही. नाट्यकलेची संस्कार घडणाऱ्या आमच्या दोन बंधूंचे आम्ही कायमच ऋणी आहोत.
दादांनी आयुष्यभरात नाटकाचे अनेक प्रयोग केले. त्यापैकी तुफान नावाच्या एक प्रयोगाला वरवडे येथील नाट्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. जयवंत पवार आणि मोहन पवार दिग्दर्शित, चंद्रकांत पवार निर्मितीत ह्या सुरेख कलाक्रुतीचा मेळ जुळून आला. त्यावेळीचा जो माहोल होता तो आजही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. या प्रयोगाची रंगीत तालीम ही गावात झाली. त्यावेळी बाबुराव हिंदळेकर नावाचे जेष्ठ हार्मोनियम वादक यांनी एक गाणं वाजवलेलं माझ्या चांगलं स्मरणात राहिलं. नाटकाचा प्रयोग उत्तम झाला आणि दुसऱ्या दिवशी मुंबईतून आलेले कलाकार प्रयाण झाले. आम्ही सर्वजण मोहनदादा सहित जागरणीचे लोळत पडलो होतो. मी तसा वयाने लहान असलाे तरी या माेठ्या मंडळींच्या अवती-भाेवती घुटमळत असे. नाटकाला आणलेली हार्मोनियम तिथेच होती. मी ती पेटी उघडली आणि -
चंद्र धरेचा होता संगम,
फुलवित तीच प्रभात,
आजही कोजागिरीची रात
या गाण्याची धून, त्यातलं इंट्रो म्युझिक आणि त्या गीतातल्या हरकती पेटीवर वाजवून दाखवल्या. मी ही वाजवलेली धुन ऐकून मोहनदादा अचंबित झाले. त्यांनी मला ती पुन्हा पुन्हा वाजवायला लावली. आता ऐकतोच आहे तर मीही सोडतोय काय. परत त्याच नाटकातील दुसरं गीत वाजून दाखवलं ते गीत म्हणजे-
हास साजणा, गा रे साजणा,
बहर आला प्रीतीचा बहर आला प्रीतीचा...
दाेन्ही गीतं ऐकून झाल्यावर त्यांनी शाबासकीची थाप पाठीवर मारून माझं खूप कौतुक केलं आणि "असाच सराव करीत रहा," असा प्रेरणादायी आशीर्वाद देखील दिला मला. त्या वयात जणू एखादा पुरस्कारच मिळाल्यासारखं वाटलं. या पुरस्काराची आज मात्र त्यांच्या विरहाने प्रकर्षाने आठवण येते. पुढे मोहन दादांच्या दिग्दर्शनाखाली मी लहान असून सुद्धा त्यांच्यासोबत २२ खेडी वाटद खंडाळा येथे, राजापूर तालुक्यामध्ये आणि या पंचक्रोशीतील गावागावांमध्ये काही नाटके वाजवण्याचं भाग्य मला लाभलं.. अर्थात त्यांचा माझ्यावरील दृढ विश्वास आणि जबाबदारी पेलताना मला त्यांचा जो सहवास लाभला तो माझ्या हृदयात फुलापरी आजही मी तो साठवून ठेवलाय.
मोहनदादा हे आज जन्म नाटक जगले हे म्हटलं तरी अतिशय होणार नाही. त्यांनी स्वतःचे प्लॉटसीन्स, प्रकाशयोजना इत्यादी सारे साहित्य तयार करून गावागावातून जो कोणी येईल त्याला खर्चाचा नफा-तोटा यांचा हिशेब न करता सढळ हस्ते आणि खुल्या मनाने ते प्रयोगासाठी देत असत. जीव ओतून दिग्दर्शन करीत असत; पण कधीही माणुसकी, नाट्य संस्कृती आणि रंगभूमीशी फारकत घेतली नाही.
मोहनदात्यांच्या मोबाईल फोनची रिंगटोन ज्यांनी ज्यांनी ऐकली ती रिंगटोन म्हणजे,
नमन नटवरा विस्मयकारा,
आत्मविरोधी विपुल वखरा
या संगीत मानापमान नाटकातील बालगंधर्वांनी गायलेली ही अजरामर नांदी. हीच नांदी आमच्या एकात नाटकात गायचे शिवधनुष्य मी उचलले. मी स्वतः पेटी वाजवून ती गायली देखील आणि माझ्यासोबत आमच्या सर्व सहकलाकारांनी कोरसने साथ मला दिली. नांदी खास होणार याचा अंदाज आम्हाला होताच; पण मोहनदादांनी जी दाद दिली ना त्यामुळे आमची छाती जणू ५६ इंच झाल्यासारखं वाटलं. त्याचबरोबर सुधीर फडके यांनी वरच्या पट्टीतले गायलेले बुद्धगीत म्हणजे -
ओम नमो तथागता नमोस्तु गौतमा ...
या गीतालाही आम्ही नांदीत रुपांतरीत करू दुसऱ्या प्रयोगाचे दरम्यान वाजवली. तोपर्यंत मोहन दादा हे गीत घेण्याचे धारिष्ट दाखवत नव्हते किंबहुना थोडेसे द्विधा मन:स्थितीत असतानाही नांदी फक्कड झाल्यावर त्यांनी माझं खूप भरभरून कौतुक केलं.
मोहन दादाला एखादी गोष्ट भावली किती अगदी प्रांजळपणे समोरच्याकडे व्यक्त करून मोकळा होत असे; मनात कुठलाही दुजाभाव न ठेवता; स्वाभिमानाला न गोंजारता. खरा कलाकार हा असाच असतो. आपल्या कानाला, डोळ्यांना आणि हृदयाला लावणा-या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं तिथल्या तिथे काैतुक-गौरव करावा हे फक्त आणि फक्त खर्या कलाकाराला जमते.
प्रत्येक मनुष्य हा एक पुस्तकच असतो. पण जशी आपण पुस्तके वाचतो ना तशी माणसं देखील वाचावीत. वर वर ओबडधोबड वाटणारी, करारी दिसणाऱ्या माणसांच्या सानिध्यात गेल्यावरच त्या माणसाच्या आतील हृदय किती कोमल, किती प्रेमळ, किती त्यागी आणि किती उदारमतवादी असते हे उमजून येते; अगदी वरून काटेरी असणाऱ्या फणसापरी!
आपणा सर्वांनाच एक चिंता लागून राहिली होती ती मोहनदादाचा नातू - इवल्याशा चैतन्याची. कारण त्याचे वडील दिवंगत वैभवच्या निधनाने व्याकुळ, अतिशोकाकूळ होऊन उद्विग्न झालेला हा मुलगा उपस्थित साऱ्यांच्या हृदयाला चीर देऊन गेला होता. वडील जाण्याने व्याकुळलेला चिमुकला त्याचे ते हृदय पिळून टाकणारे आर्त बोल सार्यांनीच ऐकले होते. बापाच्या विराहने मलून झालेला चेहरा आणि भेदरलेली भिरभिरती नजर आजही जशीच्या तशी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मोहन दादांची ही जेव्हा बातमी कानावर येताच तुमच्या आमच्या साऱ्यांच्या मनात एकच भीती त्वरित उत्पन्न झाली ती म्हणजे आता चैतन्याची काय हाल होतील? आपल्यालाही हा बालकाचा टाहो पहावेल का? कसा सामना हा इवलासा मुलगा करेल? असे एक ना अनेक प्रश्न डोकं भांडावून सोडत होते. पण म्हणतात ना, ज्याच्या पदरी संकट येतात त्या संकटांना सामना करण्याची शक्ती ही निसर्गाने देवू केलीय. बघा ना, आपल्या वडिलांच्या प्रेतावर आक्रोश करणारा हा चैतन्य अवघ्या एका महिन्यातच किती समजूतदार, किती प्रगल्भ आणि किती संयमी धीरगंभीर बनलाय. आज तो त्याच्या आजोबांच्या म्हणजेच मोहनदादाच्या अंतिम यात्रेत किती शांत, संयमी आणि समजूतदार वाटला. ज्या गोष्टीची आपल्याला चिंता लागून राहिली होती ती अगोदरच त्याच्या वर्तनात बदल घडवून उभी होती. कोवळ्या वयात इतकी समज तीही इतक्या विलक्षण गतीने यावी यात आहे ना चमत्कार! कुमार चैतन्यांने या पुढील प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगी अशी धीरोदात्त विवेक बुद्धीची कास धरून आपली प्रगती साधावी आणि आपल्या आयुष्याची सोनं करावं. त्याचबरोबर त्याचे आजोबा म्हणजे आमचे मोहनदादा यांच्या पावलावर पाऊल ठेवून रंगभूमीची सेवा करावी त्यासाठी आवश्यक असणारे पाठबळ हे कुटुंबीयांनी आणि विशेष करून पवार परिवाराने या चैतन्यावर लक्ष ठेवून मी असे सुचित करतो की, कुमार चैतन्याला एखाद्या नाट्यकलेच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊन द्यावा. त्या प्रशिक्षणाने तो कलाक्षेत्रात आणखी प्राविण्य मिळवून तो पुढे आपल्या आजोबांसहित स्वतःचही नाव रोशन करेल अशाप्रकारच्या दिशेने त्याने मार्गक्रमणा करावी असं या निमित्ताने मी आज इथे मांडतो. त्याच बरोबर मोहन दादांच्या पश्चात त्यांची पत्नी, त्यांच्या तीन मुली आणि जावई या सर्वांना या प्रसंगातून सावरण्याचा बळ येवो. अशी सदिच्छा व्यक्त करतो.
मोहनदादाला आयुष्याची जवळजवळ सात दशक लाभली म्हणजे सत्तरीचं आयुष्य लाभले. या मोहनदादाचा शोक करण्यापेक्षा मुलाच्या निधनानंतर अवघ्या एक महिन्यात आकस्मातपणे जाण्याने जो धक्का आहे तो अतीव असा आहे. आमच्या पवार परिवारात हा असा पहिलाच प्रसंग आहे.
काहीशा भावविवश करणाऱ्या माझ्या भावना माझ्या 'मूकनायक' या ब्लॉगवर देखील शेअर केल्या असून त्याची लिंक मी माझ्या व्हाट्सअप स्टेटसवर जोडली आहे. यामध्ये मी माझ्या अंतर्मनातला कोल्हाहल उपसून स्वतःला काहीसं हलकं-फुलकं अनुभवत आहे.
तरी या माझ्या मोठ्या बंधूस-मोहनदादास मी जितेंद्र चंद्रकांत पवार माझे कुटुंबीयांमार्फत, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गावशकाखा चाफेरी यांचेवतीने आणि जनकल्याण कमिटीच्या वतीने मोहनदादा यास श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करतो. मोहनदादास निर्वाण प्राप्त होवो!